आठवले गटात मोठी अस्वस्थता
स्वाती घोसाळकर
मुंबई : भाजपाने आठवले गटाला तिकीट जरी दिले असले तरी पक्षाचे अस्तित्व मान्य न करता भाजपाच्या कमळावर निवडणूक लढविण्यास सांगितल्यामुळे आरपीआय आठवले गटात अस्वस्थता आहे. त्यात भाजापाचे ताकदवार स्थानिक नेते अजय बडगुजर यांनीही अपक्ष अर्ज भरल्यामुळे ही अस्वस्थता अधिक वाढली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या कोट्यातून महाराष्ट्रातील ४ विधानसभा जागा मित्र पक्षांना दिल्या आहेत. ज्या पक्षांना जागा देण्यात आल्या आहेत, त्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय (आठवले) पक्षाचाही समावेश आहे. महाआघाडीत आठवले यांचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला २ जागा देण्यात आल्या आहेत. कलिना विधानसभेची जागा भाजपच्या कोट्यातून आणि धारावी विधानसभेची जागा शिवसेनेच्या कोट्यातून देण्यात आली आहे. मुंबईतील कलिना मतदारसंघातील आठवलेंचा उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावरच लढणार आहेत त्यामुळे आरपीआय आठवले गटात असस्वस्थात पसरली आहे.
त्यातही कलिना मतदारसंघातून आठवलेंच्या पक्षाच्या नावाने दिलेले उमेदवार अमरजितसिंह हे भाजपाचेच नेते आहेत. अमरजितसिंह हे संघाचे कट्टर समर्थक आहेत. त्यांचे संघ स्वयंसेवकांच्या गणवेषातील काही फोटोही सध्या समोर आले आहेत. त्यात भाजपाच्या बडगुजर यांनीही बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे आठवले गटात मोठी अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे.
कधीकाळी ‘पँथर’ चळवळीत संघ आणि संघ विचारसरणीला विरोध करणाऱ्या रामदास आठवलेंना पक्षाच्या कोट्यातला उमेदवार संघ स्वयंसेवक कसा चालतो? असा सवाल आता पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना सतावत आहे. पक्षाच्या तोंडाला महायुतीत पाने पुसल्याने सध्या आठवले गटात मोठी अस्वस्थता आहे. यावर रिपाइंच्या पक्षांतर्गत अनेक वाट्सअप गृपवर हा असंतोष धुमसतोय. विधानसभेत महायुतीच्या प्रचारापासून दूर राहण्यावर सध्या पक्षाच्या सर्व विभागीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये ‘खल’ सुरू असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे. रिपाइंत रामदास आठवलेंच्या तिकीट वाटपावरील मवाळ भूमिकेचाही संताप पुढे येऊ लागला आहे. महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत ‘रिपाइं’ आठवले गटाला सहभागी न करणे, मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आठवलेंना ताटकळत ठेवण्यात आल्यानेही पक्षात संताप उफाळून आला आहे.
अजय बडगुजर यांचे बंड

कलिना मतदार संघातून भाजपाचे स्थानिक ताकदवर नेते अजय बडगुजर यांनीही बंड केले आहे. भाजपा प्रदेशाध्यशांनी मला या मतदार संघातून तिकीट देण्याचे वचन दिले होते. गेली पाच वर्षे मी येथे जीव ओतून काम केले आहे. भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून उपऱ्यांना तिकीट दिल्यामुळे मी अपक्ष अर्ज भरला आहे. आणि जिंकण्यासाठीच ही निवडणूक मी लढवित आहे असे बडगुजर यांनी सांगितले.

