फडणवीसांचे नागपुरात शक्तीप्रदर्शन

नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आज नागपूर दक्षिण या त्यांच्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजापाचे नेते नितीन गडकरींसोबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळेही फडणवीस यांच्यासोबत होते.

आज त्यांनी निवडणूक अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात गेल्या ५वर्षात त्यांच्या संपत्तीत फक्त ११ लाखांनी वाढ झाल्याचे नमुद करण्यात आले आहे.

फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे ५६ लाख ७ हजार रुपयांची चल संपत्ती आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी हा आकडा ४५ लाख ९४ हजार दाखवला होता. आयोगाला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे ४ कोटी ६८ लाखांची अचल संपत्ती आहे. तर त्यांच्या पत्नीकडे ९५ हजारांची अचल मालमत्ता आहे.

फडणवीस यांच्याकडे चार बँक खात्यात २ लाख २८ हजार ७६० रुपये आहेत. मागील निवडणूक काळात त्यांच्या खात्यात ८ लाख २९ हजार रुपये होते. त्यांच्या पत्नीचे पाच बँकांत खाते असून त्यात १ लाख ४३ हजार रुपये आहेत. मागील निवडणूक काळात त्यांच्याकडे ३ लाख ३७ हजार असल्याचे दाखविण्यात आले होते. पाच वर्षात दोघांच्या बँक खात्यातील रक्कम कमी झाल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते.

अमृता फडणवीस यांनी शेअर व म्युच्युअल फंडामध्ये ५ कोटी ६२ लाख ५९ हजारांची गुंतवणूक केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एलआयसी, पोस्टात २० लाख ७० हजारांची गुंतवणूक केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ३२ लाख ८५ हजारांचे सोने आहे. तर त्यांची पत्नी अमृता यांच्याकडे ६५ लाख ७० हजार रुपयांचे सोने आहे.

देवेंद्र फडणवीस सहाव्यांदा विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांनी आतापर्यंत म्हणजेच १९९९ पासून एकही निवडणूक हरलेली नाही. महायुतीचं सरकार राज्यात पुन्हा येईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

“भारतीय जनता पक्षाचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह या सगळ्यांचे मी आभार मानतो. मला सहाव्यांदा विधानसभेची उमेदवारी दिली. मी माझा उमेदवारी अर्ज भरला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की सभागृहाचा सदस्य म्हणून जनतेने माझं काम पाहिलं आणि सेवाही पाहिलं आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जे सरकार आहे तेच पुन्हा सत्तेवर येईल हा माझा विश्वास आहे.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *