Month: October 2024

कमलाबाई कडवे स्मृती कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी ६० मुलींमध्ये चुरस  

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने होणारी क्रीडाप्रेमी स्व. कमलाबाई रामचंद्र कडवे स्मृती चषक १६ वर्षाखालील मुलींची विनाशुल्क कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी मुंबई शहर व उपनगर, ठाणे,…

जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या टाकेदेवी मंदिरात सुरु असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांच्या सेवेसाठी आमदार महेश बालदी यांनी मोफत चहापाण्याची व्यवस्था करून दिली आहे. दांडफाटा येथील टाकेदेवी जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.…

कळसुबाईच्या शिखरावर ‘तरुणा’ची सायकलवारी!

Photo-1    सव्वा वर्षात १५ हजार किलोमीटरचा सायकल प्रवास  सायकलिंग मधील हाफ एवरेस्टींग पूर्ण योगेश चांदेकर पालघरः ‘तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच भरत राहो!  वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो!’ सुरेश भट यांच्या कवितेच्या या ओळी. तरुण म्हणजे किती वयाचा असे विचारले जात असले, तरी तारुण्य हे वयावर नाही, तर मनावर अवलंबून असते, हे अनेकांनी आपल्या कृतीतून वारंवार दाखवून दिले आहे. पालघर तालुक्यातील बोईसर येथील रामदास तातोबा जाधव या ५२ वर्षाच्या ‘युवका’ने चप्पल न घालता सायकलवर महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखर गाठून एक नवा पराक्रम नोंदवला आहे. सव्वा वर्षात त्यांनी पंधरा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण केला असून सायकलिंग मधील हाफ एवरेस्टींग पूर्ण केले आहे. तरुणपण आणि वार्धक्य हे शारीरिकदृष्ट्या वेगवेगळे असले, तरी ते जसे शरीराशी संबंधित आहे, तसे ते मनाशी संबंधित आहे. सजीवसृष्टीतील प्रत्येक वनस्पती आणि प्राण्यांच्या आयुष्यात फुलण्याचे दिवस अगदी थोडेच असतात. वनस्पतींना कळ्या येऊन फुले येऊ लागली, की त्यांच्या आयुष्यातल्या भरणीचे दिवस सुरू होतात. मानवाच्या आयुष्यातले तारुण्याचे दिवस म्हणजे आयुष्यरुपी वृक्षाला सुंदर फुलांनी मोहरलेला बहर असतो. फुललेले रोपटे असो किंवा एखादा वृक्ष; तो जसा आजूबाजूचे परिसरातल्या इतर सजीवांना आकर्षित करतो, तसेच तारुण्यातली सतेज कांती, प्रफुल्ल चेहरा चालण्या- बोलण्यातला रुबाबदारपणा असे तरुण व्यक्तीचे व्यक्तिमत्व सर्वांना भुरळ पाडत असते. अवघ्या ५२ मध्येही यौवनात मी! फुले जशी लवकर कोमेजतात तसेच तारुण्याचे दिवस झर्रकन निघून जातात. फुलासारखे तारुण्यही कोमेजू लागते, हा निसर्ग नियम असला, तरी माणसाच्या बाबतीत मात्र शरीर तारुण्य आणि मन याचा परस्परांशी अन्योन्य संबंध आहे. मनुष्याला आपल्या आयुष्याकडे सकारात्मकतेने पुढे बघण्याची, विचार करण्याची बुद्धी आहे; मात्र बहुतेक माणसांची विचार करण्याची बुद्धी नकारात्मक होते. आता माझे वय झाले. तारुण्य संपले असे रडगाणे अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात गात असतात. वयोमानानुसार शरीर थकलेले असले, तरी विचार करण्याची बुद्धी नकारात्मक असेल, तर मात्र खऱ्या अर्थाने माणूस वृद्ध होतो. रामदास जाधव मात्र त्याला अपवाद आहेत. छंद हा लागे जिवा, सायकलचा ठेवा! आयुष्यात सकारात्मक विचार असले, तर आपले मन चिरतरुण ठेवता येते. त्यामुळे विचारपुष्प कधीच थांबत नाही. त्याचा सुगंध वर्षानुवर्षे दरवळत राहतो. शरीराने वयस्कर असले आणि विचार आणि मनाने तरुण असणारे वृद्ध हे आयुष्याचा खऱ्या अर्थाने आनंद घेतात आणि त्यांचे विचार तारुण्यातील सगळ्यांना आकर्षित करतात. अशी माणसे सर्वांना हवीहवीशी असतात आणि ते इतरांना आपल्या जगण्यातून नवी दिशा देत असतात. इतरांच्या आयुष्यात नवनवीन पालवी फुटायला मदत करत असतात. जाधव हे असेच व्यक्तिमत्व आहे. कुणाला गिर्यारोहणाचा, कुणाला मोटरसायकलवर भटकण्याचा, कुणाला चित्रे जमवण्याचा, कुणाला सह्या गोळा करण्याचा तर कुणाला अन्य काहीही छंद असतो. रामदास जाधव यांनाही असाच एक छंद आहे; परंतु तो आगळा वेगळा आहे. अडचणी तुला पामराला! लोक पायी डोंगरकपाऱ्या पार करत असतात; परंतु जाधव मात्र सायकलवरून मोठमोठी शिखरे गाठत असतात. कोरोनाच्या काळात डहाणू आणि पालघर तालुक्यातील हौशी सायकलस्वारांनी एकत्र येऊन ‘बोईसर फ्लायर्स ग्रुप’ची स्थापना केली. रामदास जाधव या ग्रुपचे सदस्य असून गेल्या सव्वा वर्षात त्यांनी सायकल मोहिमात भाग घेतला. सव्वा वर्षात त्यांनी पंधरा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास केला आहे. सायकलवरील प्रेमापोटीच त्यांनी कळसुबाई शिखरावर सायकलने पोहोचण्याचा निर्धार केला. केवळ निर्धार करून ते स्वस्थ बसले नाहीत, तर १६४६ मीटर उंचीचे कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर त्यांनी सायकलवर गाठले. त्यासाठी बोईसर मधील दुर्गअसावा ते श्री क्षेत्र कळसूबाई असा सायकल  प्रवास व श्री क्षेत्र कळसुबाई पायथ्यापासून शिखरावर त्यांनी खांद्यावर सायकल उचलून त्यांनी असा प्रवास केला. ऑगस्टमध्ये अन्य भाविक, गिर्यारोहक आणि पर्यटकांची गर्दी असल्याने लोखंडी शिडीवरून सायकल नेताना त्यांना त्रास झाला; परंतु त्यावर त्यांनी मात केली. आता लक्ष्य एव्हरेस्ट मागील काही वर्षात एव्हरेस्ट मोहिमा विशेष लोकप्रिय होत आहेत. जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या एव्हरेस्टचे ८८४८ मीटर उंचीची चढाई करणे हे सोपे काम नाही; परंतु जाधव यांनी आतापर्यंत २२१२ मीटर उंचीएवढी चढाई एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल सात वेळा पूर्ण केली आहे. याचा अर्थ त्यांनी एव्हरेस्ट एवढ्या उंचीचे शिखर अनेकदा सायकलवारीने गाठले. ही मोहीम राबवताना दीड-दोन तासापेक्षा अधिक विश्रांती न घेता सलग कामगिरी पूर्ण करावी लागते. ही राईड ‘स्ट्रॉवा ॲप’ वर नोंदवून एव्हरेस्टिंग वेबसाईटवर खाते बनवून अपलोड करावे लागते. ‘हॉल ऑफ फेम एव्हरेस्टिंग’ मध्ये सायकलस्वार,देशाचे नाव व राईटचे सेगमेंट लिहावे लागते. त्यात सात वेळा रामदास जाधव यांचे व देशाचे नाव झळकले आहे. यापुढे सायकलिंग मधील फुलएवरेस्टींग  हा क्रीडा प्रकार करण्याचा त्यांचा मानस आहे. एलिवेशन म्हणजे जगातील कोणत्याही टेकडीवर एकाच दिशेने सतत वर खाली फेऱ्या मारणे. अशा प्रकारचे आव्हान रामदास जाधव यांनी स्वीकारले असून त्यांनी पालघर मधील वाघोबा घाट  पहाटे ४ वाजल्यापासून ते रात्री १  वाजेपर्यंत असा एक दिवसात ५६ वेळा चढ उतार करण्याचा पराक्रम केला आहे.

नवरात्रीत ध्वनीप्रदुषण केल्यास कारवाई

ठाणे : सणासुदीच्या काळात अतिउत्साहात नागरिक कायद्याचे उल्लंघन करतात; मात्र कायद्याचे उलंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे. नवरात्रोत्सवात लाऊडस्पीकर, डीजेच्या आवाजावर निर्बंध ठेवणे गरजेचे आहे. अतिउत्साहात मंडळाने ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे. ठाणे संस्कृतीचे शहर आहे. शहरात मोठ्या प्रमाणात विविध सण जल्लोषात साजरे करण्यात येतात. तसेच, मिरवणुकीच्या वेळी ध्वनिक्षेपकाचा (लाऊडस्पीकर) वापर करण्याला परवानगी असल्याने मंडळे विविध प्रकारच्या अत्याधुनिक साधनसामग्रीच्या ध्वनिक्षेपकाचा, डॉल्बी, डीजेचा वापर करतात. ज्यात ध्वनीचे प्रमाण जास्त असल्याने सामान्यजनतेच्या आरोग्य व मानसिक स्वास्थावर विपरीत परिणाम होतो. सण–उत्सव सर्व नागरिकांना उत्साहात साजरे करता यावेत, या निखळ भावनेने आयुक्तांनी ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत जनतेला जाहीर आवाहन केले आहे. उत्सव साजरा करताना कायद्याचे उल्लंघन करण्यात येऊ नये, अन्यथा ध्वनिप्रदूषण अधिनियमानुसार पाच वर्षांपर्यंत कैद आणि एक लाखाचा दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच, रात्री दहा ते पहाटे सहापर्यंतच्या कालावधीत ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये. तर, ठरावीक ठिकाणी ध्वनिक्षेपकाला परवानगी रात्री बारा वाजेपर्यंत राहणार आहे.

काशिमिऱ्यात घोडागाड्यांची शर्यत

  ६ घोडे जप्त, तिघांना अटक वसई : मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळील वरसावे येथे घोडागाडी शर्यत आयोजित करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्राण्यांसाठी काम करणार्‍या पेटा संस्थेने दिलेल्या तक्रारीनुसार काशिगाव पोलिसांनी कारवाई करून ६ घोड्यांची सुटका केली आणि ३ जणांना अटक करण्यात आली आहे. वरसावे पुलावर मध्यरात्री घोडागाडी शर्यत होणार असल्याची माहिती पेटा (पिपल फॉर द एथिकल ट्रिटमेंट ऑफ ॲनिमल) या प्राण्यांसाठी काम करणार्‍या संस्थेने मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांना दिली होती. त्यानुसार मध्यरात्री काशिगाव पोलिसांनी या वरसावे नाका परिसरात गस्त घातली होती. रात्री साडेबाराच्या सुमारास काही तरुणांचा गट घोडागाडी शर्यत करत असल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने त्यांना अडवून ताब्यात घेतले आणि घोड्यांची सुटका केली. या कारवाईत ओवीन डिमेलो, रन्सी कालतील आणि बेनी परेरा या तिघांना अटक केली आहे. घोडागाडी शर्यत लावून प्राण्यांना क्रूर वागणूक देणे, सार्वजनिक रहदारीस अडथळा आणल्याबद्दल भारतीय न्याय दंडसंहितेच्या कलम २९१, २८१, १२५, ३(५) तसेच प्राण्यांचा छळ प्रतिंबधक अधिनियम १९६० च्या कलम ११(१) (अ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी भाईंदरच्या उत्तन गाव परिसरात राहणारे असून ऊरूस यात्रेच्या निमित्ताने त्यांनी ही बेकायदेशीर घोडागाडी शर्यत लावली होती. पोलिसांनी या कारवाईत ६ घोड्यांची सुटका केली असून त्यांना वसईच्या सकवार येखखील पशू आश्रमात ठेवण्यात आले आहे.

..तर पालिका मुख्यालयावरुन उडी मारणार

कत्तलखान्याविरोधात नरेंद्र मेहता आक्रमक भाईंदर : भाईंदरच्या उत्तन येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या कत्तलखान्यास भाजपने विरोध केला आहे. हा निर्णय मंगळवारपर्यंत मागे न घेतल्यास महापालिकेच्या मुख्यालयावरून उडी मारणार असल्याचा इशारा माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला. यामुळे कत्तलखान्याच्या मुद्यावरून शहरातील राजकीय वातावरण पेटणार आहे. उत्तन येथील शासकीय जागेवर ४० कोटी रुपये खर्चून कत्तलखाना उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मिरा भाईंदर महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या कत्तलखान्यास मिरा भाईंदर भाजप पक्षाने विरोध केला आहे. या संदर्भात रविवारी माजी आमदार नरेंद्र मेहता व जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोध केला. मुळात या कत्तलखान्याची गरज नव्हती. कत्तलखाना उभारण्याचा निर्णय इतक्या झटपट पद्धतीने घेण्यात आला असल्यामुळे त्यातील निविदा प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. शहराला गरज नसताना नागरिकांच्या माथी हा कत्तलखाना लादला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय येत्या मंगळवारपर्यंत मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन करून पालिका मुख्यालयावरून उडी मारणार असल्याचा इशारा माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी यावेळी दिला. मिरा भाईंदर शहरात उत्तन येथे उभारण्यात येणारा नवा कत्तलखाना हा आमदार गीता जैन यांच्या मतदारसंघात आहे. जैन या सत्ताधारी पक्षाच्या आमदार असल्याने त्यांच्या संमतीनेच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप मेहता यांनी केला. या कत्तलखान्यास शहरातील जैन समाजासह अन्य स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. गीत जैन या देखील स्वतः जैन समाजातून येतात. कत्तलखान्याच्या मंजुरीमुळे गीता जैन यांचे ‘दाखवण्याचे व खाण्याचे दात वेगळे आहेत’ असे आरोप मेहता यांनी केला. निवडणुकीत कत्तलखाना मुद्याचा वापर मिरा भाईंदर शहरात हिंदूंसह मुस्लिम व ख्रिस्ती समाजातील नागरिक मोठ्या संख्यने राहतात. मांसहारी समाजाची संख्या जास्त असल्यामुळे शहरात स्वतंत्र कत्तलखाना उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. मात्र शहरात वर्चस्व असणार्‍या जैन समाजाला या कत्तलखान्यास विरोध आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जैन-मारवाडी समाजाला आपल्याकडे वळविण्यासाठी कत्तलखान्याला विरोधाचा मुद्दा भाजपने उचलला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्याचा राजकीय फायदा उठविण्याचाही भाजपचा प्रयत्न आहे.

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा १० ऑक्टोबरला दसरा मेळावा

 श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, अरुण गोडबोले, सोमनाथ घार्गे आदी मान्यवरांना सातारारत्न जाहीर मुंबई : आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने मुंबई आणि परिसरातील शहरांमधील सातारकरांचा भव्य दसरा मेळावा गुरुवार, १० ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी पाच वाजता दादर येथील शिवाजी मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख अतिथी महंत स. भ.मोहनबुवा रामदासी, विजयजी शिर्के , शिर्के ग्रुप, कायदेतज्ज्ञ ऍड.उदयजी वारुंजीकर,हास्यसम्राट भाऊ कदम तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना सातारा रत्न आणि सातारा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत. हे पुरस्कार जाहीर झालेले मान्यवर असे राजकीय रत्न – श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, कला रत्न – राहुल भंडारे, कामगार रत्न – मनोज धुमाळ, क्रीडा रत्न – विनया माने, साहित्य रत्न – अरुण गोडबोले , शैक्षणिक रत्न – अंजली गोडसे, सामाजिक रत्न – विकास  धनवडे, उद्योग रत्न – शिवाजीराव माने, पत्रकारिता – निलेश बुधावले, वैद्यकीय रत्न – डॉ. अरुण माने, कायदा रत्न – ऍड.पांडुरंग पोळ, प्रशासकीय रत्न – सोमनाथ घार्गे (भापोसे ), सहकार रत्न – विनायक गाढवे. याशिवाय सातारभूषण पुरस्कार सन्माननीय किरण सोनवणे, संपत शेवाळे, सुरेश गोडसे, प्राची कोल्हटकर-जांभेकर, कु.भार्गव जगताप यांना तसेच वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई यांना प्रदान करण्यात येणार आहेत. संघटनेचे अध्यक्ष नाना निकम, उपाध्यक्ष व माजी आमदार बाबुराव माने तसेच राजाराम शिंदे, महेश पवार, दिपक यादव, श्रीधर फडतरे, दिनकर गाढवे, दत्ताजीराव फाळके, अनिल जाधव, सुभाष चव्हाण, एकनाथ तांबवेकर, शिवाजीराव जाधव, अशोक चव्हाण, रमेश मोरे, पद्मावती शिंदे, आसावरी भोईटे, सागर घाडगे, समर्थ  देशमुख आदी विश्वस्त व इतर मान्यवर देखील उपस्थित राहतील. यावेळी  सोन वाटप करून दसरा साजरा केला जातो.अधिकाधिक सातारकरांनी यावेळी उपस्थित रहावे ,असे आवाहन आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. ०००००

गुळसुंदे येथील अभिनव सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवाला उरण विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांनी भेट देऊन दुर्गामातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

कल्याण पश्चिमेतील महत्त्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटी

सिमेंट काँक्रीटच्या रस्ते कामांचे भूमिपूजन कल्याण, ता. ६ (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांनी या निधीसाठी पाठपुरावा केला आहे. सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्यामुळे आता पावसाळ्यात उद्भवणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येतून कल्याणकरांची सुटका होणार आहे. या निधीच्या पहिल्या टप्प्यातील सिमेंट काँक्रीटीकरण कामाचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. दरवर्षी पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांसाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी अवस्था असते. आधी रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास आणि त्यानंतर धुळीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसाठी निधीची मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कल्याण पश्चिमेतील प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, तसेच पहिल्या टप्प्यात भगवा तलाव येथील आदेश्र्वर चौक ते विकास हाईट्स (४.९५ कोटी), सर्वोदय सागर ते गोविंदवाडी बायपास मुख्य रस्ता (४.९० कोटी) आणि उंबर्डे येथील जुन्या मराठी शाळेपर्यंतचा रस्ता (४.५० कोटी) अशा १४ कोटी ३५ लाखांच्या निधीतील सिमेंट काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले, तर उर्वरित निधीतून कल्याण शहरातील इतर प्रमुख रस्त्यांचेही येत्या काही दिवसांत भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती आमदार भोईर यांनी दिली. भूमिपूजन सोहळ्याला आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना उपनेत्या विजया पोटे, शहरप्रमुख रवी पाटील, महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे, विधानसभा संघटक श्रेयस समेळ, शहर संघटक नेत्रा उगले, माजी परिवहन समिती सदस्य सुनिल खारुक, विभागप्रमुख रामदास कारभारी, युवासेना राज्य सहसचिव प्रतीक पेणकर, लोकसभा विस्तारक सुचेत डामरे, शहर अधिकारी सुजित रोकडे आदी उपस्थित होते.

३०० घरेलु कामगारांना शासकीय लाभ!

तारामाऊली सेवाभावी संस्थेने मिळवून दिला  भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांचा पुढाकार ठाणे : तारामाऊली सेवाभावी संस्थेने पुढाकार घेऊन कोपरी परिसरातील ३०० घरेलु कामगार महिलांच्या कुटुंबाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभापाठोपाठ घरेलु कामगार कुटुंबांना भांड्याचे संच भेट म्हणून मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी घरेलु कामगारांच्या नोंदणीसाठी पुढाकार घेतला होता. हातावर पोट असलेल्या कोपरी परिसरातील सामान्य घरकामगार महिलांना भरत चव्हाण यांच्याकडून नेहमी सहकार्य केले जाते. त्यानुसार केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचे लाभ कुटुंबांना मिळवून दिले जातात. त्यानुसार घरेलु कामगारांच्या योजनेतून कोविड आपत्तीच्या काळात कोपरी परिसरातील ३०० हून अधिक घरेलु महिला कामगारांची नोंदणी करण्यात आली होती. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण, भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्यासह तारामाऊली सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून कोपरीतील घरेलु महिला कामगारांचे अर्ज भरुन घेण्यात आले होते. तसेच या अर्जासाठी कागदपत्र मिळविण्यासाठी महसूल विभागाच्या सहकार्याने दाखले शिबीर भरविण्यात आले होते. नोंदणीकृत घर कामगार भगिनींना महायुती सरकारने ३० भांडी असलेला गृह उपयोगी भांड्याचा सेट भेट म्हणून दिला आहे. कोपरी परिसरात या भांड्यांच्या संचाचे वितरण करण्यात आले. त्यावेळी या भगिनींनी महायुती सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, तारामाऊली सेवा संस्थेच्या माध्यमातून नुकतेच कोपरी भाग स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव कार्यरत असलेल्या सफाई कर्मचारी महिला भगिनींना साडीभेट देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.