अनिल ठाणेकर
ठाणे : दिवाळीच्या सणात मुंबईतील आशांची पणती मात्र कोरडी झाल्याने दिवाळी बोनस आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांसाठी सीएसटी समोरच्या बीएमसीच्या मुख्य गेटवर २९ ऑक्टोबर रोजी, मुंबई जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन (सिटू) च्या पदाधिकारी आरमायटी इराणी, संगीता कांबळे, आरती कांबळे, मृणाल जंगम, अदिती तटकरे, सारिका इंगळे इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आशा वर्कर्सनी आंदोलन केले.
BMC च्या सर्व कर्मचाऱ्यांना या वर्षी भरघोस बोनस जाहीर करण्यात आलेला आहे इतकेच नव्हे तर आरोग्य सेविकांना देखील बोनस/ सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे मात्र गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने मागणी करूनही या वर्षी देखील आशांना बोनस देण्यात आलेला नाही. याचा निषेध करण्यासाठी NHM व BMC आशांनी हातात कोरडी पणती घेऊन आंदोलन केले.
बोनस न मिळाल्याने व वाढत्या महागाईमुळे यंदा आशांची दिवाळी अंधारात जाणार आहे. या वेळी बीएमसीच्या असंवेदनशीलतेचा निषेध व्यक्त करण्यात आला. करोना महामारीत जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या आशा वर्कर्स बद्दल बीएमसीच्या या भेदभावपूर्ण वागणुकीच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. हे आंदोलन आरमायटी इराणी, संगीता कांबळे, आरती कांबळे, मृणाल जंगम, अदिती तटकरे, सारिका इंगळे इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *