ठाणे : ठाण्यातील लुईसवाडी परिसरातील राज रोशन इमारतीत राहणाऱ्या बाल चमूनी रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक सुवर्ण दुर्गाची प्रतिकृती साकारली आहे
इ. स. १६४० मध्ये कान्होजी आंग्रे यांचे वडील तुकोजी आंग्रे शहाजीराजांकडे होते. निजामशाही संपल्यावर दक्षिण कोकणातील भाग हा आदिलशाहीत समाविष्ट झाला. पुढे तो भाग लगेचच छ. शिवाजी महाराजांनी घेतला. त्यामुळे आदिलशाहीत सुवर्णदुर्गसारख्या किल्ल्याचे बांधकाम झाले, असे वाटत नाही. तुरळक तटबंदी निजामशाहीत बांधली गेली असावी. इ. स. १६५९ पर्यंत तुकोजी आंग्रे छ. शिवाजी महाराजांबरोबर होते. इ. स. १६७४ मध्ये मराठी आरमाराकडून सुवर्णदुर्गची पद्धतशीरपणे दुरुस्ती केली गेली. कान्होजी आंग्रे यांचे बालपण अंजनवेल येथे गेले. कान्होजींनी सुवर्णदुर्गाच्या किल्लेदाराच्या हाताखाली काम करण्यास सुरुवात केली. कान्होजींचा पराक्रम पाहून छ. राजाराम महाराजांनी सुवर्णदुर्गाच्या काराभारात त्यांना बढती दिली. एका लढाईत सुवर्णदुर्गाचा किल्लेदार फितुर झाला, तेव्हा त्या लढाईची सर्व सूत्रे कान्होजींनी आपल्या हाती घेऊन पराक्रम गाजविला होता.