२५० मेट्रिक टन मिठाई बॉक्सच्या कचऱ्याची महापालिका लावणार विल्हेवाट
ठाणे : दिवाळी सणांत फराळासोबतच एकमेकांना मिठाईद्वारे शुभेच्छा देण्यात येतात. त्यामुळे दिवाळी सणात सर्वाधिक खप हा मिठाईचा होत असतो. मिठाईच्या बॉक्सच्या होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी, असा पेच पालिके समोर आहे. आता यावर ठाणे महापालिकेने तोडगा काढला आहे. तीन संस्थांच्या माध्यमातून ठाण्यात ज्या-ज्या ठिकाणी हा कचरा निर्माण होणार आहे. या संस्थेतील पदाधिकारी सुका कचरा गोळा करणार असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाने दिली आहे. या कालावधीत २५० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होईल, असा अंदाज बांधला आहे.
मागील काही दिवसांपासून ठाणे शहरात कचरा कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. अशातच या कचऱ्याची विल्हेवाट लावताना पालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. आता दिवाळीच्या सणात प्रत्येकाच्या घरी मिठाईचे बॉक्स येत आहेत, तसेच विविध संस्था, नेते, विकसक किंवा इतर मित्र मंडळींकडूनदेखील अशाच पद्धतीने मिठाईचे बॉक्स प्रत्येकाला दिले जात आहेत. त्यामुळे त्यातून निर्माण होणारा सुका कचरा ही मोठी समस्या होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. यावर उपाय म्हणून संस्थांच्या माध्यमातून ठाण्यातील २५ हजार कुटुंबाकडून हा कचरा गोळा केला जाणार आहे. यासाठी ठाण्यातील विविध गृहसंकुलाचा सर्व्हेदेखील केला आहे. त्यानुसार कुटुंबाची संख्या महापालिकेने पुढे आणली आहे.
स्त्री मुक्ती संघटना, समर्थ भारत व्यासपीठ, प्लॅस्टिक ब्रिगेड या तीन संघटनांच्या माध्यमातून आता घरोघरी जाऊन हा कचरा गोळा करणार आहेत. या मोहिमेला पुनर्निमाण कचरा प्रकल्प, असे नाव देण्यात आले आहे. त्यानुसार आता गुरुवारपासूनच या तीनही संघटना कार्यरत झाल्या असल्याची माहिती पालिकेने दिली, तसेच रहिवाशांनीदेखील आपला मिठाईच्या बॉक्सचा कचरा आपल्या नेहमीच्या कचऱ्यात टाकू नका, असे आवाहन महापालिकेच्या घनकचरा विभागाने केले आहे.
दिवाळीत मिठाईच्या बॉक्सच्या माध्यमातून सुका कचरा हा अधिक प्रमाणात निर्माण होत आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ठाणेकरांनी त्याला प्रतिसाद द्यावा.