चेंगराचेंगरीत ९ प्रवासी जखमी, दोन जणांची प्रकृती गंभीर
मुंबई : मुंबईमधील रेल्वे स्थानकात पुन्हा एकदा माणूसकी चिरडली गेली. यावेळी वांद्रे रेल्वे स्थानकात राखीव नसेलल्या जागा पटकावण्यासाठी भयंकर रेटारेटी झाली. आणि त्यानंतर वांद्रे रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर गर्दीमुळे भयंकर चेंगराचेंगरी झाल्याने ९ प्रवासी जखमी झाले. यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापुर्वी परेल रेल्वे स्थानकात अशीच चेंगराचेंगरी होऊन अनेकांना आपले प्राण गमावावे लागले होते.
दिवाळीसाठी उत्तर भारतात जाण्यासाठी वांद्रे रेल्वे स्टेशनवर भयंकर गर्दी उसळली होती. वांद्रे ते गोरखपुरसाठीची 22921 अंत्योदय एक्सप्रेस फलाट क्रमांक 1 वर आल्यानंतर हा प्रकार घडला. दुर्घटनेसाठी रेल्वे पोलिसांचे नियोजन कारणीभूत असल्याची चर्चा आहे. रेल्वे पोलिसांना गर्दीचे नियोजन नीट न करता आल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जाते. या चेंगराचेंगरीत वृद्ध, महिला आणि मुले जखमी झाल्याचे वृत्त आहे.
रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वांद्रे टर्मिनसवर पहाटे पावणेतीन वाजता ही घटना घडली. वांद्रे ते गोरखपुरसाठीची 22921 अंत्योदय एक्सप्रेस फलाट क्रमांक 1 वर आल्यानंतर हा प्रकार घडला. ही गाडी स्थानकात येत असतानाच काही प्रवाशांनी जागा पकडण्यासाठी सामान घेऊन गाडीत चढायला सुरुवात केली. या एक्स्प्रेस ट्रेनचे २२ डबे अनारक्षित होते. त्यामुळे या गाडीत चढण्यासाठी प्रवाशांची एकच झुंबड उडाली. यामुळे चेंगराचेंगरीत होऊन अनेक प्रवासी जखमी झाले.
दिवाळी आणि छटच्या सणासाठी उत्तर भारतातील अनेकजण आपल्या गावी जातात. त्यामुळे २२ अनारक्षित डबे असूनही प्रवाशांची प्रचंड गर्दी होती, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.
चौकट
पश्चिम रेल्वेवर फ्लॅटफॉर्म
तिकीटांवर तात्पुरती बंदी
सणासुदीचा दिवस असल्याने उत्तर भारतात जाणारी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेवरील स्टेशनांवर फ्लॅटफॉर्म तिकीट देणे तात्पुरता बंद करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना गर्दी न करण्याचं आणि रेल्वेत चढत असताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
चौकट
‘रील’मंत्र्यांनी रेल्वे मंत्रीचेही
काम करावे- आदित्य ठाकरे
“आपल्या ‘रील’मंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणून देखील काम करायला हवं. सध्याचे रेल्वेमंत्री किती हतबल आहेत, हे वांद्रे येथील घटनेवरून दिसून येते. भाजपने अश्विनी वैष्णव जी यांना निवडणुकीसाठी भाजप महाराष्ट्राचे प्रभारी बनवले आहे, परंतु दर आठवड्याला दर आठवड्याला काही ना काही घटना रेल्वे दुर्घटना आणि अपघात घडत आहेत. आपल्या देशाला अशा असमर्थ मंत्र्यांच्या हातात देणं, हे लज्जास्पद आहे.” अशी संतप्त प्रतिक्रीया आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
