वाशी : विधानसभा निवडणूक मतदार जागरूकता कार्यक्रमांतर्गत ऐरोली व बेलापूर या नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात स्वीप कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वीपचे नोडल अधिकारी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना मतदान करण्याकरिता प्रोत्साहित करण्यात येत आहे.

ऐरोली विधानसभा मतदारसंघातील ऐरोली सेक्टर १७ येथील पोस्ट ऑफिसमध्ये स्वीप पथकाने जाऊन तेथील अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांचे मतदान करण्याविषयी प्रबोधन केले. त्याचप्रमाणे महापालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयातही डॉक्टर, नर्स, तेथील रुग्णालयीन कर्मचारी यांना भेटून मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्याशीही संवाद साधून त्यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. तुर्भे प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातही स्वीप पथकाने भेट देऊन डॉक्टर, नर्स व तेथे उपस्थित असलेल्यांना मतदान करण्याविषयी प्रोत्साहित केले. घणसोली रेल्वे स्थानकावरील रिक्षाचालकांशी सुसंवाद साधत त्यांना मतदान करण्याविषयी आवाहन करत रिक्षावर मतदानाचा संदेश असलेले स्टीकर्स लावण्याविषयी सांगण्यात आले.

मतदानाची प्रतिज्ञा ग्रहण, रॅली

स्वीप पथकाने ऐरोली येथे फटाके विक्रीच्या स्टॉलला भेट देऊन विक्रेते व ग्राहक यांनाही मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. बेलापूर विधानसभा मतदारसंघातही सेक्टर २५ येथील समाजमंदिर सभागृह, जुईनगर, नेरूळ या ठिकाणी उपस्थित नागरिकांना २० नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचे आवाहन करत त्यांना मतदानाचे महत्त्व सांगण्यात आले. तुर्भे गाव सेक्टर २३ व सेक्टर २२ या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर रॅली काढली व उपस्थितांना मतदानाचे आवाहन करण्यात आले. सर्व ठिकाणी मतदानाची प्रतिज्ञा ग्रहण करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *