मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या तिसऱ्या यादीत चार उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या आधी अजित पवार यांनी दोन याद्यांची घोषणा केली होती. त्यानुसार अजित पवार यांनी आतापर्यत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५० उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तिसऱ्या यादीमध्ये खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांच्याविरोधातील उमेदवाराचीही घोषणा करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या चार उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. तसेच महायुतीत दहा जागांवर चर्चा सुरु असून त्याचा निर्णय दुपारपर्यंत येण्याची शक्यता सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या यादीत देखील नवाब मलिक यांचे नाव नाहीये. त्यामुळे नवाब मलिक यांना संधी दिली जाणार की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याबाबतही सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नवाब मलिक हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमचे सहकारी आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही भेटत असतो, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
तिसऱ्या यादीमध्ये गेवराईमधून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील आणि निफाडमधून दिलीप बनकर यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. तर पारनेरमधून काशिनाथ दाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
