मुंबई : मोसमी पावसाने राज्यातून माघार घेतली आहे. पण, अवकाळी पाऊस राज्याची पाठ सोडायला तयार नाही. आताही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी या कालावधीत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस व विजांचा कडकडाट तसेच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.
राज्यातील अनेक भागात ऑक्टोबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाचा परिणाम काढणीला आलेल्या पिकांवर देखील झाला. दरम्यान, ऑक्टोबरच्या मध्यान्हानंतर पावसाने उघडीप दिली. तर याचवेळी प्रचंड उकाडा देखील जाणवला. रात्री व पहाटे हलकी थंडी आणि दिवसा कडाक्याचे उन्ह यामुळे नागरिकदेखील त्रस्त झाले होते. या कालावधीत असह्य उकाड्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. आता मात्र थंडीची सुरुवात झाली आहे. सायंकाळपासूनच वातावरणात हलका गारवा जाणवत आहे. तर रात्री व पहाटेपर्यंत तो कायम राहताे. दिवसाचा उकाडा देखील बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच आता ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान राज्यातील काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी ताशी ३० ते ४० किलोमीटर प्रति वेगाने वारे वाहतील आणि विजांचा कडकडाट देखील होईल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.