अभिजीत सावंत, प्राजक्ता शुक्रे खास आकर्षण
कल्याण : कपिल पाटील फाउंडेशनतर्फे यंदाही कल्याणमधील साई चौकात २ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी-हिंदी गीतांबरोबर हास्य कलाकार आणि भारतातील प्रसिद्ध बंजारा ग्रुपचे बेली नृत्य पाहण्याची पर्वणी कल्याणमधील हजारो रसिकांना मिळणार आहे.
माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी कल्याण पश्चिममधील साई चौकात दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदा निवडणुकीची आचारसंहिता असतानाही, कल्याणमधील रसिकांसाठी कपिल पाटील फाउंडेशनने शनिवारी दिवाळी पहाट कार्यक्रम भरविला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हजारो कल्याणकरांना अविस्मरणीय मैफल अनुभवता येईल.
या कार्यक्रमात इंडियन आयडॉल विजेता व बिग बॉस फेम गायक अभिजीत सावंत, गायिका प्राजक्ता शुक्रे, भूमी त्रिवेदी, जुईली जोगळेकर यांच्याकडून बहारदार गीते सादर होतील. तर प्रसाद खांडेकर व नम्रता संभेराव यांच्या विनोदी किस्स्याने हास्याचा गडगडाट होईल. त्याचबरोबर प्रसिद्ध `बंजारा स्कूल ऑफ डान्स’च्या कलाकारांनी बॅलेसह सादर केलेल्या दिलखेचक अदा आणि मनमोहक नृत्य पाहता येईल.सर्व कल्याणकरांनी २ नोव्हेंबर रोजी साई चौकात दिवाळी पहाटमध्ये सहभागी होऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले आहे.
