मोदींच्या ८ तर अमित शाहांच्या २० सभा
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेसाठी आता प्रचारसभांचा धडाका उडणार आहे. स्वता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात ८ तर गृहमंत्री अमित शाहांच्या २० सभा होणार आहेत. पंतप्रधाननरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर बडे नेते महाराष्ट्रात अनेक जाहीर सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एकूण आठ सभा घेणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे राज्यात जास्तीत जास्त जाहीर सभा घेणार आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील महाराष्ट्रात प्रचार सभा घेणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकूण ८ प्रचार सभा घेणार आहेत. त्याखालोखाल देशाचे गृहमंत्री अमित शाह हे २० प्रचार सभांना हजेरी लावणार आहेत. केंद्रात २०१४ पासून मंत्री असलेला मराठमोळा चेहरा नितीन गडकरी हे संपूर्ण राज्यात एकूण ४० सभा घेणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा सध्या राज्य भाजपाचा चेहरा आहेत. त्यामुळे ते सर्वाधिक ५० प्रचार सभा घेणार आहेत. तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ४० प्रचार सभा घेणार आहेत. याशिवाय उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील तब्बल १५ प्रचारसभांना संबोधित करतील अशी माहिती आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली. पण नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांमध्ये उभी फूट पडली. त्यामुळे आता महाराष्ट्रात पक्षांऐवजी दोन आघाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी आमनेसामने असणार आहेत. महायुती सरकारमध्ये भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे.