Month: October 2024

अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी

दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी मुंबई : अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी आली असून त्यात धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने दोन कोटी रुपये खंडणीची मागणी केली आहे. वाहतूक पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर ही धमकी देण्यात आली. याप्रकरणी वरळी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. वाहतूक पोलिसांना मंगळवारी याबाबत संदेश प्राप्त झाला आहे. आरोपीने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली असून दोन कोटी रुपये न दिल्यास सलमानला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. यापूर्वीही सलमानला अशा प्रकारे धमकी देण्यात आली होती. मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदत क्रमांकावर धमकीचा संदेश आला असून संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई टोळीतील वाद मिटवण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी झारखंडमधील एका २४ वर्षीय भाजी विक्रेत्याला वरळी पोलिसांनी अटक केली होती. आरोपीने टीव्ही पाहून सलमानला धमकवण्याचा कट रचून वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी आणखी एक संदेश पाठवून आरोपीने माफीही मागितली होती. तसेच आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयातही धमकी देणाऱ्याला नुकतीच अटक करण्यात आली. आरोपीने झिशान सिद्दिकीसोबत सलमानलाही धमकावले होते.

निवृत्तीवेतनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत हयात दाखले सादर करावेत – देवीदास टोंगे

अशोक गायकवाड रायगड : शासनाच्या ज्या निवृत्तीवेतनधारकांना रायगड जिल्हा कोषागाराकडून निवृत्तीवेतन प्रदान केले जाते अशा सर्व निवृत्तीवेतनधारकांनी १ ते ३० नोव्हेंबर रोजी हयात असल्याबाबतचे हयात प्रमाणपत्र” या कालावधीत सादर करावेत, असे आवाहन रायगड जिल्हा कोषागार अधिकारी रायगड-अलिबाग देवीदास टोंगे यांनी केले आहे. निवृत्तीवेतनधारकांचे हयात प्रमाणपत्र विहित मुदतीत कोषागारात प्राप्त झाल्याशिवाय पुढील निवृत्तीवेतन प्रदान केले जाऊ शकत नाही. बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेणा-या निवृत्तीवेतनधारकांनी कोषागार कार्यालयाकडून संबंधित बँकेकडे पाठविण्यात आलेल्या घोषणापत्रावर स्वतः हयात असल्याबाबत बँक व्यवस्थापक यांच्या समक्ष दिनांकित स्वाक्षरी करावी. पुनर्नियुक्त/पुनर्विवाह केलेल्या कुटुंब निवृत्तीवेतन/निवृत्तीवेतनधारकांकरिता नियमित नमुना वापरावा. मनिऑर्डरद्वारे निवृतीवेतन घेणा-या निवृत्तीवेतनधारकांचे हयात दाखल्यांचे नमुने या कोषागार कार्यालयाकडून संबंधितांच्या पत्त्यावर पाठविण्यात आलेले आहेत. त्यांनी स्वतःचे हयात दाखले स्वाक्षरीसह पूर्ण करुन कोषागार कार्यालयाकडे परस्पर पाठविण्याची व्यवस्था करावी. तसेच अधिक माहितीसाठी रायगड जिल्हा कोषागार कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा कोषागार अधिकारी देवीदास टोंगे यांनी केले आहे. 00000

– गजानन मार्केटमधील कपड्यांच्या दुकानाला आग

कपड्यांचे लाखो रुपयांचे नुकसान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट सुनिल इंगळे उल्हासनगर : उल्हासनगरच्या गजबजलेल्या कॅम्प दोन मधील गजानन मार्केटमध्ये अचानक लागलेल्या भीषण आगीने खळबळ उडवली आहे. या आगीत एका कपड्याचे दुकान जळून खाक झाले असून, दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य काही क्षणातच राख झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने दाखल झाल्या असून, जवानांनी आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवले आहे. सकाळी अचानक आगीची घटना घडली, आणि ती पाहताच मार्केटमधील व्यापारी आणि ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. आगीच्या तीव्रतेमुळे गजानन मार्केटच्या इतर दुकानदारांनी त्यांच्या दुकानांमधील माल बाहेर काढण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच आग एवढी पसरली की दुकानातील संपूर्ण कपड्यांचे साहित्य जळून खाक झाले. मार्केटमधील व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागले असून, पुढील काही दिवसांमध्ये त्यांचा व्यवसाय कसा उभा राहणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते. मोठ्या प्रयत्नांनंतर काही प्रमाणात आग आटोक्यात आली असून, जवळपासच्या इमारतींना कोणताही धोका पोहोचू नये याची खबरदारी घेतली जात आहे. मात्र, या आगीच्या दुर्घटनेने मार्केटमधील अन्य दुकानदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर विचार सुरू झाला आहे. घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे, आणि प्रशासनाने मार्केटमधील दुकानदारांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

 ट्रेडिशनल स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचे देदीप्यमान यश

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा   ठाणे : दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा २२ ऑक्टोबरला घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये  ट्रेडिशनल स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी विजय प्राप्त केला. जिल्ह्यातील विविध शाळांमधील खेळाडू…

९ आणि १० नोव्हेंबर रोजी ठाण्यात सायन्स ऑफ हिलिंग शिबिर

मुंबई : शक्तीशाली मंत्रसाधनेद्वारे मधुमेह, हृदयविकार, फ्रोजन शोल्डर, मणक्यांचे विकार इ. जुनाट आजारांवर तात्काळ सकारात्मक बदल घडवून आणणारे तसेच प्रत्येकातील रोगनिवारण शक्ती जागृत करणारे, ‘अंतर योग’ या फोर्ट, मुंबई स्थित…

 राज्यपालांच्या हस्ते ‘वस्त्ररत्न’, ‘वस्त्रभूषण’ ‘वस्त्र शिरोमणी’ पुरस्कार प्रदान,

भारतीय वस्त्रोद्योगाला पुढील १०० वर्षे उत्तम भवितव्य : राज्यपाल अशोक गायकवाड मुंबई :कृषीनंतर वस्त्रोद्योग हे सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र आहे. शिक्षित तसेच अशिक्षित लोकांना सामावून रोजगार मिळवून देणारे हे देशातील महत्वाचे क्षेत्र आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रात आधुनिकीकरण व कालानुरूप बदल केल्यास पुढील किमान १०० वर्षे भारतीय वस्त्रोद्योगाला उत्तम भवितव्य राहील. मात्र जोवर आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक होत नाही तोवर या वस्त्रोद्योग क्षेत्रात आघाडीवर राहता येणार नाही, असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉटन टेक्सटाइल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (टेक्सप्रोसिल) या संस्थेचा ७० वा वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा हॉटेल जे डब्ल्यू मॅरिअट, सहार मुंबई येथे सोमवारी आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिषदेच्या संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला टेक्सप्रोसिलचे अध्यक्ष सुनील पटवारी, केन्द्रीय वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी, टेक्सप्रोसिलचे उपाध्यक्ष विजय अग्रवाल, कार्यकारी संचालक डॉ. सिद्धार्थ राजगोपाल आणि परिषदेचे सदस्य उपस्थित होते.जगातील प्रत्येक प्रगतिशील देशांच्या विकासात वस्त्रोद्योग क्षेत्राचे योगदान मोठे असल्याचे सांगून देशांची अर्थव्यवस्था वाढते तेंव्हा दुर्दैवाने वस्त्रोद्योग क्षेत्रावरच प्रथम विपरीत परिणाम होतो असे राज्यपालांनी सांगितले. वस्त्रोद्योग क्षेत्रात अनेक हितधारक असतात. त्यामुळे प्रत्येक हितधारकाची काळजी न घेतल्यास उद्योग कोसळेल असे राज्यपालांनी सांगितले. आपण स्वतः वस्त्रोद्योग निर्यात संस्थेचे सदस्य होतो. सन २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना वस्त्रोद्योग क्षेत्र मोठे योगदान देईल असा विश्वास वाटतो. या संदर्भात वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांना काही अडचण आल्यास आपण केंद्र सरकारकडे व्यक्तिशः पाठपुरावा करू असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिले.राज्यपालांच्या हस्ते भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘कॉटन मॅन ऑफ इंडिया’ सुरेश कोटक यांना ‘वस्त्र शिरोमणी’ पुरस्कार देण्यात आला. संजय जयवर्थनलू (वस्त्र विभूषण) व राजेंद्रकुमार दालमिया (वस्त्र भूषण) यांना देखील सन्मानित करण्यात आले. अनिल कुमार जैन, एम. नाचिमुथू, दीपाली गोयंका, राजिंदर गुप्ता, एस पी ओसवाल, कुलिन लालभाई आदींना यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘वस्त्र रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ग्रामीण भागातील आगळी-वेगळी दिवाळी

  खर्डी : दीपावली म्हणजे आनंदाची उधळण, फराळाची मेजवानी, फाटक्यांची आतषबाजी, दिव्यांची आरास, रांगोळीची सजावट, विद्युत दीपमाळा व आकाश कंदिलांची घराघरांवर केलेली रोषणाई असे चित्र असते; मात्र शहापूरसारख्या ग्रामीण भागात वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. दीपावली, बलीप्रतिपदा व पाडवा या दिवशी उंबरखांड, दहिगाव, अजनूप, शिरोळ, टेंभा, दळखण, बेलवड व बीरवाडीसह ग्रामीण भागातील शेतकरी सकाळी जनावरांचा गोठा शेणाने सारवतात. त्यानंतर जनावरांना आंघोळ घातली जाते. त्यांना रंगवले जाते. तसेच, फुग्यांनी सजवून गावच्या वेशीवर नेतात. त्यानंतर तेथे पेंढा किंवा गवत पेटवून त्यावरून या जनावरांना उड्या मारायला लावतात. दिवाळीच्या दिवशी जनावरांना अग्निवरून उडी मारायला लावल्यास त्यांना कोणतेच आजार होत नाहीत, अशी ग्रामस्थांची श्रद्धा असल्याचे शेतकरी कैलास म्हसकर सांगतात. दारासमोर रांगोळी काढून त्यावर गुरांच्या शेणाचे पाच पूंजक ठेवतात. त्यावर झेंडुची फूले ठेवली जातात. नंतर हे पूंजक सुकल्यावर शेतात सर्वत्र टाकतात. त्यामुळे शेतात चांगले पीक येते, असे शेतकरी सदानंद घरत, नितीन सांडे व सखुबाई हिलम यांनी सांगितले. खर्डीतील काही संस्था खेड्यापाड्यातील आदिवासी बांधवाच्या घरोघरी जाऊन फराळ व मिठाईचे वाटप करतात. पाडव्याच्या दिवशी नागरिक एकमेकांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देतात. अशाप्रकारे पूर्वापार चालत आलेली परंपरा आजही ग्रामीण परिसरात सुरू आहे. दिवाळी हा सण साजरा करण्यासाठी सर्व कुटुंबे एकत्रित येतात. विशेषतः ग्रामीण भागात दिवाळी उत्साहाने साजरी केली जाते. शेणाच्या गवळणी, पेंद्या तयार करून त्याची पूजा केली जाते. ज्यांच्याकडे जनावरे नाहीत, ते मातीच्या गवळणी आणि पेंद्या तयार करतात. काही गावांमध्ये या काळात जनावरांचे पूजन केले जाते. त्याचबरोबर नरक चतुर्दशीच्या दिवशी भाऊबीज साजरी करण्याची पद्धत आहे. झेंडूच्या फुलांचे तोरण घरांना पिवळ्या आणि नारंगी झेंडूच्या फुलांचे तोरण लागलेले पाहायला मिळते. अवघं घर फुलांनी सजवले जाते. ग्रामीण भागातील फराळात सहसा चिवड्याचे विविध प्रकार, पारंपरिक रव्याचे लाडू, करंजी, चकल्या, अनारसे व शेव असे विविध चविष्ट पदार्थ बनवले जातात. ते मित्र परिवारात वाटून आनंद द्विगुणित केला जातो. फटाक्यांची आतषबाजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मातीच्या कुंड्या विकत आणल्या जातात. त्या घरी बनवून त्यात बत्ताशे टाकतात. त्यावर दिवा लावला जातो. याची शेतकरी मनोभावे पूजा करतात. घरातील मौल्यवान वस्तू, वाहन, अवजारे याचीही पूजा केली जाते. या दिवशी मोठ्या प्रमाणावर आतषबाजी केली जाते. शाळकरी मुले ही किल्ला बनवण्यात व्यस्त असतात. पाडव्याच्या दिवशी पती-पत्नी जोडीने बसून पूजा करतात. पत्नी- पतीला ओवाळते, तेव्हा पत्नीला दिवाळी भेटवस्तू देण्याची प्रथा आहे.  

मतदार जागरुकतेच्या कार्यक्रमांना वेग

वाशी : विधानसभा निवडणूक मतदार जागरूकता कार्यक्रमांतर्गत ऐरोली व बेलापूर या नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात स्वीप कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वीपचे नोडल अधिकारी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना मतदान करण्याकरिता प्रोत्साहित करण्यात येत आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघातील ऐरोली सेक्टर १७ येथील पोस्ट ऑफिसमध्ये स्वीप पथकाने जाऊन तेथील अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांचे मतदान करण्याविषयी प्रबोधन केले. त्याचप्रमाणे महापालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयातही डॉक्टर, नर्स, तेथील रुग्णालयीन कर्मचारी यांना भेटून मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्याशीही संवाद साधून त्यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. तुर्भे प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातही स्वीप पथकाने भेट देऊन डॉक्टर, नर्स व तेथे उपस्थित असलेल्यांना मतदान करण्याविषयी प्रोत्साहित केले. घणसोली रेल्वे स्थानकावरील रिक्षाचालकांशी सुसंवाद साधत त्यांना मतदान करण्याविषयी आवाहन करत रिक्षावर मतदानाचा संदेश असलेले स्टीकर्स लावण्याविषयी सांगण्यात आले. मतदानाची प्रतिज्ञा ग्रहण, रॅली स्वीप पथकाने ऐरोली येथे फटाके विक्रीच्या स्टॉलला भेट देऊन विक्रेते व ग्राहक यांनाही मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. बेलापूर विधानसभा मतदारसंघातही सेक्टर २५ येथील समाजमंदिर सभागृह, जुईनगर, नेरूळ या ठिकाणी उपस्थित नागरिकांना २० नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचे आवाहन करत त्यांना मतदानाचे महत्त्व सांगण्यात आले. तुर्भे गाव सेक्टर २३ व सेक्टर २२ या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर रॅली काढली व उपस्थितांना मतदानाचे आवाहन करण्यात आले. सर्व ठिकाणी मतदानाची प्रतिज्ञा ग्रहण करण्यात आली.

निवडणूक निरीक्षक ठेवणार निवडणूक प्रक्रियेवर लक्ष – किशन जावळे

रायगड : अशोक गायकवाड रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात निवडणुका शांत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत देखील या मतदारसंघांसाठी खर्च, सर्वसाधारण तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठी स्वतंत्र निरीक्षक नेमण्यात आले आहेत. हे सर्व निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून ते संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघांसाठी ४ सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहे. या सर्व निवडणूक निरीक्षक यांचे जिल्ह्यात आगमन झाले असून जिल्हाधिकारी जावळे यांनी त्यांचे स्वागत केले आहे. १८८ पनवेल, १८९ कर्जत मतदार संघासाठी साठी दुनी चंद राणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १९० उरण आणि १९१ पेण मतदार संघासाठी संतोष कुमार राय तर १९२ अलिबाग अलिबाग मतदार संघांसाठी श्रीमती रुही खान, १९३ श्रीवर्धन आणि १९४ महाड साठी सतीश कुमार एस यांची नियुक्ती करण्यात आली आहे मतदारसंघात उमेदवारांच्या नामनिर्देशन प्रक्रियेपासून ते मतमोजणीपर्यंत सर्व महत्वाच्या टप्प्यांवर प्रत्यक्ष उपस्थित राहून हे सर्व साधारण निरीक्षक पाहणी करतील. तसेच मतदान यंत्रे व मतदान अधिकारी/कर्मचाऱ्यांची दुसरी सरमिसळ, उमेदवारी अर्ज छाननी, प्रक्रिया, प्रत्यक्ष मतदानाचा दिवस, मतदानानंतर निवडक मतदान केंद्रांच्या संविधानिक कागदपत्रांची छाननी, मतमोजणी व विजयी उमेदवाराची घोषणा यासर्व प्रसंगी हे निरीक्षक उपस्थित राहतील. निवडणूकांदरम्यान, कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी पोलिस निवडणूक निरीक्षक म्हणून स्वप्नील ममगाई यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. समाजातील विविध घटकांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग, कायदा– सुव्यवस्था याबाबत हे निरीक्षक आयोगाला अहवाल सादर करतील.

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी १३ मतदारसंघांत बंडोबा जोरात

  ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी १३ मतदारसंघांत महायुती अथवा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध त्याच पक्षाच्या किंवा मित्रपक्षाच्या इच्छुकांनी बंडखोरी केली आहे. ठाणे शहर, ओवळा-माजिवडा, मुंब्रा-कळवा, डोंबिवली व शहापूर या पाच विधानसभा मतदारसंघांत ठळक बंडखोरी दिसत नाही. महायुती व महाविकास आघाडीमधील प्रत्येकी तीन पक्षांतील इच्छुकांची संख्या जास्त असल्याने व पक्षांमध्ये समन्वय नसल्याने घाऊक बंड झाले आहे. आता येत्या ४ नोव्हेंबरपूर्वी बंडोबांना थंड करण्याचे आव्हान सर्वच पक्षांपुढे आहे. ४ नोव्हेंबरनंतर नेमक्या किती मतदारसंघांत किती बंडखोर राहतात, हे स्पष्ट होईल. पाचपाखाडीमध्ये… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडीतून स्व.आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे उद्धवसेनेतर्फे रिंगणात उतरले आहेत. येथे काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. मविआच्या मतविभाजनाचा शिंदे यांना फायदा होऊ शकतो. ऐरोली, बेलापुरात… ऐरोली मतदारसंघात गणेश नाईक (भाजप) विरुद्ध उद्धवसेनेचे एम.के. मढवी अशी लढत असताना शिंदेसेनेच्या विजय चौगुले यांनी रिंगणात उडी मारली आहे. बेलापूरमध्ये गणेश नाईक यांचे पुत्र संदीप यांनी अलीकडेच शरद पवार गटात प्रवेश करून भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याविरोधात बंड केले. शिंदेसेनेचे विजय नहाटा यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. मीरा-भाईंदरमध्ये भाजपला भीती? मीरा-भाईंदरमध्ये गेल्या वेळी अपक्ष निवडणूक लढवून विजयी झालेल्या गीता जैन यांनी आणि भाजपचे नेते नरेंद्र मेहता यांनी अर्ज दाखल केला होता. भाजपने ऐनवेळी गीता जैन यांना डावलून मेहता यांनी उमेदवारी दिली. त्यामुळे जैन यावेळीही पुन्हा अपक्ष रिंगणात आहेत. याखेरीज भाजपमधील सुरेश खंडेलवाल (अपक्ष), अजित पवार गटाचे अरुण कदम (अपक्ष) यांनीही बंडाचे निशाण फडकवले आहे. कल्याण ग्रामीणचा तिढा कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील विजयी झाले होते. मनसेने लोकसभेत दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करण्याकरिता पाटील यांच्या विरोधात अर्ज दाखल न करण्याकरिता भाजपचा दबाव असतानाही शिंदेसेनेचे राजेश मोरे यांनी रिंगणात उडी घेतली आहे. कदाचित मुंबईतील माहीम व कल्याण ग्रामीणचा तिढा एकाच वेळी सुटेल. कल्याण पूर्व आणि पश्चिम कल्याण पूर्वेत भाजपने सुलभा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांची लढत उद्धवसेनेच्या धनंजय बोडारी यांच्याशी असतानाही शिंदेसेनेचे महेश गायकवाड (अपक्ष) यांनी, तर काँग्रेसच्या सचिन पोटे (अपक्ष) यांनी अर्ज दाखल करून दोन्ही अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढवली आहे. कल्याण पश्चिममध्ये शिंदेसेनेच्या विश्वनाथ भोईर यांच्या विरोधात नरेंद्र पवार व वरुण पाटील या भाजपच्या इच्छुकांनी अर्ज दाखल केले. काँग्रेसचे राकेश मुथा व राजाभाऊ पातकर यांनी बंडखोरी करून उद्धवसेनेचे सचिन बासरे यांची चिंता वाढविली आहे. उल्हासनगरात काय? उल्हासनगरात भाजपचे कुमार आयलानी व शरद पवार गटाचे ओमी कलानी, असा सामना असताना अजित पवार गटाचे भरत गंगोत्री यांनी रिंगणात उडी घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या मतांचे विभाजन होण्याची भीती आहे. अंबरनाथ, मुरबाडमध्ये चिंता कुणाला? अंबरनाथमध्ये सुमेध भवार या काँग्रेस पदाधिकाऱ्याने बंड केले आहे. मुरबाडमध्ये किसन कथोरे विरुद्ध सुभाष पवार या लढतीत शरद पवार गटाचेच शैलेश वडनेरे यांच्या बंडामुळे पक्षाची चिंता वाढली. भिवंडी पूर्व, पश्चिम वादात भिवंडी पूर्वेत सपाच्या रईस शेख यांच्या विरुद्ध उद्धवसेनेच्या रूपेश म्हात्रे यांनी शड्डू ठोकला, तर भिवंडी ग्रामीणमध्ये भाजपच्या स्नेहा पाटील यांनी शिंदेसेनेचे शांताराम मोरे यांच्या विरोधात मैदानात उडी घेतली. भिवंडी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसच्या दयानंद चोरघे यांच्या विरोधात काँग्रेसचे विलास पाटील यांनी बंड केले आहे. एमआयएमकडून तुरुंगात असलेले खालिद गुड्डू व वारीस पठाण यांचेही अर्ज आहेत. 0000