Month: October 2024

अहो, माझ्या पक्षाची निशाणी कमावलेली, ढापलेली नव्हे

राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला मुंबई: लोकसभा निवडणुकीवेळी दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाची जागा मनसेने मागितली होती. या दोन्ही जागांवरुन शिंदे गटाचे उमेदवार निवडून येणार नाहीत, असे आम्ही तेव्हाच सांगितले होते. या दोन्ही जागा निवडून आणणे तुमच्या हातातील गोष्ट नाही, या जागा तुम्हाला लागणार नाहीत, असे आम्ही सांगितले होते. या दोन्ही जागा मनसेला लढवू द्या. आम्ही त्या जागा 100 टक्के जिंकल्या असत्या. पण त्यावेळी शिंदे गटाकडून मनसेच्या उमेदवारांनी आमच्या चिन्हावर लढावे, असे सांगितले. निवडणूक आमच्या निशाणीवर लढली गेली पाहिजे. त्यावर मी बोललो की, अहो आमच्या पक्षाची निशाणी कमावलेली आहे, ती ढापलेली नाही. आमची निशाणी ही निवडणुकीच्या इतक्या वर्षांच्या प्रवासात मिळाली आहे. लोकांच्या मतदानामुळे ही निशाणी आम्हाला मिळाली, ती कोर्टातून आलेली नाही, असा टोला राज ठाकरे  यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीविषयी नाराजी व्यक्त केली. असा प्रकार कोणत्याही पक्षासोबत होता कामा नये. मी अशी गोष्ट केलेली नाही. मी शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा शक्य असूनही आमदार फोडले नाहीत. मग मला सत्तेत येण्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल. मला अशाप्रकारे फोडाफोडी करुन कधीही सत्ता नको, असे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. अमित ठाकरेंना उद्धव यांचा पाठिंबा नाही, राज ठाकरे म्हणाले… आदित्य ठाकरे लोकसभा निवडणुकीला उभे राहिले होते, तेव्हा मी विचार केला की, विरोधातील पक्ष असला तरी मी नातेसंबंध जपणारा आहे. मी त्या विचारात वाढलेला आहे. मला त्यावेळी वाटलं की, वरळीत मनसेची 38-39 हजार मतं आहेत,तरीही आदित्य तिकडे लढतोय, मग तिकडे मनसेचा उमेदवार नको देऊयात. मी जो विचार करतो, तेवढ्याच सुज्ञपणे समोरचा विचार करेल, ही माझी अपेक्षा नाही. मी चांगल्या हेतूने जी गोष्ट केली, तीच गोष्ट दुसरा माणूस करेल किंवा त्याने करावी, असे नाही. आदित्यविरोधात वरळीत उमेदवार द्यायचा नाही हे मी ठरवले, तेव्हा मी फोन करुन कोणाला सांगितले नाही. मला तेव्हा आदित्यविरोधात उमेदवार देऊ नये, असे वाटले, मला या निर्णयाचा कोणताही पश्चाताप नाही. अमित विरोधात माहीममध्ये उमेदवार देणे हा, हा प्रत्येकाचा स्वभावाचा भाग झाला आहे. प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार वागत असतो. भाजपसारख्या मॅच्युअर्ड पक्षांना ही गोष्ट कळू शकते, सगळ्यांनाच हे कळेल असं नाही. बाकी प्रत्येकाचे मिळेल ते ओरबाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आपण कोणाला कुठे आणि किती सांगायला जाणार, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

प्रदूषणमुक्त सण साजरे करण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव आवाहन

  ठाणे : राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात केवळ हरित फटाके वाजवण्याची परवानगी आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याचे पालन करून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. सर्व ठाणेकरांना सणाच्या निमित्ताने शुभेच्छा देतानाच आरोग्याची खबरदारी घेण्याचेही आवाहन राव यांनी केले आहे. सणांच्या काळात ६ ते ८ आणि रात्री ८ ते १० या काळात हरित फटाके फोडण्याची परवानगी आहे. प्रदूषणमुक्त सण साजरा करून नागरिकांनी स्वत:सोबतच प्राणी, पक्षी, झाडे यांचाही फटाक्यांच्या दुष्परिणामांपासून बचाव करावा, असे आयुक्त राव यांनी म्हटले आहे. या संदर्भातील आवाहन करणारे जनजागृती फलकही महापालिका क्षेत्रात प्रर्दशित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरिकांनी हरित फटाके फोडताना काळजी घ्यावी. फटाके फोडताना, सिंथेटीक कपड्यांएवजी सूती कपडे परिधान करावेत. मोकळ्या जागेत फटाके फोडावेत. फटाके फोडताना पाणी आणि वाळू यांचा साठा जवळपास ठेवावा. फटाके फोडताना लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सूचनांनुसार नागरिकांनी जबाबदारीने फटाके फोडावेत, असे आवाहन महापालिकेच्या पर्यावरण विभागाने केले आहे. त्याचबरोबर, दिवाळीची सुटी लक्षात घेऊन दैनंदिन साफसफाई, सार्वजनिक शौचालयांची सफाई, पाणी पुरवठा या व्यवस्था सुरळीत राहतील याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत दिले आहेत. ००००००

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांसह आशा सेविकांनाही दिवाळी भेट

६००० रुपयांची दिवाळी भेट आशा सेविकांच्या बॅंक खात्यात जमा ठाणे : दिवाळी सणाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेचे वर्ग २ ते ४ मधील सर्व कर्मचारी यांचे सानुग्रह अनुदान, ऑक्टोबर महिन्याचे वेतन तसेच, आशा सेविकांना देण्यात येणारी ६००० रुपयांची दिवाळी भेट दिवाळीपूर्वीच बॅंक खात्यात जमा करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने नियोजनाबद्ध व्यवस्था केल्याने सानुग्रह अनुदान, वेतन आणि दिवाळी भेट ही  दिवाळीच्या आधीच जमा करण्यात आली. त्याबद्दल आशा सेविका आणि ठामपा कर्मचारी यांच्यात आनंदाचे वातावरण असून त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आभार मानले आहेत. ठाणे महापालिकेचे २ ते ४ या संवर्गातील ६३०० कर्मचारी, शिक्षण विभागातील ७३६ कर्मचारी, ठाणे परिवहन सेवेचे १४९३ कायम कर्मचारी, महापालिकेचे थेट कंत्राटी कर्मचारी व इतर असे ३६५ कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान २४००० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले. तर, ४९२ आशा सेविकांना गतवर्षीप्रमाणेच ६००० रुपयांची दिवाळी भेट देण्यात आली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, सानुग्रह अनुदान, दिवाळी भेट तसेच, कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वीच बॅंक खात्यात जमा करण्यात आले. ही सर्व एकत्रित रक्कम सुमारे २२ कोटी रुपये आहे. ठाणे महापालिकेच्या विविध विभागांसाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवणाऱ्यात येते. या कामगारांनाही  देय  असलेल्या रकमेनुसार सानुग्रह अनुदानाचे वितरण तसेच ऑक्टोबरचे वेतन संबंधित कंत्राटदारामार्फत दिवाळीपूर्वीच करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. त्याची अमलबजावणी करण्यात आल्याची खात्री विभागप्रमुखांमार्फत करण्यात आली  आहे.

४० वर्षांनंतर देवळालीत मशालीवर निवडणूक

बबनराव घोलप यांनी लढवला होता किल्ला नाशिक रोड : चाळीस वर्षांपूर्वी रोपटे असलेल्या शिवसेनेचे वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी मुंबई ठाणे पाठोपाठ शिवसेनेने नाशिकमध्ये विधानसभेची निवडणूक लढविली होती. १९८५ मध्ये बबनराव घोलप यांनी देवळाली मतदारसंघात शिवसेनेकडून मशाल निशाणीवर निवडणूक लढविल्यानंतर पुन्हा तब्बल ४० वर्षांनंतर शिवसेनेकडून योगेश घोलप हे मशाल निशाणीवर नशीब आजमावत आहे. १९६६ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर मुंबई ठाणेनंतर नाशिक जिल्ह्यात देवळालीगाव व भगूरमध्ये शिवसेनेची १९ जून १९६८ मध्ये स्थापना करण्यात आली. नाशिक रोड देवळालीगाव, भगुर भागातूनच शिवसेना नाशिक जिल्ह्यात, उत्तर महाराष्ट्रात व औरंगाबाद (संभाजीनगर) मध्ये फोफावू लागली. शिवसेनेने मुंबई, ठाणे भागातील काही मतदार संघासोबत नाशिक व देवळाली विधानसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. १९८५ मध्ये पहिले जिल्हाप्रमुख (कै.) केशवराव थोरात यांनी नाशिक, तर राखीव देवळाली मतदारसंघातून बबनराव घोलप यांनी निवडणूक लढविली होती. नाशिक शहरात शिवसेनेने लढविलेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत थोरात यांना २,७०० व घोलप यांना ३,२०० च्या आसपास मतदान झाले होते. शिवसेनेच्या घोलप यांनी चाळीस वर्षांपूर्वी लढविलेल्या पहिल्या निवडणुकीत मशाल निशाणी घेतली होती. पहिल्या निवडणुकीत मशाल चिन्हावर निवडणूक लढवताना घोलप यांचा पराभव झाला असला, तरी १९९०च्या निवडणुकीत शिवसेनेकडून घोलप विजयी झाल्यानंतर सलग २५ वर्षे आमदार म्हणून निवडून आले. १९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यानंतर घोलप यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपदही मिळाले. त्यानंतर, धनुष्यबाण चिन्हावरच घोलप सतत निवडून आले. अपवाद फक्त १९९९ मधील निवडणुकीचा. ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या आरोपांमुळे शिवसेनेने उमेदवारी न देता घोलप यांना पुरस्कृत केले होते. त्यामुळे घोलप यांना अपक्ष उमेदवारी करावी लागली होती. त्यावेळी विमान चिन्हावर ते निवडून आले होते. दहा वर्षांपूर्वी घोलप यांना न्यायालयाने निवडणूक लढविण्यास बंदी घातल्यानंतर त्यांचे पुत्र योगेश हे २०१४ मध्ये शिवसेनेकडून धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आले. २०१९ मध्ये त्यांचा पराभव झाला. अडीच वर्षापूर्वी शिवसेनेत पडली फूट अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर न्यायालयीन लढाईत शिवसेनेची धनुष्यबाण निशाणी ही शिवसेनेच्या शिंदे गटाला देण्यात आली. त्यामुळे तब्बल ४० वर्षांनंतर घोलप यांचे पुत्र योगेश हे पुन्हा मशाल निवडणुकीवर निवडणुकीला सामोरे जात आहे.

३८ हजार कामगारांच्या कागदपत्रांची प्रतीक्षा,

एक लाख ११ हजार १६९ कामगारांची कागदपत्रे सादर मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्यासाठी हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एक लाख ११ हजार १६९ कामगारांनी कागदपत्रे सादर केली आहेत. यापैकी ९९, १६० गिरणी कामगार आणि त्यांचे वारस पात्र ठरले आहेत. मागील तीन ते चार महिने कागदपत्रे जमा होण्याच्या प्रक्रियेचा वेग मंदावला असून ३८ हजारांहून अधिक कामगारांच्या कागदपत्रांची प्रतीक्षा आहे. गिरण्यांच्या जमिनीवरील घरांच्या योजनेसाठी गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी मुंबई मंडळाकडे अंदाजे पावणेदोन लाख अर्ज सादर केले होते. यापैकी दीड लाख गिरणी कामगारांची पात्रता निश्चिती होणे शिल्लक होते. मुंबई मंडळाच्या धोरणानुसार सोडत जाहीर झाल्यानंतर विजेत्या कामगारांची पात्रता निश्चिती केली जात होती. मात्र यावर आक्षेप घेत गिरणी कामगार संघटनांनी सोडतीआधीच सर्वच्या सर्व गिरणी कामगारांची पात्रता निश्चिती पूर्ण करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करून राज्य सरकारने दीड लाख गिरणी कामगार, वारसांची पात्रता निश्चित करण्यासाठी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एक विशेष मोहीम हाती घेतली. मुंबई मंडळाने या मोहिमेअंतर्गत ऑनलाइन आणि उपस्थित राहून पद्धतीने कागदपत्रे जमा करून घेण्यास सुरुवात केली. या मोहिमेला गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी चांगला प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने कागदपत्रे जमा होऊ लागली. तर दुसरीकडे जमा कागदपत्रांची छाननी करून पात्रता निश्चितीचे काम कामगार विभागाने सुरू केले होते. या मोहिमेअंतर्गत मे २०२४ पर्यंत एक लाख ११ हजार ८९ कामगारांनी कागदपत्रे सादर केली होती. सहा महिन्यांत ७० जणांचीच कागदपत्रे सादर मे महिन्यानंतर कागदपत्रे जमा करण्याचा वेग मंदावला. त्यामुळेच मे ते २४ ऑक्टोबर या कालावधील अंदाजे ७० जणांनीच कागदपत्रे सादर केली आहेत. मंडळाला मेपासून ३८ हजारांहून अधिक कामगारांच्या कागदपत्रांची प्रतीक्षा आहे. मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर २०२४पर्यंत एक लाख ११ हजार १६९ जणांनी कागदपत्रे जमा केली आहेत. ऑनलाइन पद्धतीने एक लाख ७८६ तर उपस्थित राहून १० हजार ३८३ जणांनी कागदपत्रे जमा केली आहेत. यापैकी ९९ हजार १६० गिरणी कामगार आणि त्यांचे वारस पात्र ठरले. तर ६९३ कामगारांच्या कागदपत्रांची छाननी सुरू आहे. एकूणच आता गिरणी कामगार आणि त्यांचे वारस कागदपत्रे जमा करण्यासाठी पुढे येत नसल्याने ३८ हजारांहून अधिक अर्जदार कामगार गेले कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  

माथेरानच्या राजकारणाची मदार विधानसभेच्या निवडणुकीवर अवलंबून

माथेरान : माथेरान नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये अपेक्षित आहे. या निवडणुकीसाठी विधानसभेच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार आपल्या पक्षाला निवडणूक निधी देणार या आशेवर इथली राजकीय गणिते अवलंबून आहेत. त्यासाठीच महायुतीतील आणि महाविकास आघाडीतील आपापल्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते निवडणूक फंड निधी मिळविण्यासाठी आपल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी जोमाने कामाला लागलेले दिसत आहेत.जवळपास ३९०० मतदार असलेली छोटीशी नगरपरिषद असून प्रत्येक वार्डामध्ये जेमतेम 200 ते 250 च्या आसपास मतदारांची संख्या आहे. त्यामुळे अनेकदा पैशाच्या जोरावर अकार्यक्षम उमेदवार सुद्धा अगदी सहज निवडून येतात. राज्यातील राजकारणाने सुद्धा खालची पातळी गाठलेली आहे. पक्षनिष्ठा,नीतिमूल्य, नैतिक जबाबदारी या सर्वांना तिलांजली देऊन जो तो स्वतःच्या फायद्यासाठी पक्षांतर करून स्वतःचा लाभ उठवत आहे. तीच परिस्थिती मागील काही वर्षांपासून माथेरानचे सुज्ञ मतदार सुद्धा अनुभवत आहेत. हौसे, नवसे, आणि गवशे यांना पक्षात प्रथमता प्राधान्य दिले जात आहे. सत्ता स्थापन झाल्यावर पहिल्यांदा विरोधकांची कामे जलदगतीने केली जात जातात आणि कार्यकर्त्याला आशेवर टांगत ठेवणे ही इथली वस्तूस्थिती आहे. ज्यांना गावामध्ये राजकीय दृष्ट्या काही एक काडीमात्र स्थान नाही त्याचप्रमाणे अशा लोकांमुळे पक्षाला राजकीय फटका मिळू शकतो अशांना गोंजारल्यास आणि स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी हम करे सो कायदा ही भूमिका अवलंबिल्यास आगामी नगरपरिषद निवडणुकीत याचा मोठा फटका त्या त्या पक्षांना मिळणार आहे. मागील काळात लोकप्रतिनिधींनी आपसातील मतभेदांमुळे पक्षांतर करून काही प्रमाणात आर्थिक लाभ घेतला होता हे मतदार विसरलेले नाहीत. ज्या लोकप्रतिनिधींना आपली अमूल्य मते देऊन अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा राजकीय द्वेष ओढावला होता असे मतदार यावेळी गप्प बसणार नाहीत. लोकप्रतिनिधी जर अवाढव्य रक्कम घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी पक्षांतर करत असतात तर आपण सुद्धा यांना निवडून देण्यासाठी मतांचा मोबदला का घेऊ नये असाही प्रश्न मतदारांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारांना मतदारांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावीच लागणार आहे. ही झळ सोसण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक गरज भासणार असल्याने काही करून त्यांना विधानसभेच्या उमेदवाराला आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी जीवाचे रान करावे लागणार आहे. तेव्हाच कुठे विजयी उमेदवार  निवडणुकीसाठी निधी उपलब्ध करून देऊ शकतो. निवडणुकीत लढाई देण्यासाठी ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे केवळ पक्षाच्या निधीवर अवलंबून ज्यांनी ज्यांनी अगोदरच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे त्यांची कोंडी होऊ नये यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करणे क्रमप्राप्त आहे.

जितेंद्र आव्हाड तुम्ही प्रचार करू नका, तुमचे काम बोलतयं

कळवा-खारेगाव संकुल पदाधिकाऱ्यांचे आव्हाडांना पत्र ठाणे : राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघामध्ये जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला असा सामना रंगला असतानाच, या मतदार संघातील कळवा- खारेगाव भागातील गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हाड यांना पाठविलेले पत्र सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे. त्यात जितेंद्र आव्हाड तुम्ही प्रचार करू नका…तुमचे काम बोलतय अशा आशयाचा मजकूर आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर ठाणे जिल्ह्यातही पक्षात उभी फुट पडली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांची साथ दिली तर, आव्हाड यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी अजीत पवार यांची साथ दिली. तेव्हापासून या दोन्ही गटात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची लढाई सुरू आहे. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातून जितेंद्र आव्हाड हे तीनदा निवडुण आले आहेत. या मतदार संघातून राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडुण येतात. यामुळे हा परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत हा बालेकिल्ला कोणात्या पवारांचा असेल, हे स्पष्ट होणार आहे. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षाने जितेंद्र आव्हाड यांना पुन्हा निवडणकीच्या रिंगणात उतरविले आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी (अजीत पवार) या पक्षाने नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे येथे गुरू-शिष्याची लढाई होणार आहे. या दोन्ही नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्ती प्रदर्शन केले असून त्याचबरोबर दोन्ही नेते मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी मेळावे घेत आहेत. असे असतानाच, या मतदार संघातील कळवा- खारेगाव भागातील गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हाड यांना पाठविलेले पत्र सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे. त्यात जितेंद्र आव्हाड तुम्ही प्रचार करू नका…तुमचे काम बोलतय अशा आशयाचा मजकूर आहे. वास्तुआनंद, गोपीनाथ टाॅवर, चावंडाई रेसीडेन्सी, वेदांत पार्क, साई विहार, राज पार्क, वैष्णवीधाम, विराट, समृद्धी हाईट यासह इतर संकुलांनी असे पत्र आव्हाड यांना पाठविले आहे. काय म्हटलयं पत्रात… गेले अनेक दिवस आम्ही आपणास गल्लीबोळात प्रचार करताना पाहत आहोत. आपण मागील १५ वर्षे प्रामणीकपणे एवढे काम करीत आहात आणि आमच्या पारसिक परिसराचा विकास केल्यानंतर आपण गल्लीबोळात प्रचार करत फिरणे आम्हांला पाहवत नाही. तरी आपणास प्रचार करण्याची आवश्यकता नाही. आम्ही नागरीक आपणा सोबतच आहोत. त्यामुळे आमच्या सोसायटीने निर्णय घेतला आहे की आपणास एकमताने मतदान करणार. आपले प्रचारक आम्हीच आहोत. ही निवडणूक आता आम्ही आमच्या हातात घेतली आहे. ही निवडणुक आता लोकचळवळ झाली असुन केलेल्या कामाची पावती देण्याची हीच वेळ आहे, असे संकुलांच्या पत्रात मजकूर आहे.

ठाण्यातील सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित

ठाणे : ठाणे आयुक्तायल क्षेत्रातील सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांचे सायबर पोलीस ठाणे अखेर कार्यान्वित झाले आहे. नव्या पोलीस ठाण्यामुळे आता सायबर गुन्ह्यासंदर्भात तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. या पोलीस ठाण्यात सहा अधिकारी आणि ३० कर्मचारी असणार आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाजवळ हे पोलीस ठाणे बांधण्यात आले आहे. गेल्याकाही वर्षांमध्ये ठाणे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. त्याप्रमाणे गुन्ह्यांची प्रकरणे देखील वाढली आहेत. ठाण्यात दररोज सायबर गुन्हे घडत आहेत. शेअर मार्केटच्या नावाने फसवणूक, मोबाईलवर एखादी लिंक पाठवून बँक खाते रिकामे करणे, ऑनलाईन ‘टास्क’ देऊन आर्थिक फसवणूक करणे अशा प्रकरणांमध्ये फसवणुकीचे प्रमाण अधिक आहे. फसवणूक होणाऱ्यांमध्ये सर्वच वयोगटातील नागरिक आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र असे पोलीस ठाणे नव्हते. त्यामुळे सायबर गुन्हे शोध कक्षामार्फत पोलीस तपास करत होते. काही महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाजवळ सायबर पोलीस ठाण्याचे बांधकाम पूर्ण झाले होते. मंगळवारी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले. या पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह सहा अधिकारी आणि ३० पोलीस कर्मचारी कार्यरत असणार आहे.

डोंबिवलीत फडके रोडवर ढोलताशाला बंदी,  डिजेला परवानगी

डोंबिवली : दिवाळी सणानिमित्त गुरुवार, शुक्रवार डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावर तरुणाईचा जल्लोष असतो. फडके रस्ता तरुणाईने गजबजून गेलेला असतो. या कालावधीत चेंगराचेंगरी किंवा अन्य कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी, तसेच विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी फडके रस्ता भागात ढोलताशा वादनास पोलिसांनी बंदी घातली आहे. असं असतांना डीजे लावून कार्यक्रमाला परवनागी देण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ध्वनी मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्या एका कार्यक्रमाला वेगळा न्याय आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या ढोलताशाला बंदी असं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे फडके रस्त्यावर वर्षानुवर्ष होणारे डीजे लावणे आणि त्या गाण्यांवरील नृत्याचे कार्यक्रम पार पडणार आहेत. आचारसंहितेमुळे पक्षीय नेते या कार्यक्रमात किती सहभागी होतात याविषयी अनेकांनी अनभिज्ञता दर्शवली. श्री गणेश मंदिर संस्थानने दिवाळी पहाट कार्यक्रम शांतते पार पडेल या दृष्टीने नियोजन केले आहे. दरम्यान “दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त काही संस्था फडके रस्त्यावर डीजे लावून कार्यक्रम सादर करतात. या संस्थांनी ध्वनी मर्यादाचे पालन करून डीजे लावायचे आहेत. ध्वनी मर्यादेचे पालन, इतर कोणालाही कर्णकर्कश आवाजाचा त्रास होणार नाही याची काळजी आयोजकांनी घ्यायची आहे. आचारसंहितेचे पालन हा यात महत्वाचा विषय आहे” असं रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी सांगितले. तसंच त्यांनी डोंबिवली परिसरातील ढोलताशा पथकांना नोटीस पाठवून ढोलताशा वादन बंदीचे पालन करण्याचे सूचित केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे. फडके रस्ता, नेहरू रस्ता, अप्पा दातार चौक, मदन ठाकरे चौक भागात ढोलताशा वादनास बंदी असणार आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी डोंबिवलीतील फडके रस्त्यावर जमवून दिवाळी सणाच्या आप्तस्वकीय, मित्र, मैत्रिणींना शुभेच्छा देण्याची जुनी परंपरा आहे. डोंबिवलीसह बदलापूर, कल्याण, ठाणे, पलावा परिसरातून तरुण, तरुणी दिवाळी सण साजरा करण्यासाठी फडके रस्त्यावर येतात. या उत्साही तरुणांमुळे फडके रस्ता गजबजून जातो. सन २०२३ मध्ये दिवाळी पहाटनिमित्त फडके रस्त्यावर तरुणांची गर्दी जमली होती. याचवेळी या रस्त्यावर ढोलताशा पथकांचे वादनाचे कार्यक्रम सुरू होते. हे ढोलताशा वादन बघण्यासाठी खूप गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. हा प्रकार टाळण्यासाठी, तसेच आचारसंहितेचे पालन करण्यासाठी, परिसरातील शांततेचा भंग होऊ नये म्हणून दिवाळी पहाटच्या दिवशी फडके रस्ता परिसरात रामनगर पोलिसांनी ढोलताशा पथकांना वादनास बंदी केली आहे. दिवाळी सण आनंदाचा दिवस आहे. या दिवशी कोणतीही दुर्घटना किंवा अनुचित प्रकार घडणे योग्य होणार नाही. ढोलताशा पथकांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कृती करू नये. वादन बंदीच्या नोटिशीचा ढोलताशा पथकांनी भंग करू नये. तसा प्रकार कोणी केल्यास त्यांच्यावर कायदेशीवर कारवाई केली जाईल. ही नोटीस न्यायालयीन पुरावा म्हणून अंमलात आणण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. फडके रस्ता भागात रुग्णालये आहेत. काही घरांमध्ये आजारी रुग्ण, लहान बाळ असतात. त्यांना ढोलताशा पथकांच्या कानठळ्या बसणाऱ्या वादनाचा सर्वाधिक त्रास होतो. अशा तक्रारी यापूर्वीच या भागातील नागरिकांंनी केल्या आहेत. वाहतुकीस बंदी फडके रस्त्यावर दिवाळी पूर्व संध्या, दिवाळी पहाट हे कार्यक्रम होणार असल्याने वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत फडके रस्त्यावरील वाहतूक नागरिकांच्या सोयीसाठी, फडके रस्त्यावरील उत्सवी कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी पर्यायी मार्गाने वळवीली आहे. फडके रस्त्यावरील बाजीप्रभू चौकातून आप्पा दातार चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना फडके रस्ता आप्पा दातार चौक येथे प्रवेश बंद केला जाणार आहे. फडके रस्त्याकडे येणारी वाहने जोशी हायस्कूल, नेहरू रस्त्याने डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे येतील. एमआयडीसी परिसरातून डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे येणारी वाहने टिळक रस्ता, सावरकर रस्ता, इंदिरा चौकमार्गे रेल्वे स्थानकाकडे जातील. 0000

कल्याण ग्रामीणचा निर्णय वरिष्ठांचा!

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची स्पष्टोक्ती ठाणे –महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवार दिला जाणार नसल्याचे बोलले जात असतानाचा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने अखेरच्या यादीत कल्याण…