लष्करातील उत्पादने ‘मेड इन इंडिया’ करण्याचे धोरण मोदी सरकारने आखले आहे. यामुळे भारतीय लष्कारातील उत्पादने आता खासगी कंपन्याही विकसित करू लागल्या आहेत. देशातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळख असलेला टाटा समूह हवाईदलासाठी विमाने बनवणार आहे.
टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्समध्ये सी-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बनणार आहे. भारत आणि स्पेनदरम्यान 56 विमाने बनवण्याचा करार झाला आहे. त्यातील 16 विमाने स्पेनमध्ये तयार होणार आहे. त्यानंतर 40 विमाने ‘टाटा ॲडवान्स सिस्टीम्स लिमिटेड’च्या वडोदरा येथील प्रकल्पात बनवणार आहे. ‘टाटा ॲडवान्स सिस्टीम्स लिमिटेड’ विमान बनवणारी देशातील पहिली खासगी कंपनी ठरली आहे. भारतीय हवाई दलाला सी-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टची गरज होती. त्या माध्यमातून सैनिक, शस्त्रास्त्रे, इंधन एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी नेता येणार आहे. सी 295 कमी वजनाच्या सामुग्रीची वाहतूक करणार आहे.
सी-295 विमान दोन व्यक्ती उडवू शकतात. त्यात 73 सैनिक किंवा 48 पॅराट्रूपर्स बसू शकतात तसेच 12 स्ट्रेचर इंटेसिव्ह केयर मेडवॅक किंवा 27 स्ट्रेचर मेडवॅकसोबत चार मेडिकल अटेंडंट प्रवास करू शकतात. हे एअरक्राफ्ट जास्तीत जास्त 9250 किलो वजन घेऊन जाऊ शकते. त्याची लांबी 80.3 फूट, विंगस्पॅन 84.8 फूट आणि उंची 28.5 फूट असेल. या एअरक्राफ्टमध्ये 7650 लिटर इंधन बसते. 482 किलोमीटर प्रति तास या वेगाने ते उडू शकते. त्याची रेंज 1277 ते 4587 किलोमीटर आहे. त्यात किती वजन आहे, यावर रेंज ठरणार आहे. ते जास्तीत जास्त 13,533 फूट उंच जाऊ शकते. सी-295 विमान 844 मीटर ते 934 मीटर लांबीच्या रनवेवरुन उड्डाण घेऊ शकते. त्याला उतरण्यासाठी फक्त 420 मीटरचा रनवे लागतो. त्यात सहा हार्ड पॉइंट्स म्हणजेच शस्त्रे आणि संरक्षण यंत्रणा बसवण्याची जागा आहे. दोन्ही पंखांखाली प्रत्येकी तीन इनबोर्ड पाइलॉन्स असू शकतात. त्यात 800 किलो वजनाची शस्त्रे बसवता येतील.
टाटाने गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून 40 विमानांसाठी मेटल कटिंगचे काम सुरू केले आहे. हैदराबादमध्ये सध्या त्याचे मुख्य काम सुरू आहे. या ठिकाणी अनेक भाग साठवले जात आहेत. टाटाचे हैदराबाद केंद्र विमानाचे प्रमुख भाग तयार करेल. त्यानंतर ते वडोदरा येथे पाठवले जातील.