Month: October 2024

अमराठी खासदाराने मराठी भाषेला दिला मान-सन्मान

माजी खासदार जनसेवक गोपाळ शेट्टी यांचा बोरीवली येथे भव्य नागरी सत्कार… राजेंद्र साळसकर मु़ंबई : घट स्थापनेच्या शुभ मुहूर्तावर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत असल्याची घोषणा केली. तमाम मराठी जनांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. उत्तर मुंबई तून दोनदा महाराष्ट्रात प्रथम येऊन प्रचंड मतांनी निवडून खासदार पदी निवडून आलेल्या गोपाळ चिनय्या शेट्टी या अमराठी खासदाराने निवडून आल्यानंतर सन २०१४ पासून सातत्याने संसदेत व संसदेच्या बाहेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे ही मागणी सातत्याने लावून धरली एवढेच नव्हे तर त्याचा पाठपुरावा केला. आज मराठी अस्मितेसाठी कटिबद्ध असणारे व मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याबद्दल माजी खासदार जनसेवक गोपाळ शेट्टी यांचा बोरीवली येथे भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजीत केला गेला. उत्तर मुंबई मध्ये अन्य भाषिक मतदारां बरोबरच मराठी भाषिक जनतेने माझ्यावर अलोट प्रेम केले व मला भरभरून मतदान केले त्या मराठी भाषिक जनतेचे ऋण मी यामुळे थोड्याफार प्रमाणात फेडू शकलो याचा मला आनंद आहे व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मी एक खारीचा वाटा उचलला यासाठी अनेकांनी प्रयत्न केले यात भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे यांचेही योगदान असल्याचे तसेच अनेक मराठी  वृत्तपत्रांचा देखील मोठा वाटा असल्याचे  प्रतिपादन शेट्टी यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केले. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रीमंडळाचे आभार व्यक्त केले. मराठी भाषेने देशासाठी केलेल्या सांस्कृतिक योगदानाचा हा गौरव असल्याचे प्रतिपादन सत्कार प्रसंगी बोलताना शेट्टी यांनी व्यक्त केले. मी जनसेवक ह्या नात्याने यापुढेही गोर-गरीब जनतेची सेवा करत राहणार असल्याचे याप्रसंगी बोलताना सागितले. इतिहासकार व इतिहासाचे गाढे अभ्यासक रविराज पराडकर यांनी देखील एका कर्नाटकी खासदाराने मराठी साठी दिलेले योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी बोलताना व्यक्त केले. मराठी वर प्रेम करणारी जनता, कार्यकर्ते व विविध स्तरातील अनेक मान्यवर मोठया प्रमाणात या सत्कार प्रसंगी उपस्थित होते.

शिक्षण विभागाच्या विरोधात आंदोलन

रमेश औताडे मुंबई : गेल्या दोन वर्षा पासून शिक्षण उपसंचालकाकडे विद्यालयातील मनमानी कारभाराबाबत वारंवार तक्रारी करून ही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने ९ आक्टोबर पासून आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा गणेश गुंडेट्टी व श्रीहरी गुंडेट्टी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. ज्या व्यक्तीने देशासाठी स्वतःचे बलिदान दिले, अंदमानच्या कारागृहात नरक याताना भोगल्या, ज्यांनी देशाच्या हजारो पिढ्यांसमोर आदर्श घालून दिला असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावे असलेल्या स्वातंत्र्यवीर वीर सावरकर हिंदू एज्युकेशन ट्रस्ट आणि स्वा. वीर सावरकर हिंदू विद्यालयात सुरू असलेला मनमानी कारभार शिक्षण विभागाला लेखी देऊनही कारवाई होण्यास विलंब का लागत आहे ? असा सवाल गणेश गुंडेट्टी व श्रीहरी  गुंडेट्टी यांनी यावेळी केला. रामराव विठ्ठलराव पतसंस्थेकडून विद्यालयाच्या बाहेरील लोकांना विद्यालयीन कर्मचारी आहेत असे दाखवून बोगस कर्ज घेतले. त्या कर्जाची परतफेड न केल्याने पतसंस्थेने सहाय्यक निबंधकाकडे वसुली तक्रार केली. निबंधकानी संस्थेचे बँक खाते गोठविले. त्यामुळे शिक्षेकत्तर कर्मचारी ३ महिने पगारापासून वंचीत राहिले त्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. याबाबत  शिक्षक निरीक्षक कार्यालयाकडे लेखी तक्रार केली परंतु तक्रारीची दखल घेतली नाही. अखेर न्याय मिळत नसल्याने आम्ही सनदशीर मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ९ आक्टोबर पासून आझाद मैदानात आंदोलन करणार आहोत, असे गणेश गुंडेट्टी व श्रीहरी  गुंडेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Heading – निवडणुकीच्या तोंडावर शिंदे- चव्हाण एकत्र

 महायुती शिवाय पर्याय नाही – खासदार श्रीकांत शिंदे डोंबिवली :  डोंबिवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाकडून म्हात्रे यांना उमेदवारी दिली गेल्यास महायुतीचे उमेदवार चव्हाण यांच्या विरोधात ते लढत देऊ शकतात.  दीपेश यांच्या प्रवेशाच्या पूर्वसंध्येला मंत्री चव्हाण आणि खासदार डॉ. शिंदे हे एकत्र आल्याचे दिसुन आले. यावेळी महायुती शिवाय पर्याय नाही.  मंत्री चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले आहे. विधानसभा निवडणुका समोर ठेवून मंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार डॉ. शिंदे यांची गट्टी जमल्याचे बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी भेटीगाठी घेत तिकिटासाठी जोर लावण्यास सुरवात केली आहे. निवडणूका व इतर गणिते मांडत या पक्षातून त्या पक्षात उड्या देखील सुरू झाल्या आहेत. डोंबिवली मधील शिवसेना शिंदे गटाचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. याची कुणकुण पक्षातील वरिष्ठांना आधीच लागली होती. पदाधिकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशाच्या पूर्वसंध्येला डोंबिवलीत भाजपचे मंत्री चव्हाण आणि सेनेचे खासदार डॉ. शिंदे एकत्र आले. महायुती मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असताना हे वातावरण शांत करण्यासाठी दोघे एकत्र आल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे पिता-पुत्र यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांचे काम करायचे नाही असा निर्णय घेत असहकार पुकारला होता. त्यास मंत्री चव्हाण यांचा देखील पाठिंबा होता. मात्र नंतर महायुती झाल्यानंतर मंत्री चव्हाण यांनी महायुतीची निष्ठा राखत, भाजप कार्यकर्त्यांची मनधरणी करून श्रीकांत यांच्यासाठी काम करण्याचे आवाहन केले होते. शिंदे यांचा विजय झाला असला तरी त्यांना फारसे मताधिक्य घेता आले नव्हते. याची पुनरावृत्ती आता विधानसभेत होणार का ? शिंदे गट विधानसभेला चव्हाण यांना मदत करणार की शांत राहण्याची भूमिका घेतात याची चर्चा सुरू होती. तर दुसरीकडे शिंदेचे पदाधिकारी म्हात्रे हे चव्हाण यांच्या विरोधात विकासाच्या मुद्द्यावर ताशेरे ओढत होते. त्यात ते ठाकरे गटात जाणार असल्याने महायुती उमेदवार चव्हाण यांना आव्हान उभे राहू शकते.  

धारावीत बद्रीनाथ मंदिराचा आकर्षक  देखावा

मुंबई : जय महाराष्ट्र सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा धारावी येथील नवरात्रौत्सवातील यंदाचा बद्रीनाथ मंदिराचा देखावा भाविकांचे विशेष आकर्षण ठरला आहे. उत्तराखंड राज्यातील या मंदिराची प्रतिकृती हुबेहूब साकारली गेली आहे. त्यासाठी अनेक सूक्ष्म बाबींवर विशेष काम करण्यात आले आहे. या देखाव्यासाठी भाविकांची विशेष गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. बद्रीनाथ मंदिराची ही प्रतिकृती ३० फूट उंच आणि ७० फूट रुंद आहे. चार धाम पैकी हे एक मंदिर असल्यामुळे भाविकांची एकच गर्दी होत आहे. मंडळाचे अध्यक्ष सुरेश सावंत यांच्यासमवेत सचिव रामचंद्र महाडेश्वर, कार्याध्य़क्ष बबनराव घाग आदींनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करण्याची मंडळाची परंपरा आहे. ज्या भाविकांना एखाद्या तीर्थस्थळी जाणे तितके सोपे नसते, अशावेळी त्यांना त्या ठिकाणी गेल्याचे समाधान मिळावे, या हेतूने हे देखावे सादर करण्यात येतात. यंदाचा बद्रीनाथ मंदिराचा देखावा साकारण्यामुळे अनेक भविकांचा ओघ इथे वाढला आहे. मंडळाच्या वतीने गेली ३८ वर्षे विविध उपक्रम राबविण्यात येतात. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडात्मक उपक्रमांसाठी तरुणांना प्रोत्साहित करण्यात येते. रक्तदान, आरोग्य, नेत्रचिकित्सा आदी शिबिरांचेही आयोजन नियमितपणे करण्यात येते. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, विविध स्पर्धा, व्याख्यानमालादखील आयोजित केल्या जातात.

चेंबूरमध्ये चाळीतील घराला भीषण आग

एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू मुंबई : चेंबूरमध्ये चाळीतील एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत होरपळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये दोन चिमुकल्यांचादेखील समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ नगर परिसरात चाळीतील एका घराला आज पहाटे साडेपाचच्या सुमारास आग लागली. घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉकसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितलं जात आहे. या घरात गुप्ता कुटुंबिय राहत असल्याची माहिती आहे. ते पहाटे झोपेत असताच ही घटना घडली. या आगीत गुप्ता कुटुबांतील पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. प्रेम गुप्ता (३०), अनिता गुप्ता (३०), मंजू गुप्ता (३०), परीस गुप्त (७) आणि नरेंद्र गुप्ता (१०) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याशिवाय या घरात इतरही काही सदस्य होते, तेदेखील या आगीत जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांना आगीवरन नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती आहे.

मुंबईकरांना २४ तास पाणीपुरवठा अशक्य

 महापालिका अधिकाऱ्यांची कबुली मुंबई : शहराला २४ तास पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचा पुनरुच्चार महापालिका प्रशासनाने केला आहे. २४ तास पाणीपुरवठा करण्याइतकी पाण्याची उपलब्धता नसून मुंबईची भौगोलिक स्थिती आणि रचनेमुळे २४ तास पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. त्यामुळे २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रयोग पूर्णत: गुंडाळण्यात आला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्यानंतर मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे वचन राजकीय पक्षांकडून दिले जाते. मात्र २४ तास पाणी देणे शक्य नाही, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. २०१४ मध्ये २४ तास पाणीपुरवठा करण्याची घोषणा करण्यात आली होती. पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी पालिकेने हाती घेतलेल्या मुंबई जलवितरण सुधारणा कार्यक्रमांतर्गत वांद्रे व मुलुंड परिसरात २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रयोगही करण्यात आला होता. त्यावेळी या भागात पाण्याचे तास वाढवण्यात आले होते, पण २४ तास पाणीपुरवठा करता आला नाही. तेवढी पाण्याची उपलब्धता नाही, त्यामुळे ते शक्य नाही, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी धरणाच्या अभ्यास दौऱ्यादरम्यान दिली. तानसा, मध्यवैतरणा, मोडकसागर, भातसा, विहार, तुलसी, ऊर्ध्व वैतरणा अशा सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. ही धरणे पावसाळ्यात काठोकाठ भरली तरच वर्षभर पाणीपुरवठा होऊ शकतो. भविष्यातील मुंबईकरांची पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी प्रस्तावित केलेल्या गारगाई, पिंजाळ व दमणगंगा या तीनपैकी एकही नवीन पाणी प्रकल्प मार्गी लागलेला नाही. मुंबईची भौगोलिक स्थिती हेही यामागचे कारण असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबईतील ६० टक्के लोकसंख्या ही अनियोजित वस्त्यांमध्ये राहते. त्यामुळे मुंबईची विभागणी अडीचशे लहान लहान विभागांमध्ये करून थोड्या थोड्या विभागांना एकेका वेळी पाणीपुरवठा केला जातो.

धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन आणि नियमित करण्यासाठी समिती

मुंबई : धारावी पुनर्विकासअंतर्गत धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन, स्थलांतर आणि नियमित करण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता राज्य सरकारने सात सदस्य समिती गठित केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती अनधिकृत धार्मिक स्थळांबाबतचा प्रश्न मार्गी लावणार आहे. रखडलेला धारावीचा पुनर्विकास आता अखेर प्रत्यक्ष मार्गी लागणार आहे. सध्या धारावीतील झोपड्यांचे, बांधकामाचे सर्वेक्षण सुरू आहे. रहिवाशांची पात्रता निश्चिती केली जात आहे. दरम्यान धारावीत मोठ्या संख्येने धार्मिक स्थळे आहेत. त्यात धारावीत अनधिकृत धार्मिक स्थळेही मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या धार्मिक स्थळांचे निष्काषन आणि स्थलांतराचा प्रश्न गंभीर झाला आहे. धारावीत एक अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यावरून नुकताच तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर खऱ्या अर्थाने धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन, स्थलांतर आणि ती नियमित करण्यासाठी राज्य सरकारने एक सात सदस्य समिती स्थापन केली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार ही समिती अनधिकृत धार्मिक स्थळांबाबतचा प्रश्न मार्गी लावणार आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्य समिती गठीत करण्यात आली आहे. समितीत मद्रास उच्च न्यायालयाचे माजी अतिरिक्त मुख्य न्यायाधीश जी. एम. अकबर अली, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी, मुंबई; सह सचिव, उप सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई; सह सचिव, उप सचिव, विधी व न्याय विभाग, मंत्रालय; सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था); उपजिल्हाधिकारी आणि सक्षम प्राधिकारी, मुंबई (सर्व सदस्य) यांचा समावेश आहे.

विधानसभेसाठी मराठा समाजाचा ‘मराठा पॅटर्न’

 महिनाभर मराठा जोडो अभियान ठाणे : मराठा समाजाबाबत सर्वच राजकिय पक्षांची उदासिनता पाहता आगामी काळात मराठा एकजुटीची ताकद दाखवुन देण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने “मराठा पॅटर्न” राबवण्याचा यल्गार केला आहे. या अनुषंगाने आगामी एक महिना “मराठा जोडो अभियान” ठाण्यातील चारही विधानसभा क्षेत्रात राबवणार असल्याची माहिती ठाणे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ॲड. संतोष सुर्यराव आणि प्रविण पिसाळ यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटला नसल्याने मराठा समाज आक्रमक होत आहे. ठाण्यातही सकल मराठा समाजाच्या बैठकींचा रतीब सुरू झाला असुन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मराठा क्रांती मोर्चाने ठाणे शासकिय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन भूमिका आपली स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेला प्रविण पिसाळ, प्रविण कदम, दत्ता चव्हाण, दिनेश पवार, रमेश चौधरी, संतोष पालांडे आदीसह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना, समन्वयक ॲड. सुर्यवंशी यांनी, यापूर्वी राणे समितीच्या अहवालावरून दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले नाही, नंतर युती सरकारने दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले पण, सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही.तेव्हा, आम्हाला केवळ गृहित धरले जाते, असे असंविधानिक आरक्षण देण्याऐवजी ५० टक्यांच्या आतच आरक्षण द्यावे. यासंदर्भात सरकारने नेमलेल्या गायकवाड आयोग तसेच शिंदे समितीनेही अनुकुल अहवाल दिला असे असतानाही ४० वर्ष झाली तरी मागण्या मान्य होत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तेव्हा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा आपल्या मागण्यासाठी कोणत्याही राजकिय पक्षाशी बांधिलकी न ठेवता मराठा पॅटर्न राबवणार आहे. तसेच आगामी एक महिना ठाण्याच्या चौकाचौकात “मराठा जोडो अभियान” राबवुन मराठा समाजाला जागरूक करणार आहे.   ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघासह चारही विधानसभा क्षेत्रात मराठा समाजाची मोठी ताकद असल्याने मराठा उमेदवार देणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे विधानसभेत १ लाख ३५ हजार मराठा मतदार तर ओवळा – माजीवडयात ५ लाख मतदारांपैकी १ लाख ५० मराठा, कोपरी- पाचपाखाडीत ८० हजार आणि कळवा – मुंब्रा मतदारसंघात ३५ हजार मराठा मतदार आहेत. याकडेही मराठा समन्वयकांनी लक्ष वेधले. चौकट मराठा समाजाच्या मागण्या * कोपर्डी अत्याचारातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. * ५० टक्याच्या आत टिकणारे आरक्षण हवे. * जातनिहाय जनगणना झाली पाहिजे * ओबीसीसह सर्व जातींचे फेर सर्वेक्षण व्हावे * सारथी उपकेंद्र ठाण्यात उभारून त्याची व्याप्ती वाढवावी * ठाण्यात मराठा हॉस्टेल व मराठा भवन व्हायला हवे * सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी नेमकी कशामुळे अडली हे स्पष्ट करावे. * मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.

माथेरानमध्ये जंतुनाशक फवारणी

माथेरान : गावातील काही भागातील नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत मानसिकता नसल्याने काही ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव निर्माण झाला असून काही दिवसांपूर्वी डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विषयक सावधगिरी बाळगून गावातील भागात नगरपरिषदेच्या माध्यमातून उत्तम प्रशासक तथा कार्यक्षम मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या सूचनेनुसार जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. गावातील उघडी गटारे आणि त्यातूनच वाहून जाणारे सांडपाणी आणि स्वच्छतेच्या बाबतीत मानसिकता नसलेल्या नागरिकांनी उघड्या गटारात टाकलेल्या ओल्या कचऱ्यामुळे सुध्दा डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे नागरिकांना आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. डेंग्यू सारखे आजार बळावले तर एखाद्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागण्याची शक्यता आहे. यासाठी स्वच्छता राखणे हे नागरिकांचे सुध्दा कर्तव्य आहे.घनकचरा व्यवस्थापनाच्या कचरा वेचक महिला नियमितपणे कचरा गोळा करण्यासाठी घरोघरी जाऊन कचऱ्याचे संकलन करीत असतात परंतु जे नागरिक अनेकदा घरातील कचरा उघड्या गटारात टाकत आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास वचक बसून स्वच्छता राखण्यास मदत होऊ शकते.

घोडबंदर खाडी किनाऱ्यावर उभारणार आकर्षक ग्लास स्कायवॉक

 १०० कोटींचा निधी मंजूर-प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर / अरविंद जोशी भाईंदर : ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचे जतन – संवर्धन होण्याच्या दृष्टीने काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे.  घोडबंदर  खाडी किनारा विकासाचे कामही लवकरच सुरु होत आहे. याच शेजारी असलेल्या जागेत भव्य ‘शिवसृष्टी’चे कामही मंजूर झाले आहे. त्याजवळ हा खाडी किनारा विकास सुरु होणार असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येणार आहेत.  आता वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटच्या दुसऱ्या टप्प्यात, मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील घोडबंदर खाडी किनारा व घोडबंदर किल्ल्याला जोडणाऱ्या स्काय वॉक तयार करण्यासाठी १०० कोटींच्या कामास निधीसह राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे.जवळपास १ किलोमीटर लांबीचा हा ग्लास स्काय वॉक असेल. हा तयार होणारा ग्लास स्कायवॉक आकर्षक डिझाईनचा असणार असून फक्त मीरा भाईंदरच नाही तर मुंबई महानगरातील पर्यटकांच्या पसंतीस तो उतरेल असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात घोडबंदर खाडी किनारा विकास म्हणजेच वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटचे काम आता सुरु होत आहे. दुसऱ्या टप्प्यात येथे खाडी किनाऱ्यावरून थेट किल्ल्यात , शिवसृष्टीला जोडणारा स्काय वॉक असावा अशी संकल्पना आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली. त्याला राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने निधीसह मंजुरी दिली आहे.  घोडबंदर येथे खाडी किनारा विकासाचे काम जिथे पूर्ण होईल त्या खाडी किनाऱ्यापासून तिथपासून घोडबंदर किल्ला वरील भागात म्हणजे उंचावर आहे. खाडी किनाऱ्यावरून उंचावरील किल्ल्यात व पुढे तयार होणाऱ्या शिवसृष्टीत जाण्यासाठी एक आकर्षक स्काय वॉक तयार करण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना आहे. या स्काय वॉकचा बराचसा भाग हा पारदर्शक काचेचा असणार आहे. ‘ग्लास स्कायवॉक’ किंवा ‘ग्लास ब्रिज’ म्हणून त्याची ओळख होईल. जे पर्यटक खाडी किनाऱ्यावर फिरण्यासाठी येतील त्यांना थेट किल्ल्यात किंवा शिवसृष्टीत जाण्यासाठी हा काचेचा स्कायवॉक मदत करेल. जवळपास १ किलोमीटर लांबीचा हा स्काय वॉक असेल. खाडी किनाऱ्यावरून जाणारा हा स्कायवॉक म्हणजे पाण्याच्या वरून जाण्याचा अनुभव पर्यटकांना घेता येईल. त्यात काचेचा स्काय वॉक असल्याने त्याचे विशेष आकर्षण अधिक वाढेल. या स्काय वॉकचे संकल्पचित्र बनवले जात असून आकर्षक आगळेवेगळे व लक्षवेधी असे ग्लास स्कायवॉक चे डिजाईन असेल. शिवाय या काचेच्या स्काय वॉकवरून आजूबाजूच्या परिसराची दृश्ये पाहता व टिपता यावीत यासाठी ‘व्यूइंग डेक’ तयार करण्याचाही आमदार सरनाईक यांचा विचार आहे. घोडबंदर खाडी किनारा ते किल्ला – शिवसृष्टी असे दोन पॉईंट या स्काय वॉकने जोडले जातील.घोडबंदर खाडी किनारा ते घोडबंदर किल्ला साधारणतः ४५० मीटर लांबीचा स्काय वॉक असेल तर तिथून पुढे शिवसृष्टीपर्यंत जोडण्यासाठी ५०० मीटर असा जवळपास १ किलोमीटर लांबीचा हा ग्लास स्कायवॉक असणार आहे. स्काय वॉक बरोबर परिसर सुशोभीकरणही केले जाईल , अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.