Month: October 2024

अवैध मद्य विक्री प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

दहा दिवसांत ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त  साठ आरोपींना अटक योगेश चांदेकर पालघरः विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातून होणारी अवैध मद्याची वाहतूक, निर्मिती आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात पालघर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत ४३ लाख २८ हजार १३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या दहा दिवसांत ७७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत सीमावर्ती राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशाच्या शेजारी जिल्ह्यांतून येणाऱ्या मद्याची वाहतूक, निर्मिती व वाहतूक साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय आंतरराज्यातील अधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार आज एक लाख वीस हजार सातशे वीस रुपयांचे अवैध मद्य जप्त करण्यात आले आहे. मद्याचे ७२ बॉक्स संबंधितांकडून ताब्यात घेतले. यांनी केली कारवाई ही कारवाई दादरा नगर हवेलीचे उत्पादन शुल्क निरीक्षक रेहान तसेच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे डहाणू येथील निरीक्षक सुनील देशमुख, भरारी पथकाचे निरीक्षक अरुण चव्हाण, संभाजी फडतरे आदींनी केली. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या एक तारखेपासून दहा दिवसांत उत्पादन शुल्क विभाग भलता सक्रिय झाला असून, अवैध मद्याची वाहतूक, निर्मिती, साठवणूक आदी प्रकरणी या विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दहा दिवसांत या प्रकरणी ७७ गुन्हे दाखल झाले असून ६० जणांना अटक करण्यात आली आहे. सात वाहने जप्त करण्यात आली आहेत. निवडणूक काळात जातीने लक्ष उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, कोकण विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम, पालघर येथील उत्पादन शुल्क विभागाचे उपाध्यक्ष बी एन भुतकर यांच्या मार्गदर्शकाखाली ही कारवाई करण्यात आली. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अन्य राज्यातून अवैध मद्य, बोगस मद्य मोठ्या प्रमाणात येत असते. विशेषतः दीव-दमणचे मद्य महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात येत असल्याने उत्पादन शुल्क विभाग कारवाईसाठी सज्ज झाला आहे. कोट ‘विधानसभेची निवडणूक, मतदान आणि मतमोजणी या काळात राज्य उत्पादन शुल्क विभाग आंतरराष्ट्रीय कारवाया सुरू ठेवणार आहे. – सुधाकर कदम, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, पालघर

न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचा विद्यापीठाला विसर

रमेश औताडे मुंबई /सर्वोच्च न्यायालयाने अंध विद्यार्थ्यांच्या शाळा महाविद्यालय किंवा विद्यापीठ या ठिकाणी त्यांना उपयुक्त असणाऱ्या सोयी सुविधा मिळण्यासाठी एक मार्गदर्शक तत्त्व  पॉलिसी केली आहे. मात्र त्याचा विसर शाळा महाविद्यालय व विद्यापीठाला पडला असल्याने अंध विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.  सरकारने या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत राज्यातील सर्व शाळा महाविद्यालय व संबंधित शिक्षण यंत्रणा विद्यापीठ या ठिकाणी अंध विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधा साठी संबंधित आस्थापना व प्रशासनाला आदेश द्यावेत अशी मागणी अंध विद्यार्थ्यांनी केली आहे. रेल्वे बस विमानतळ आदी ठिकाणी अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीत मार्गदर्शक सूचना व मार्गिका यंत्रणा बसवल्या असतात. मात्र अनेक ठिकाणी आर्थिक कारणामुळे त्याचा  अभाव दिसून येतो. त्यामुळे अंध व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये अडथळे निर्माण होतात व अपघात होण्याची शक्यता अधिक असते अनेक ठिकाणी अपघातही झालेले आहेत. आर्थिक कारण देत अंध व्यक्तींच्या सोयीसुविधा कडे दुर्लक्ष करणारे सरकार कंत्रांटदाराकडून इतर बिनकामाचा व गरज नसलेला विकास सुरू असताना त्या वेळी कंत्राट दाराला आर्थिक कारण का दिले जात नाही ? असा सवाल अंध विद्यार्थी करत आहेत. दृष्टी असलेल्या समाजातील अन्यायग्रस्तांनी आंदोलनाचे अस्त्र उपसून आंदोलन सुरू केले आहे. त्यांना सरकार न्याय देऊ शकत नाही. मग आम्ही आंदोलन केले तर आम्हाला सरकार न्याय देईल का ?  असा सवाल अंध विद्यार्थी करत आहेत.

1608 देवी मूर्तींचे भक्तीपूर्ण विसर्जन करत नवरात्रौत्सवाची सांगता

  नवी मुंबई : श्रीगणशोत्सवाप्रमाणेच 3 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत उत्साहात संपन्न झालेल्या नवरात्रौत्सवातील विसर्जन सोहळा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 पारंपारिक विसर्जन स्थळांवर महानगरपालिकेने केलेल्या योग्य नियोजनव्यवस्थेमध्ये सुव्यवस्थित रितीने संपन्न झाला. महानगरपालिका क्षेत्रात 1437 घरगुती / सोसायटी मधील देवी मूर्ती  विसर्जनाप्रमाणेच 171 सार्वजनिक देवी मूर्तींचे विसर्जन असे एकूण 1608 देवी मूर्तींचे विसर्जन भक्तिमय वातावरणात करण्यात आले. यामध्ये बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 112 घरगुती / सोसायटी व 20 सार्वजनिक, नेरुळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 71 घरगुती / सोसायटी व 29 सार्वजनिक, वाशी विभागातील 2 विसर्जन स्थळांवर 138 घरगुती / सोसायटी व 11 सार्वजनिक, तुर्भे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 162 घरगुती / सोसायटी व 26 सार्वजनिक, कोपरखैरणे विभागात 2 विसर्जन स्थळांवर 151 घरगुती / सोसायटी व 42 सार्वजनिक, घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 304 घरगुती / सोसायटी व 9 सार्वजनिक, ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 86 घरगुती / सोसायटी व 23 सार्वजनिक आणि दिघा विभागात 1 विसर्जन स्थळावर 413 घरगुती / सोसायटी व 11 सार्वजनिक अशा एकूण 1437 घरगुती / सोसायटी व 171 सार्वजनिक अशाप्रकारे एकूण 1688 देवीमूर्तींना भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे यातील 48 मूर्ती शाडूच्या होत्या. या माध्यमातून गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रौत्सवातही पर्यावरणशील दृष्टिकोन जपण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 विसर्जन स्थळांपैकी मुख्य 14 विसर्जन तलांवांमध्ये जलप्रदूषण टाळण्यासाठी गॅबीयन वॉलची रचना करण्यात आलेली असून त्याच क्षेत्रात भाविकांनी देवीमूर्ती विसर्जन करून नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आवाहनानुसार जलाशयातील जैवविविधतेची जपणूक केली. सर्व 22 मुख्य विसर्जनस्थळांवर अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार व श्री. शिरीष आरदवाड, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली संबंधित विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांच्यासह विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच 200 हून अधिक स्वयंसेवक, लाईफगार्ड आणि अग्निशमन दलाचे जवान विसर्जन सोहळा सुव्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी दक्ष होते. देवी / घटांच्या सुयोग्य विसर्जनासाठी श्रीगणेशोत्सवाप्रमाणेच तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. आकाराने मोठ्या मूर्ती विसर्जित होतात अशा विसर्जन स्थळी फोर्कलिफ्टही ठेवण्यात आल्या होत्या. पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय सर्व 22 मुख्य विसर्जन स्थळांवर ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. त्याची वाहतुक स्वतंत्र निर्माल्य वाहनाव्दारे करण्यात आली. या निर्माल्याचे पावित्र्य राखण्याची काळजी घेत त्यावर प्रक्रिया करण्यासाठी तुर्भे येथील प्रकल्पस्थळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस यंत्रणाही सर्वच ठिकाणी अत्यंत सतर्कतेने कार्यरत होती. भाविकांच्या उत्तम सहकार्यामुळे नवरात्रौत्सव व देवी मूर्ती विसर्जन सोहळा शांततेत व सुव्यस्थितीत संपन्न झाला.  

नवोदित संघ, शिवमुद्रा प्रतिष्ठान कुमार गटाच्या अंतिम फेरीत

मुंबई:-नवोदित संघ, शिवमुद्रा प्रतिष्ठान यांनी शिवनेरी सेवा मंडळाने आयोजित केलेल्या कुमार गट कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. विशेष व्यावसायिक गटात गतविजेत्या भारत पेट्रोलियमसह इन्शोअर कोट, न्यू इंडिया एन्शो; रिझर्व्ह…

महाराष्ट्र राज्य कबड्डी पंच उजळणी शिबिर सांगलीत

  मुंबई:- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने १४ आणि १५ ऑक्टोबर या कालावधीत राज्य पंच उजळणी शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. दैवज्ञ भवन, कबाडे हॉस्पिटल, आकाशवाणी समोर, कोल्हापूर रोड, सांगली येथे हे दोन दिवसांचे शिबिर होईल. या शिबिरात नियमातील उजळणी बरोबरच पंचांची शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक संतुलन व एकाग्रता यावर देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिराचे उद्घाटन सोमवारी १४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता करण्यात येईल. या शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्व संलग्न जिल्हा संघटनेच्या पंचानी रविवारी सायंकाळी ७ नंतर शिबिरास्थळी उपस्थित रहावे असे राज्य कबड्डी संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी एका पत्रकाद्वारे सर्व प्रसार माध्यमांना कळविले आहे. अधिक माहितीकरिता सांगली जिल्हा संघटनेचे सचिव नितीन शिंदे – 9922508833, किंवा अनिल माने – 9860053587 यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. 00000

लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना पोटदुखी

पनवेल : महिला भगिनी आपल्या कुटुंबासाठी आयुष्यभर झटत असतात. या बहिणींना ताकद देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, मात्र ही योजना सुरू झाल्याने विरोधकांच्या पोटात दुखायला लागले आहे. ते ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. तरीही ही योजना बंद होणार नाही, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी ठणकावून सांगितले. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर महिलांकडून सरकारच्या या योजनेचे स्वागत केले जात आहे. याच महिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी पनवेलमधील सर्व महिला भगिनींसाठी खेळ पैठणीचा आणि लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून बेलवलीमध्ये हा कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महिलांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भष्टाचारी शेकापवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, तीन वर्ष झाली माजी आमदार विवेक पाटील हे कर्नाळा बँकेत घोटाळा केल्याने जेलमध्ये आहे. लोकांचे पैसे खाऊन जे तुरुंगात आहेत त्यांच्याच पक्षाने लोक येऊन सांगतात लाडकी बहीण योजना बंद होईल. त्यामुळे खोटं पसरवणारे कोण आहेत हे नीट पाहून घ्या. देशातील सरकार हे महिलांसाठी विविध योजना आणत आहेत, तर राज्यामध्ये महायुतीचे सरकार महिलांच्या हितासाठी काम करत आहे. या सर्व कल्याणकारी योजना सुरू राहण्यासाठी राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत यायला पाहिजे. यासाठी तुमचा आशीर्वाद महायुती सरकारच्या पाठिशी राहूद्या, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, अमरीश मोकल, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, माजी पं.स. सदस्य निलेश पाटील, जिल्हा चिटणीस भूपेंद्र पाटील, युवा नेते योगेश लहाने, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष कमला देशेकर, सरचिटणीस प्रतिभा भोईर, शिल्पा म्हात्रे, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, गव्हाण ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य योगिता भगत, उपाध्यक्ष समिना साठी, कोषाध्यक्ष ज्योती भोपी, मनिषा बहिरा, माजी नगरसेविका निता माळी, पल्लवी पाटील, मित्तल पाटील, बेलवलीच्या उपसरपंच अप्रिता पवार, सदस्य सविता पाटील, रेश्मा माळी, पूजा पाटील, निता मंजुळे, शिल्पा पवार, संगीता भुतांबरा, सतिश पाटील, अप्पा भागीत, जितेंद्र बताले, संतोष पाटील, नारायण म्हात्रे, अनंता पवार, नासीर शेख, राम भवर, भालचंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुरबाड विधानसभा मतदारसंघात निष्ठावंताच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

निष्ठावंतांच्या पाठीशी उभे राहणार : कपिल पाटील मुरबाड : भाजपा हा सर्व प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष असून, मुरबाड तालुक्यातील एका व्यक्तीचा तो पक्ष नाही. अशा व्यक्तींच्या जोखडातून भाजपाला मुक्त करणार असून, पक्षाची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. भाजपाच कार्यकर्ता स्वाभिमानी आहे अन, तो स्वाभिमानी राहील, अशी ग्वाही माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे दिली. भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांबरोबरच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असून, कोणावरही अन्याय होणार नाही, असा दिलासा कपिल पाटील यांनी दिला. भाजपाच्या मुरबाड विधानसभा मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा आज मुरबाड येथील माऊली हॉलमध्ये पार पडला. या मेळाव्याला मुरबाड मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण हॉल गच्च भरल्यानंतर हॉलचे आवार व हॉलबाहेर कार्यकर्ते उभे होते. या मेळाव्याला माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी भाजपाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, ज्येष्ठ नेते रामभाऊ पातकर, तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव, शरद म्हात्रे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष घरत, माजी नगरसेवक अण्णा कुलकर्णी, रामभाऊ बांगर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर, दीपक खाटेघरे, नारायण गोंधळी आदी उपस्थित होते. भाजपाचा कार्यकर्ता कसा मोठा होईल, याला आपण प्राधान्य दिले. पदावर नसलो, तरी भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आपण कायम पाठीशी राहू, अशी ग्वाही कपिल पाटील यांनी देऊन भाषणाला सुरुवात केली. लोकसभेला केलेल्या कामाप्रमाणेच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विधानसभेला दुप्पट काम करू, असा विश्वास व्यक्त केला. मुरबाड तालुक्यात विकास प्रकल्पे राबविताना शेतकऱ्यांच्या आपण कायम पाठीशी राहू. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला धमक्या दिल्या जातात. कल्याण-मुरबाड रेल्वे, शहापूर-मुरबाड रस्ता तयार करण्यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनीला चांगला मोबदला मिळेल, यासाठी आपण प्रयत्न केले. यापुढील काळातही शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही, असा इशारा कपिल पाटील यांनी दिला. कल्याण-मुरबाड रेल्वे, माळशेज घाटातील रस्त्याचे काम, शहापूर-मुरबाड रस्ता ही कामे केंद्र सरकारची आहेत. त्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणीही करु नये, असा टोलाही कपिल पाटील यांनी लगावला. 00000

पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र देशात नंबर वन – एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाणे खाडी पूल-३ च्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण व कोकणातील सात खाडी पूलांचे भूमीपूजन संपन्न अनिल ठाणेकर ठाणे : राज्याच्या कुठल्याही भागात गेलात तर सध्या सर्वत्र विविध प्रकल्प, विकास कामे सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जवळपास दोन लाख कोटींचे प्रकल्प राबवित आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र राज्य देशात क्रमांक एकवर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी वाशी येथे केले. सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. 3 च्या मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनी मार्गिकेचे उद्घाटन व रेवस ( रायगड ) ते रेडी (सिंधुदूर्ग) या सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांच्या कामांचे भूमीपूजन मुख्यमंत्री ना.श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज वाशी येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री ना.श्री. दादाजी भुसे, माजी खासदार राहुल शेवाळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर-पाटणकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.अनिलकुमार गायकवाड , सहव्यवस्थापकीय संचालक श्री.राजेश पाटील, मुख्य अभियंता श्री.राजेश निघोट , मुख्य अभियंता श्री.एस.के. सुरवसे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते .ठाणे खाडी पूल क्र.3 च्या उत्तर वाहिनीच्या लोकार्पणाबरोबर रेवस – रेडी सागरी महामार्गावरील धरमतर , कुंडलिका, आगरदांडा, बाणकोट, केळशी, जयगड आणि कुणकेश्वर या सात खाडी पूलांचे भूमीपूजन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पार पडले. स्थानिक स्तरावर प्रत्येक खाडी पूलाच्या कामाचे प्रत्यक्ष भूमीपूजन स्थानिक मान्यवर लोकप्रतिनिधींच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. या सात खाडी पूलांची एकूण लांबी २६.७० किलोमीटर असून त्यासाठी ७ हजार ८५१ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, रेवस ते रेडी सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांची मागणी राज्याच्या स्थापनेपासून होती.ती मागणी आज पूर्ण होतेय. हा योगायोग आहे . या खाडी पूलांमुळे कोकणाचा विकास होईलच, तसेच पर्यटनाला चालना मिळेल. कोकणवासियांसाठी ही दिवाळीची भेटच आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या माध्यमातून  राज्यात पाच हजार किमी लांबीचे द्रुतगती मार्गाचे ग्रीड नेटवर्क उभारणार आहोत. त्यामुळे राज्याच्या कुठल्याही भागातून कुठेही सहा ते सात पोहोचता येईल. ते म्हणाले, पनवेल ते सिंधुदूर्ग दरम्यानच्या कोकण ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वेचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांने हाती घेतले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते कोकण हे अंतर अवघ्या पाच तासात पार करता येईल .याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री श्री.दादाजी भुसे ठाणे खाडी पूल क्र.३ ची उत्तर वाहिनी या तीन पदरी पूलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास निश्चितच यश येईल, असा विश्वास व्यक्त करून म्हणाले की, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीच्या पूलाचे कामही अत्यंत वेगाने प्रगतीपथावर आहे. आज दुग्धशर्करा योग म्हणजे रेवस-रेडी या सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांचे भूमीपूजन एकाच वेळी होत आहे. या परिसरातील  निसर्गाला अनुरूप असे केबल स्टे व इतर प्रकारांच्या पूलांची निर्मिती रस्ते विकास महामंडळ अत्यंत कल्पकतेने करणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाच्या शेवटी ठाणे खाडी पूलाची मुंबईहून पुण्याला जाणारी उत्तर वाहिनी वाहतुकीसाठी सोमवार, १४ ऑक्टोबर पासून सुरु होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. चौकट प्रकल्पांची माहिती सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र.3, प्रकल्पामधील कामाचा वाव, प्रत्येकी 3 मार्गिकांचे 2 पूल बांधणे . (मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनीचे काम पूर्ण व पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीचे काम प्रगतीपथावर ) प्रकल्पाची एकूण किंमत : रु. 559 कोटी.पूलाची लांबी : 3180 मी. ( पोहोच रस्त्यासह ) सद्य:स्थितीत उत्तर वाहिनी पूलाचे काम पूर्ण करुन ती वाहतुकीसाठी सोमवार, दि.14 ऑक्टोबर पासून खुली करण्यात येणार आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीचे काम 80 % पूर्ण झाले आहे.रेवस ते रेडी (सिंधुदुर्ग) सागरी महामार्गाची* एकूण लांबी : 498 किमी.पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा महामार्ग, कोकण किनारपट्टीवरील सर्व सागरी किनाऱ्यांना कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर गतिमान महामार्गाने जोडणारा प्रकल्प. 00000

दिनेश पवार यांना सुवर्णपदक

 कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धा  मुंबई : द.आफ्रिका येथे सन सिटी या शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत  मास्टर१ (४० वर्षावरील पुरुष) या गटात 75 किलो वजनी गटात रायगडच्या “दिनेश हरिचंद्र पवार’यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिम मध्ये सराव करतात. यापूर्वी सुद्धा त्यांनी  आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकली  आहेत. दिनेश पवार यांच्या यशात त्यांच्या मातोश्री गीता हरिचंद्र पवार आणि पत्नी रेशमा दिनेश पवार यांचा  देखील मोठा  वाटा  आहे. पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड चे अध्यक्ष गिरीश वेदक यांनी पवार यांचे खास अभिनंदन केले आहे.  महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय प्रतापराव सरदेसाई यांचे  सुद्धा मार्गदर्शन  पवार यांना मिळाले. ००००

श्री गणेश आखाड्याच्या कुस्तीपटूंचे यश

मुंबई : जिल्हा क्रीडा परिषद, रायगड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड आणि पोलिस मुख्यालय, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कळंबोली येथे  आयोजित करण्यात आलेल्या  मुंबई विभाग अंतर्गत शालेय कुस्ती स्पर्धेत मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील मल्लांनी ४ सुवर्ण व ५ कांस्य पदकांची कमाई केली. त्यांच्या ओम जाधव, मनस्वी राऊत, कोमल पटेल, डॉली गुप्ताने सुवर्ण पदक   पटकावली. तर कविता राजभर, स्नेहा गुप्ता, सुप्रिया‌ गुप्ता, शिवांश जालुई आणि आर्दश‌ शिंदे यांनी कांस्य पदके‌ मिळविली. प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या पैलवानांची निवड राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेकरिता करण्यात आली आहे. पदक विजेत्यांना वस्ताद वसंतराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. श्री गणेश आखाड्यातर्फे सर्व पदक विजेत्यांचे खास अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांना   पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा देखील देण्यात आल्या.