महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन येथील कार्यालयामध्ये महाराष्ट्र काँग्रेस तर्फे आज “भ्रष्टयुती महाराष्ट्राची दुर्गती” हे बुकलेट आणि “यंदा पंजा” हे प्रचारगीत महाराष्ट्राचे प्रभारी आ. श्री. रमेश चेन्निथला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदर्शित करण्यात आले. यावेळी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वर्किंग कमिटीचे सदस्य अरिफ नसीम खान, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष आमदार वजहात मिर्जा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) नाना गावंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथलांचा आरोप
मुंबई : भाजपाचे राजकारण हे मित्रपक्षांना संपवणारे आहे. त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाही पद्धतशीरपणे नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधी पक्षांसह स्वताच्या मित्रपक्षांनाही संपवण्याचा हा भाजपचा प्रयत्न लोकशाहीविरोधी आहे असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे.
पत्रकार परिषद घेत रमेश चेन्नीथला यांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली.
विधानसभा निवडणुकीचे अर्ज दाखल झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता प्रचाराकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर टीका केली. भाजपने शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला संपवत मित्र पक्षांच्या अनेक जागा काबीज केल्याचे रमेश चेन्नीथला म्हणाले. तसेच महायुती सरकारकडून महाराष्ट्राची लूट सुरु असून विधानसभा निवडणुकीत जनता याचा बदला घेईल असा इशाराही चेन्नीथला यांनी दिला आहे. यासोबत महाविकास आघाडीमध्ये कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असेही चेन्नीथला यांनी बजावले आहे. ज्या उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत त्यांनाच आम्ही ‘एबी’ फॉर्म दिले आहेत. ज्या काँग्रेस नेत्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत त्यांनी अर्ज मागे घ्यावेत, असे रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.
“सर्व २८८ जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. जेव्हा तुम्ही महाविकास आघाडीची तुलना महायुतीशी करता तेव्हा आमच्या गटात कोणतेही मतभेद नाहीत. महायुतीमध्ये मात्र वाद सुरू आहेत. महायुती आता संपली आहे. आम्ही महाविकास आघाडीमध्ये सर्व पक्षांना समान वागणूक दिली आहे. महायुतीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सर्व जागा चोरल्या आहेत. यावरुन स्पष्ट होतंय की भाजपा आपल्या मित्रपक्षांना संपवत आहे. तर महाविकास आघाडीत आम्ही सर्व एकत्र आहोत,” असे रमेश चेन्नीथला म्हणाले.
“आम्ही समाजवादी पक्षाशी बोलत आहोत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणे हे आमचे उद्दिष्ट आहे आणि आम्ही या ध्येयाने काम करत आहोत. महाराष्ट्र सरकारची लाडली बेहन योजना निवडणूक आयोगाने बंद केली आहे कारण राज्य सरकारकडे पैसे नाहीत. महाराष्ट्रातील महिलांना सरकारकडून एकही पैसा मिळणार नाही. निवडणुकीपूर्वी खोटे बोलले गेले,” असेही चेन्नीथला म्हणाले.