डिजेच्या तालावर तरूणाई थिरकली
ठाणे : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळपासून शहरातील राम मारूती रोड परिसर, मासुंदा तलाव परिसर, गडकरी चौक तरूणाईच्या उत्साहाने फुलुन गेला होता. डिजेच्या तालावर तरूणाईने ठेका धरत दिवाळी पहाट साजरी केली. पारंपारिक पोशाखात तरूण, तरूणी मासुंदा तलाव परिसरात छायाचित्र काढत दिवाळीच्या शुभेच्छा देत असल्याचे चित्र दिसून आले. तसेच अनेक गायकांनी, ब्रास बँड पथकांच्या गाण्यांनी आजची दिवाळी पहाट रंगली.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशीला ठाण्यात अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजल्यापासून हे कार्यक्रम सुरू झाले. थोड्यावेळाने तरूण तरूणींचे समूह मासुंदा तलाव, गडकरी चौक, राम मारूती रोड परिसरात दाखल होण्यास सुरूवात झाली. तरूण- तरुणी पारंपारिक साडी, कुर्ता परिधान करून दिवाळी पहाट कार्यक्रमास उपस्थित होते. अनेकजण मित्रमैत्रिणींसोबत सेल्फी काढण्यात रमून गेले होते. डिजेच्या तालावर ठेका धरत सर्वांनी दिवाळी पहाट जल्लोषात साजरी केली. चिंतामणी चौकात राॅकस्टार क्विन पल्लवी दाभोळकर, गायक स्वप्निल गोडबोले, तसेच राम मारूती रोड परिसरात बाळकुम येथील राष्ट्रीय ब्रास बॅंडची पथकांचे वादन आयोजित केले होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाटसाठी कपड्यांमध्ये वैविध्य दिसून आले. यंदा महिलांमध्ये घरारा ड्रेस, भरजरी ओढण्यांचा ड्रेस तसेच दक्षिण भारतीय पद्धतीच्या घागरा साडीचा प्रकाराला महिलांची सर्वाधिक पसंती होती. यंदाच्या दिवाळी पहाटला पुरुष विविध नक्षीदार कुर्त्यांमध्ये दिसून आले.
डिजेवर महाराष्ट्र माझा, जय श्रीराम अशी गाणी वाजत होती. तसेच अनेक ठिकाणी राजकीय गामी देखिल वाजत असल्याचे चित्र ठाण्यात दिसून आले. या गाण्यांवर तरूणाईने ठेका धरत दिवाळी पहाट साजरी केली.
रतन टाटांना श्रद्धांजली
भारतीय उद्योग जगताला आधुनिक युगात नेण्याकरिता सतत कार्यरत असणारे, या क्षेत्राचा आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवणारे टाटा उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना श्रद्धांजली देण्यासाठी अनेक ठिकाणी फलक लावण्यात आले होते.