अनिल ठाणेकर
ठाणे महानगरपालिकेले स्वच्छ सर्वेक्षण २०२४ या मोहिमेत पुनर्निर्माण अभियान हाती घेतले आहे. या अभियानात दीपावलीत जमा होणारा सुका कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने संकलन केंद्रे सुरू केली आहेत. ही संकलन केंद्रे सहा नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. या उपक्रमातून स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ठाणेकर नागरिक स्वच्छतेचा सकारात्मक संदेश देण्यात यशस्वी होतील असा, विश्वास उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी यांनी व्यक्त केला आहे.
दिवाळीच्या काळात शहर स्वच्छ राहावे, तसेच, निर्माण झालेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, असा या पुनर्निर्माण अभियानाचा उद्देश आहे. दिवाळीमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या भेटवस्तूंसह इतर प्रकारची खरेदी होते. त्यामुळे इतर दिवशी निर्माण होणाऱ्या कचऱ्यासोबतच दिवाळी सणाच्या काळात जास्तीचा सुका कचरा निर्माण होतो. या कचऱ्याचे संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्याचे ठाणे महानगरपालिकेने ठरवले आहे. या अभियानासाठी महापालिका क्षेत्रात, परिसर भगिनी (स्त्री मुक्ती संघटना), समर्थ भारत व्यासपीठ, ऑंटी प्लास्टिक ब्रिगेड या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले आहे. हिरानंदानी इस्टेट, भूमी एकर, लोढा अमारा, हिरानंदानी वन, दोस्ती इम्पेरिया, सिद्धाचल, हिरानंदानी मेडोज या मोठ्या गृहसंकुलांसोबत, डी मार्ट टिकुजीनी वाडी येथेही सुक्या कचऱ्याचे संकलन केले जाणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सुमारे दररोज सुमारे ३० हजार घरापर्यंत हे अभियान पोहचवण्यात येईल. या काळात सुमारे २५० टन सुका कचरा गोळा होईल, असा अंदाज आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नितीन कंपनी उड्डाणपुलाखालील मुख्य संकलन केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेबाबतची माहिती घेतली. तसेच, स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. नागरिकांनी त्यांच्या जवळच्या संकलन केंद्रांवर सुका कचरा जमा करावा. त्यामुळे, स्वच्छता राखली जाईल आणि सुक्या कचऱ्यातून पुनर्निर्माण करणे शक्य होईल, असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले. तत्पूर्वी, संकलन केंद्रांमधील कचरा एकत्र केला जाणार असलेल्या मुख्य संकलन केंद्राचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी उपस्थित होते नागरिकांनी सुका आणि ओला कचरा याचे वर्गीकरण करून, सुका कचरा महापालिकेच्या या संकलन केंद्रात किंवा प्रभाग समिती कार्यालयात असलेल्या ‘आर आर आर’ केंद्रात द्यावा. या उपक्रमातून स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ठाणेकर नागरिक स्वच्छतेचा सकारात्मक संदेश देण्यात यशस्वी होतील असा, विश्वास उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *