सुवर्णमहोत्सवी कुमार व मुली (ज्युनिअर) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा
धाराशिवचे कुमारगटात पहिले तर मुलींच्या गटात चौकारासह आठवे विजेतेपद
धाराशिव : यजमान धाराशिवने सुवर्ण महोत्सवी (५०वी) कुमार व मुली (ज्युनिअर) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत कुमार व मुली या दोन्ही गटातून विजेतेपद पटकावित दुहेरी मुकुट संपादिला. सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूसाठी असलेले सावित्री पुरस्कार तन्वी भोसले हिने व विवेकानंद पुरस्कार सोत्या वळवी या धाराशिवच्याच खेळाडूंनी पटकाविले. मुलींच्या गटात सोलापूर, ठाणे तर मुलांच्या गटात सोलापूर व पुण्याने अनुक्रमे तृतीय व चतुर्थ स्थान संपादिले. धाराशिवने कुमारगटात पहिलेच विजेतेपद पटकावले असून मुलींच्या गटात विजेतेपदाच्या चौकारासह (२०२१-२२ पासून सलग चौथे विजेतेपद) तर एकूण आठवे विजेतेपद मिळवत सुवर्णमहोत्सवी वर्षात दुहेरी विजेतेपदासह दिवाळी धमाका साजरा केला. यापूर्वी २०१५-१६ साली जळगाव येथे झालेल्या ४३ व्या स्पर्धेत ठाण्याने दुहेरी मुकुट मिळवला होता त्यानंतर तब्बल सहा अजिंक्यपद स्पर्धांनंतर धाराशिवला हा इतिहास घडवता आला. यजमान म्हणून सुध्दा दुहेरी मुकुट मिळवणारा धाराशिव हा पहिला संघ ठरला व प्रेक्षकांनी दिवाळीत विजयोत्सव साजरा करताना आकाश आतीशबाजीच्या विविध रंगांनी भरून टाकले.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व उस्मानाबाद जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त गर्दीत झालेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात धाराशिवने सांगलीचा ११-९ असा २ गुणांनी पराभव केला. मध्यंतराची ६-४ ही २ गुणांची आघाडीच त्यांना विजय मिळवून देऊन गेली. धाराशिवकडून अश्विनी शिंदेने ४.०० व २.१० मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात ६ गुण मिळवत प्रेक्षकांना दिवाळीत फटके फोडण्याचा आनंद द्विगुणीत करून दिला. तन्वी भोसलेने १.२० आणि २.१० मिनिटे संरक्षण केले. सृष्टी सुतारने १.१० आणि १.०० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गुण वासूल केला. प्रांजली काळेने पहिल्या डावात नाबाद १.२० व दुसऱ्या डावात १.३० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गुण संघाला मिळवून दिला. मैथिली पवारने १.१० व १.४० मिनिटे संरक्षण केले. सुहानी धोत्रेने आक्रमणात ३ खेळाडू बाद करताना विजेतेपदाचा धमाका उडवून दिला. तर पराभूत सांगली कडून सानिका चाफेने अष्टपैलू कामगिरी करताना ३.१० व १.४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ गुण मिळवत “हम भी किसीसे कम नही” या अविर्भावात कामगिरी नोंदवली. सानिया सुतारने १.४० व १.३० मिनिटे संरक्षण केले. प्रतीक्षा बिराजदारने आक्रमणात ३ खेळाडू बाद करून संरक्षणामध्ये १.१० व २.४० मिनिटे अशी वेळ नोंदवताना कडवी लढत दिली. पण शेवटी धाराशिवने विजेतेपदाचा विजयी चौकार मारलाच.
मुलांच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात जादा डावांमध्ये धाराशिवने सांगलीवर २३-२२ असा २.३० मिनिटे राखून १ गुणाने विजय साजरा करताना पहिले वाहिले विजेतेपद खेचून आणले. शेवटपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या या सामन्यात मध्यंतराला १०-७ अशी तीन गुणांची आघाडी धाराशिवकडे होती. त्यानंतर मात्र, सांगली संघाने दुसऱ्या डावात जोरदार मुसंडी मारत आक्रमण केले व धाराशिवला १६-१६ असे बरोबरीत रोखले. जादा डावात मात्र धाराशिवने २.३० मिनिटे राखून ७-६ अशी बाजी मारली.
नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण करणाऱ्या धाराशिवच्या सोत्या वळवीने १.५०, २.४० मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात तीन गडी बाद केले. विलास वळवीने १.२० आणि १.५० मिनिटे असे संरक्षण करताना आक्रमणात दोन गडी बाद केले. हरदया वसावेने दोन मिनिट व एक मिनिट संरक्षण करताना आक्रमणात तीन गडी बाद केले. जितेंद्र वसावेने १.४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात चार गडी बाद केले. नितेश वसावेने १.१० मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात पाच गडी टिपले व जमलेल्या प्रेक्षकांनी मैदानातच फटाक्यांची आतिषबाजी केली.
सांगलीकडून प्रज्वल बनसोडेने १.१० व एक मिनिट संरक्षण करताना आक्रमणात सहा गडी बाद केले. अथर्व पाटीलने १.३०, १.१० मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात ४ गडी बाद केले. आदर्श खतावेने आक्रमणात पाच गडी टिपत जोरदार लढत दिली पण दिवाळीने विजयाचे दान धाराशिवच्या पारड्यात टाकले.
सर्वोत्कृष्ट खेळाडू
अष्टपैलू: सोत्या वळवी, तन्वी भोसले (धाराशिव). संरक्षक : विलास वळवी (धाराशीव), सानिका चाफे (सांगली). आक्रमक : अश्विनी शिंदे (धाराशिव),प्रज्वल बनसोडे (सांगली).
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुले, सोलापूरचे पोलिस उपअधिक्षक दूलबा ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नेत्र रोग तज्ञ डॉ. वृषाली लामतुरे (वारद), डॉ. मिलिंद पोळ, डायट कॉलेजचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे, अर्जुन पुरस्कार प्राप्त सौ सारिका काळे, मराठी चित्रपटसृष्टीचे सह दिग्दर्शक संतोष साखरे,
शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त संघटक जनार्दन शेळके, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार गोविंद शर्मा आदी उपस्थित होते. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केले.
0000