अनिल ठाणेकर
ठाणे : लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे साथ दिली तशीच साथ जनता विधानसभा निवडणुकीत महायुतीला देईल. असा विश्वास भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,रिपाई महायुतीचे उमेदवार आ. संजय केळकर यांनी व्यक्त केला. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील प्रचारासह प्रसार माध्यमांसाठी सोईचे ठरावे यासाठी तयार करण्यात आलेल्या भाजपच्या कोकण विभागातील दुसऱ्या मिडिया सेंटरचे उद्घाटन आ. संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
ठाण्यातील कापुरबावडी जंक्शन येथील लेक सिटी मॉलमधील गोएंका शाळेच्या पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये भाजपच्या कोकण विभागीय मिडिया सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी मा. खासदार विनय सहस्त्रबुद्धे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, आमदार निरंजन डावखरे, भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, मा.गटनेते मनोहर डुंबरे, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ प्रमुख सुभाष काळे, सुजय पतकी,परेश ठक्कर, सचिन मोरे, सागर भदे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी खा. विनय सहस्त्रबुद्धे यांनी, महाराष्ट्रात सहा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. एकप्रकारे हे महायुद्ध आहे. महाभारतात ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रावर संजयची दुरदृष्टी होती त्याप्रमाणे ठाण्यातील महायुतीचे उमेदवार आमदार संजय केळकर यांचेही ठाण्यावर लक्ष आहे. विशेष म्हणजे,आ. केळकर यांच्या ठाणे मतदार संघात भाजपचे कोकण विभागाचे मिडिया सेंटर सुरू होत आहे. हे विशेष असल्याचे नमुद केले. या कार्यक्रमात आ. निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आदींनीही भाजपच्या मिडिया सेंटरच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पार्टी राज्यात सर्वाधिक जागा लढवत असुन महायुती म्हणून आम्ही प्रत्येक जागा लढवत आहोत.तेव्हा,विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढचा महिनाभर एकाच ठिकाणी सर्व घडामोडी प्रसार माध्यमांना सहजगत्या उपलब्ध व्हाव्यात. यासाठी इंटरनेटसह सर्व सोईने सुसज्ज असे मिडिया सेंटर ठाणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आले आहे. याठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पत्रकार परिषदा तसेच नेते मंडळीच्या मुलाखती पत्रकारांना घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. असे स्पष्ट करून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी, ठाणे विधानसभा मतदार संघात आ. संजय केळकर यांच्या कार्याची दखल घेऊनच पक्षाने निवड केली आहे , तेव्हा आ. संजय केळकर हे तिसऱ्यांदा बहुमताने निवडून येतील. असा विश्वास व्यक्त केला.