संतप्त मोखाडावासींयांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा
मोखाडा: मोखाड्यातील पिंपळाचापाडा येथील आठ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून, तीचा खुन केल्याची घटना 28 ऑक्टोबरला घडली आहे. या घटनेतील संशयीतास मोखाडा पोलीसांनी अटक केली आहे. अत्याचार करून बालीकेचा खुन करणार्या, नराधमाला फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी मृत बालीकेच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी मोखाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढुन संताप व्यक्त केला आहे.
मोखाडा शहरातील पिंपळाचापाडा येथील 8 वर्षीय बालिका, तेथीलच आपल्या मैत्रिणीच्या, बहिणीच्या वाढदिवसाला जाते, असे सांगुन 28 ऑक्टोबर ला संध्याकाळी घरातुन बाहेर पडली. मात्र, उशीरापर्यंत ती घरी परतलीच नाही. त्यामुळे तीच्या पालक व नातेवाईकांनी तिची शोधाशोध सुरू केली. त्यानंतर रात्री ऊशीरा मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान ( दफनभूमी ) नजिक सदरची बालीका बेशुध्दावस्थेत आढळून आली आहे. मोखाडा ग्रामीण रूग्णालयात तीला तपासणी साठी नेले असता, तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तिला मृत घोषित केले होते. या बालीकेवर अत्याचार करून नराधमाने तीला ठार मारले होते. या घटनेमुळे मोखाड्यातील नागरीक संतप्त झाले आहेत.
मोखाड्यातील संतप्त नागरिकांनी हनुमान मंदिर पासुन बाजारपेठेतून, थेट पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही प्रमुख मागणी करत, पोलिसांना निवेदन दिले आहे. तसेच दिवसेंदिवस मोखाड्यात तरुणांमध्ये वाढत चालेले आमली पदार्थांचे सेवन तसेच बेकायदेशीर सुरू असलेल्या अंमली पदार्थांचे अवैद्य धंदे बंद करण्याबाबत पोलिसानी कठोर पाऊले उचलावीत अशी मागणी मोर्चेकर्यांनी केली आहे. या मोर्चात महिला व तरूण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या घटनेविषयी मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी संशयित आरोपीला तात्काळ अटक केली आहे. दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी संतप्त मोर्चेकर्यांनी केली आहे.
00000