खासगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्लॅन्सच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केली. सर्वच कंपन्यांचे कॉलिंग, डेटा प्लॅन महागले. त्यानंतर देशात त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची एकच लाट आली आणि ग्राहकांनी ‘बीएसएनएल’कडे मोर्चा वळवला. परिणामी, ‘बीएसएनएल’च्या ग्राहकसंख्येमध्ये अचानक मोठी वाढ झाली. आता सरकार या सर्व बदलामुळे उत्साहित आहे.
‘बीएसएनएल’मध्ये आमुलाग्र बदल करण्याची तयारी सुरू झाली आहे. ‘बीएसएनएल’ लवकरच ‘फाईव्ह जी’ सेवा पुरवणार आहे. इतकेच नाही तर, लागलीच ‘सिक्स जी’ सेवेची चाचपणीही करण्यात येणार आहे. त्यासाठीचे प्रयोग सुरू झाले आहेत. असे झाले तर जगात सर्वाधिक गतीने इंटरनेट सेवा पुरवणारी ‘बीएसएनएल’ ही जगातील पहिली सरकारी कंपनी ठरू शकेल. दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी हा बदल घडवून आणण्याची तयारी केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल गेल्या दोन वर्षांपासून नव्याने ठसा उमटवू पहात आहे. ‘बीएसएनएल’मध्ये मोठे बदल झाले आहेत.
गेल्या तिमाहीमध्ये प्रत्येक महिन्यात ग्राहक जोडले गेले आहेत. ‘बीएसएनएल’च्या ग्राहकसंख्येत 60 लाखांची भर पडली आहे. भारत दूरसंचार निगम लिमिटेडची सेवा गावागावात पोहचवण्यात येत आहे आणि नेटवर्कमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. सरकारने तोट्यात चालणाऱ्या ‘बीएसएनएल’मध्ये सुधारणेसाठी ‘फोर जी’ आणि ‘फाईव्ह जी’ सेवांसाठी 89,047 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. गेल्या वर्षी केंद्र सरकारने जून महिन्यात याविषयी मंजुरी दिली होती. बीएसएनएल कर्जात बुडाली होती, तर तंत्रज्ञानातही पिछाडीवर होती. कंपनी गेल्या 12 वर्षांपासून तोट्यात होती; पण सरलेल्या दोन वर्षांमध्ये कंपनीने कात टाकली. आता कंपनी ‘फाईव्ह जी’ नाही तर ‘सिक्स जी’ची तयारी करत आहे.
‘बीएसएनएल’ सेवेसाठी चाचपणी सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘सिक्स जी’ तंत्रज्ञानावरही केंद्र सरकारने काम सुरू केले आहे.
