माथेरान : मागील काही वर्षांपासून राजकारणाची परिभाषाच पूर्णपणे बदलून गेलेली आहे. समाजकारणाला राजकारणाची जोड दिल्यावर ज्याप्रमाणे सर्वांगीण विकास होण्याची अपेक्षा असते. राजकारणाची तत्वे नीतिमूल्य जोपासताना समाजाला विकासाच्या प्रवाहात नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य राजकारणातून घडत असते. समाजकारण करत असताना नकळत राजकारणाचे मनोरे  पादाक्रांत करत असताना येणाऱ्या मार्गात जे काही संघर्षमय  चढउतार असतात. त्यातून यशस्वी वाटचाल करत आपल्या ध्येयापर्यंत राजकारण नेत असते. राजकारण करत असताना त्याला समाजकारणाची जोड दिल्यास कोणतेही खडतर आव्हान सहजरीत्या पार करता येते यातूनच लोकांना अभिप्रेत असणारा विकास मार्गी लागण्यास मदत होत असते. राजकारण करत असताना समाजकारणाचा विसर पडला तर पदरी निराशा आणि अपयश हे हमखास येतेच यात शंकाच नाही. सध्याच्या राजकारणाने केवळ पैशाचा बाजार मांडलेला दिसत आहे. जनते प्रती स्वतःची काय नैतिक जबाबदारी आहे. जनतेच्या विश्वासावर आपण सभागृहात गेलेलो आहोत याच मतदारांच्या जीवावर पाच वर्षे जनमानसात आपली प्रतिमा उंचावण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला असतो आपल्या पक्षाच्या चिन्हावर मतदार राजांनी आपल्याला कौल देऊन एका उंच शिखरावर विराजमान केलेले असते याचा विसर सध्याच्या राजकीय मंडळींना पडलेला दिसत असून नितीमूल्य आणि नैतिक जबाबदारी यांचा खून करून स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पदासाठी गलिच्छ राजकारण करून जनतेच्या विश्वासाला तडा देण्याचे काम सद्यस्थितीत सर्वत्र पाहावयास मिळत आहे. पक्षनिष्ठा आणि पक्षाची तत्वे ही दुर्मिळ होऊ लागली आहेत. ज्या पक्षामुळे आपण जनमानसात वावरत आहोत या पक्षाने आपल्याला मान सन्मान दिला आदर दिला जगण्याचा अधिकार दिला त्या पक्षाशी गफलत करून बेडूक उड्या मारल्या जात आहेत सरड्यालाही लाज वाटेल असे रंग बदलण्याचे महत्त्वपूर्ण काम राजकीय नेत्यांकडून पाहावयास मिळत आहे. ज्या नेत्यांवर विश्वास ठेवला तेच स्वतःच्या स्वार्थासाठी भटकंती करत आहेत तर मतदार राजा कोणावर विश्वास ठेवणार ? हाही प्रश्न मतदारांना पडला आहे.

राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी होत आहेत.राज्यातील राजकीय पक्षांच्या खुद्द नेत्यांनीच विश्वासार्हता गमावलेली आहे. तिथे माथेरान सारखे दुर्गम पर्यटनस्थळ पिछाडीवर कसे असू शकेल. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कर्जत खालापूर मतदार संघातील महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही.विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना महायुती कडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे घारे यांनी शिवसेनेच्या उबाठा गटाकडून तिकीट मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या घारे यांना उबाठा गटाकडून मशाल चिन्ह मिळावे यासाठी माथेरान मधील शिवसेनेच्या उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर गार्हाणे घातले होते.परंतु महाआघाडी मधील उबाठा गटाच्या नितीन सावंत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. यामुळे घारे यांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळेस कर्जत खालापूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी घारे यांच्या प्रेमाखातर राजीनामे दिले आहेत. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला नितीन सावंत यांना उमेदवारी मिळाली हा आनंद व्यक्त करण्याऐवजी माथेरान मधील उबाठा गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. याला एकमेव कारण म्हणजे माथेरान नगर परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्याला घारे गटाकडून भरीव निधी प्राप्त होऊ शकतो हेच धोरण ठेऊन त्यांनी सुध्दा आपला विश्वास व्यक्त करण्यासाठी उबाठा गटाचा राजीनामा देऊन घारे यांना अपक्ष उमेदवार म्हणून सक्रिय पाठिंबा दिला आहे.

माथेरान हे छोटेसे पर्यटन स्थळ असून इथली मतदार संख्या जेमतेम 3000 च्या आसपास आहे यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा गटाची मिळून 1000 च्या आसपास मते आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीचा धर्म पाळला नव्हता त्यामुळेच  महाआघाडीच्य संजोग वाघेरे यांना थोडी जास्त मते माथेरान मधून मिळाली होती. याही वेळेस विधानसभेच्या निवडणुकीत उबाठा गटाने अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्या बाजूनेच मतदान केले असते. हे सर्वांना माहित आहे त्यामुळेच यांनी राजीनामे देऊन घारे यांना पाठबळ दिले आहे.

कर्जत खालापूर मतदार संघातील महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे हे विद्यमान आमदार आहेत त्यांना तोडीस तोड देणारा उमेदवार म्हणजे सुधाकर घारे आहेत.माथेरान मधील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांना उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो केवळ आपल्याला आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत भरीव निधी देणारा असावा याच उद्देशाने स्वतःच्या पक्षाचा राजीनामा देऊन,ज्या मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून नगरपरिषदेच्या तसेच पतसंस्थेच्या निवडणुकीत विजय मिळवून दिला त्यांचा विश्वासघात करून स्वतःच्या स्वार्थासाठी अपक्ष उमेदवार घारे यांना पाठींबा दिल्याने या गलिच्छ राजकारणात नीतिमत्तेचा होतोय कडेलोट अशा चर्चा गावात सर्वत्र ऐकावयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *