खर्डी : दीपावली म्हणजे आनंदाची उधळण, फराळाची मेजवानी, फाटक्यांची आतषबाजी, दिव्यांची आरास, रांगोळीची सजावट, विद्युत दीपमाळा व आकाश कंदिलांची घराघरांवर केलेली रोषणाई असे चित्र असते; मात्र शहापूरसारख्या ग्रामीण भागात वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. दीपावली, बलीप्रतिपदा व पाडवा या दिवशी उंबरखांड, दहिगाव, अजनूप, शिरोळ, टेंभा, दळखण, बेलवड व बीरवाडीसह ग्रामीण भागातील शेतकरी सकाळी जनावरांचा गोठा शेणाने सारवतात. त्यानंतर जनावरांना आंघोळ घातली जाते. त्यांना रंगवले जाते. तसेच, फुग्यांनी सजवून गावच्या वेशीवर नेतात. त्यानंतर तेथे पेंढा किंवा गवत पेटवून त्यावरून या जनावरांना उड्या मारायला लावतात. दिवाळीच्या दिवशी जनावरांना अग्निवरून उडी मारायला लावल्यास त्यांना कोणतेच आजार होत नाहीत, अशी ग्रामस्थांची श्रद्धा असल्याचे शेतकरी कैलास म्हसकर सांगतात.
दारासमोर रांगोळी काढून त्यावर गुरांच्या शेणाचे पाच पूंजक ठेवतात. त्यावर झेंडुची फूले ठेवली जातात. नंतर हे पूंजक सुकल्यावर शेतात सर्वत्र टाकतात. त्यामुळे शेतात चांगले पीक येते, असे शेतकरी सदानंद घरत, नितीन सांडे व सखुबाई हिलम यांनी सांगितले. खर्डीतील काही संस्था खेड्यापाड्यातील आदिवासी बांधवाच्या घरोघरी जाऊन फराळ व मिठाईचे वाटप करतात. पाडव्याच्या दिवशी नागरिक एकमेकांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देतात. अशाप्रकारे पूर्वापार चालत आलेली परंपरा आजही ग्रामीण परिसरात सुरू आहे.
दिवाळी हा सण साजरा करण्यासाठी सर्व कुटुंबे एकत्रित येतात. विशेषतः ग्रामीण भागात दिवाळी उत्साहाने साजरी केली जाते. शेणाच्या गवळणी, पेंद्या तयार करून त्याची पूजा केली जाते. ज्यांच्याकडे जनावरे नाहीत, ते मातीच्या गवळणी आणि पेंद्या तयार करतात. काही गावांमध्ये या काळात जनावरांचे पूजन केले जाते. त्याचबरोबर नरक चतुर्दशीच्या दिवशी भाऊबीज साजरी करण्याची पद्धत आहे.
झेंडूच्या फुलांचे तोरण
घरांना पिवळ्या आणि नारंगी झेंडूच्या फुलांचे तोरण लागलेले पाहायला मिळते. अवघं घर फुलांनी सजवले जाते. ग्रामीण भागातील फराळात सहसा चिवड्याचे विविध प्रकार, पारंपरिक रव्याचे लाडू, करंजी, चकल्या, अनारसे व शेव असे विविध चविष्ट पदार्थ बनवले जातात. ते मित्र परिवारात वाटून आनंद द्विगुणित केला जातो.
फटाक्यांची आतषबाजी
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मातीच्या कुंड्या विकत आणल्या जातात. त्या घरी बनवून त्यात बत्ताशे टाकतात. त्यावर दिवा लावला जातो. याची शेतकरी मनोभावे पूजा करतात. घरातील मौल्यवान वस्तू, वाहन, अवजारे याचीही पूजा केली जाते. या दिवशी मोठ्या प्रमाणावर आतषबाजी केली जाते. शाळकरी मुले ही किल्ला बनवण्यात व्यस्त असतात. पाडव्याच्या दिवशी पती-पत्नी जोडीने बसून पूजा करतात. पत्नी- पतीला ओवाळते, तेव्हा पत्नीला दिवाळी भेटवस्तू देण्याची प्रथा आहे.