मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय घडामोडी वाढल्या असून जाहीर उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. माहीमसारख्या जागांवर युती किंवा आघाडीतल्या मित्रपक्षांमध्ये आपापसांतच मतभेदही दिसून येत आहेत. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, असे संकेत दोन्ही बाजूंनी देण्यात आले आहेत. कोणत्याही निवडणुकीत एकीकडे राजकीय घडामोडी घडत असताना दुसरीकडे खुमासदार चर्चाही रंगत असतात. अशीच एक चर्चा आता अजित पवारांच्या एका विधानावरून रंगू लागली आहे. कारण या चर्चेला संदर्भ जोडला जात आहे तो थेट देवेंद्र फडणवीसांच्या एका विधानाचा!
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवला होता. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, खुद्द अजित पवारांच्या बारामती विधानसभा मतदारसंघानं सुनेत्रा पवार यांना नाकारून सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात आपलं मत टाकलं. याच मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना सर्वाधिक मताधिक्य मिळालं. या पार्श्वभूमीवर बारामतीमधील यंदाची निवडणूक अजित पवारांसाठी महत्त्वाची ठरणार असून त्याचसंदर्भात अजित पवारांच्या या नव्या विधानाचे अर्थ लावले जात आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेलं एक भाषण बरंच प्रसिद्ध झालं होतं. त्यात देवेंद्र फडणवीसांनी “मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन” असं म्हणत निवडणुकीतील विजय पक्का असल्याचा दावा केला होता. पुढील प्रचारसभांमध्ये सातत्याने फडणवीसांनी याच उक्तीचा पुनरुच्चार केला. पक्षाच्या बॅनर्सवरही देवेंद्र फडणवीसांचं हेच विधान पाहायला मिळत होतं. २०१९च्या सत्तासंघर्षानंतर फडणवीस विरोधी पक्षनेते झाले आणि त्यांच्या याच विधानावरून टोलेबाजी होऊ लागली. आता अजित पवारांनीही तशाच स्वरुपाचं विधान केलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
यावेळच्या निवडणुकीत आपला विजय पक्का असल्याचं विधान अजित पवार यांनी केलं आहे. बारामती मतदारसंघातील झारगरवाडीत प्रचारादरम्यान त्यांनी काही मतदारांशी संवाद साधला. बारामतीच्या विकासाच्या जोरावर विजयी होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. “मागचं झालं गेलं गंगेला मिळालं. या निवडणुकीच्या निमित्ताने बारामती तालुक्याचा अधिक फायदा होण्याच्या दृष्टीने उद्या काहीही झालं तरी महायुतीचं सरकार येणार येणार येणार. सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला तिथे चांगलं पद मिळणार मिळणार मिळणार”, असं विधान अजित पवार यांनी केलं.
अजित पवारांच्या या विधानाचा संदर्भ थेट देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ या विधानाशी लावला जात आहे. त्याच प्रकारचं अजित पवारांचं हे विधान असल्याचाही तर्क लावला जात आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीमधील यंदाची निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या विरोधात बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)गटानं युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *