माजी खासदार विनायक राऊत यांची मागणी..!
कुडाळ : चिपी( सिंधुदुर्ग) ते मुंबई ही ‘अलायन्स एअर ‘ कंपनीची विमान उड्डाणे नियमितपणे सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी ऊबाठा शिवसेनेचे सचिव, माजी खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किजरापू यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
राऊत यांनी निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे.जिल्ह्यात अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.
देश-विदेशातील पर्यटक या जिल्ह्याला मोठ्या संख्येने भेट देतात.जिल्हात आर. सी. एस.(रुरल कनेक्टिव्हिटी सर्व्हिस- उडान योजना )अंतर्गत दोन वर्षांपूर्वी चिपी विमानतळ सुरू झाले.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’.या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘ चिपी ‘ विमानतळाचा समावेश करण्यात आला, त्यामुळे सिंधुदुर्गातील सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात विमान प्रवास सोपा झाला होता.
तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभु यांच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सहकार्याने ९ ऑक्टोबर २०२१ पासून चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग आणि मुंबई दरम्यान ‘अलायन्स एअर ‘ची उड्डाणे सुरू झाली.याचा पर्यटकांना तसेच स्थानिक आणि व्यावसायिक दोघांनाही मोठा फायदा झाला.
मात्र २६ ऑक्टोबर पासून ही विमान सेवा( उड्डाणे) आम्ही बंद करत आहोत असे कंपनीने अलिकडेच जाहीर केले आहे.
गेल्या तीन वर्षात पर्यटनाला चालना देणाऱ्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावणाऱ्या या हवाई सेवेला देश-विदेशातील नियमित स्थानिक प्रवासी आणि पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग आणि मुंबई दरम्यानची उड्डाणे बंद करण्याचा ‘अलायन्स एअर’ कंपनीचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे असे निवेदनात म्हटले आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांतील पर्यटन व्यवसायावर याचा विपरीत आणि दूरगामी परिणाम होणार आहे. त्यामुळे या विषयाकडे आपण वैयक्तिकरित्या लक्ष द्यावे आणि सार्वजनिक हितासाठी ‘अलायन्स एअर ‘ ला चिपी ते मुंबई दरम्यान नियमितपणे उड्डाणे सुरू ठेवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
