अशोक गायकवाड

रायगड : जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्त निवडणूक निरीक्षक यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. निवडणूकीची सर्व प्रक्रिया निर्भय, भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी सोपविलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी, असे सर्वांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित विधानसभा निवडणूक कामकाज आढावा बैठकीला निवडणूक निरीक्षक ( सामान्य) दुनी चंद राणा, संतोष कुमार राय, श्रीमती रुही खान,सतीश कुमार एस, पोलीस निरीक्षक स्वप्नील ममगाई, खर्च निरीक्षक राजेश कुमार, ज्योती मीना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जावळे यांनी निवडणुकीच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती दिली.स्थिर पथके व फिरती पथके आवश्यक त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आंतरराज्य व जिल्ह्याच्या सीमेवर पुरेसा पोलीस व निवडणुक यंत्रणाचा कर्मचारी वर्ग २४ तास तपासणी नाक्यावर उपस्थित आहे. बॅरिकेट्स व सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली असून अधिकारी व कर्मचारी प्रत्येक वाहनाची तपासणी करून रोख रक्कम, मद्य वाहतूक होत आहे का तसेच संशयास्पद बाबीवर लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील मतदार संघातील मतदान केंद्र, मतदार, क्रिटिकल मतदान केंद्र, मतदान प्रक्रियेसाठी लागणारे मनुष्यबळ, क्षेत्रीय वाहतूक नियोजन याबाबतची माहिती जावळे यांनी यावेळी दिली.निवडणूक निरीक्षकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने आयोगाच्या निर्देशांनुसार अपेक्षित कार्यवाही याबाबत मार्गदर्शन केले व आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच सर्व नोडल अधिकारी यांच्याकडून निवडणुकीच्या तयारीची माहिती जाणून घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *