मुंबई : अशोक गायकवाड
पूर्वीच्या झेकोस्लोवाकिया मधून विलग झालेला स्लोवाकिया देश अभियांत्रिकी, वाहन निर्मिती, संरक्षण उत्पादने, धातुशास्त्र, ग्रीन हायड्रोजन, आदी क्षेत्रात आघाडीवर असून आपला देश भारताला ग्रीन हायड्रोजन, सांडपाण्याचे व्यवस्थापन, हवामान शास्त्र व सायबर सुरक्षा या क्षेत्रात सहकार्य करण्यास उत्सुक आहे, असे प्रतिपादन स्लोवाक गणराज्याचे भारतातील राजदूत रॉबर्ट मॅक्सियन यांनी शुक्रवारी येथे केले.*
रॉबर्ट मॅक्सियन यांनी शुक्रवारी (दि. २५) महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.स्लोवाकिया जगातील सर्वात मोठा कार निर्मिती करणारा देश असून आपल्या देशात हुंदाई, फोल्क्सवॅगन, जग्वार, लँड रोव्हर आदी कारची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते असे सांगून स्लोवाकिया दरडोई उत्पन्नात देखील अग्रेसर आहे असे राजदूत मॅक्सियन यांनी राज्यपालांना सांगितले. स्लोवाकिया एकट्या चीन मध्ये २०० पेक्षा अधिक ठिकाणी शहरी सांडपाण्याचे व्यवस्थापन करत असून भारतात देखील या बाबतीत सहकार्य केले जाईल,असे राजदूतांनी सांगितले. अमिताभ बच्चन यांचा अभिनय असलेला ‘चेहरे’ या चित्रपटाचे चित्रीकरण स्लोवाकिया येथे झाल्यामुळे तेथील पर्यटनाला चालना मिळाली असे नमूद करून आपला देश भारतीय चित्रपट निर्मात्यांना चित्रीकरणासाठी आमंत्रित करीत आहे, असे रॉबर्ट मॅक्सियन यांनी सांगितले.स्लोवाकिया हा देश निसर्ग संपदेने नटलेला असून ऐतिहासिक किल्ले, स्कीईंग, स्पा, स्वच्छ हवा यासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे भारतीय पर्यटकांनी आपल्या देशाला भेट द्यावी अशी अपेक्षा राजदूतांनी व्यक्त केली. स्लोवाकिया येथे चित्रपट निर्मात्यांनी जावे याकरिता आपण राजभवन येथे चित्रपट निर्मात्यांना बोलावू व त्यांचेशी चर्चा करू असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. भारतात फुटबॉल दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून स्लोवाकियाने भारतात फुटबॉलचे प्रदर्शनी सामने आयोजित केल्यास त्यातून उभय देशांमधील संबंध बळकट होतील असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी राजदूतांच्या पत्नी याना मॅक्सियानोव्हा आणि स्लोवाक गणराज्याचे मुंबईतील मानद कॉन्सल अमित चोक्सी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *