जादा महागाईमुळे शहरी भागातील गृहोपयोगी वस्तूंच्या आणि खाद्यपदार्थांच्या मागणीवर परिणाम होत आहे. देशातील आघाडीच्या गृहोपयोगी वस्तूंच्या उत्पादक दोन कंपन्यांनी 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यांच्या नफ्यात घट झाली आहे.
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने निकाल जाहीर केले आणि त्यानुसार दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात चार टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात ‘नेस्ले इंडिया’ने त्याचे निकाल जाहीर केले होते. या कंपनीच्या नफ्यामध्ये 0.94 टक्के घट झाली होती. शहरांमध्ये गृहोपयोगी वस्तूंची मागणी कमी झाली आहे. या कंपन्यांचे व्यवस्थापनही मागणीमध्ये घट स्वीकारत आहे. ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’चे सीईओ आणि कार्यकारी संचालक रोहित जावा म्हणाले, की सप्टेंबर तिमाहीमध्ये शहरी बाजारपेठेत गृहोपयोगी वस्तूंची मागणी कमी झाली आहे, तर ग्रामीण भागात मागणी वाढली आहे.
ते म्हणाले की ग्राहकांच्या मागणीमध्ये हळूहळू होत असलेल्या बदलांवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. दुसऱ्या तिमाहीमध्ये ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ चा निव्वळ नफा 2612 कोटी रुपये होता. 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये तो 2717 कोटी रुपये होता. मध्यमवर्गीय खर्चात कपात करतात. शहरी भागात ‘नेस्ले इंडिया’चीही मागणी कमी होत आहे. ‘नेस्ले इंडिया’ची कामगिरी जुलै-सप्टेंबर या तिमाहीमध्ये गेल्या आठ वर्षांमधील सर्वात कमी राहिली. शहरी भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीयांनी आपल्या खर्चात कपात केली आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम दूध आणि चॉकलेट विभागावर झाला आहे. ‘नेस्ले इंडिया’चे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक सुरेश नारायण म्हणाले की प्रीमियम वस्तूंचा खप मजबूत आहे; पण मध्यम सेगमेंटमध्ये मागणी कमी होत आहे.
सुरेश नारायण म्हणाले की, हाती पैसा राखून असणारे प्रचंड खर्च करतात; पण मध्यमवर्गीयांना ते परवडत नाही. अनेक कंपन्या मध्यमवर्गाला लक्ष्य करत असून वाजवी किंमतीत वस्तू देत आहेत. त्यांना तात्पुरत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. बहुतांश एफएमसीजी कंपन्यांना समस्या येत आहेत. कारण मध्यमवर्ग अडचणीत आहे. पूर्वी केवळ एका तिमाहीमध्ये कमकुवत मागणी असायची; परंतु आता मागणीमध्ये सतत 2-3 तिमाहींमध्ये घट दिसून येत आहे. असे असले तरी दीर्घकालीन मागणीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे.
