पनवेल: विधानसभेची निवडणूक जाहीर होताच काही दिवसांपासून विविध राजकीय पक्षांतील नेते व कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेशाचा धडाका लावला आहे. गेल्या पाच वर्षांपासून अडगळीत पडलेल्या गावागावांतील कार्यकर्त्यांना पुन्हा निवडणूक प्रचारात सक्रिय करण्यासाठी नेत्यांकडून मनधरणी केली जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना निवडणुकीनिमित्त अच्छे दिन आल्याचे चित्र आहे.
यंदाची पनवेल विधानसभेची निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता आहे. भाजप, शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे, राष्ट्रीय समाज पक्षासह अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले असल्याने त्यांना कार्यकर्त्यांची मोठी गरज भासणार आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसलेली मंडळी निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश करीत इकडून तिकडे उड्या मारताना दिसत आहेत. सत्ताधारी पक्षातील आमदारांचा तालुक्यात प्रभाव असल्याने त्यांच्या मागे-पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी नेहमी राहते. त्यामुळे प्रामाणिक आणि निष्ठेने काम केलेला कार्यकर्ता मात्र अडगळीत पडला आहे.
आर्थिक मदत, इतर सुविधांचा पुरवठा
निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी सक्षम मनुष्यबळाची गरज भासत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय नेते शहरात मोर्चेबांधणी करत आहेत. काही पक्षांकडून कार्यकर्त्यांना आर्थिक मदत, प्रचार साहित्य आणि इतर सुविधा दिल्या जात आहेत. काही ठिकाणी समाजमाध्यमांच्या प्रचारावरही भर दिला जात आहे.
शहरात राजकीय स्पर्धा तीव्र झाली आहे. विविध राजकीय पक्षांनी पनवेलमधील जनतेच्या प्रश्‍नांवर लक्ष केंद्रित करत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. येथील विकासकामे, पाणीपुरवठा, रोजगार आणि आरोग्याशी संबंधित मुद्दे निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यामुळे नेतेमंडळी घरी येत असल्याने कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढला असून त्यांना अच्छे दिन आले आहेत.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *