चार दिवसांत ३३ ठिकाणी लागली आग

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात दिवाळी काळात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवा आणि ध्वनी प्रदुषणात वाढ झाल्याचे समोर आले असतानाच, त्यापाठोपाठ आता दिवाळी काळातील चार दिवसांत संपुर्ण शहरात एकूण ३३ आगीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये जिवीतहानी झालेली नसून त्याचबरोबर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आगीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. या आगीची नेमकी कारणे अद्याप समजू शकलेली नसली तरी फटाके तसेच अन्य कारणांमुळे आग लागण्याच्या घटना घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात येते. दिवाळीनिमित्ताने सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले. ठाणे पालिका प्रशासनाकडून दिवाळी काळात हवा गुणवत्तेची तपासणी करण्याबरोबर ध्वनी पातळीचे मापन करण्यात येते. यंदाच्या तपासणीत दिवाळीच्या काळात ध्वनी आणि वायू या दोन्हीत वाढ नोंदवली गेली आहे. परंतु यंदा हरित फटाक्यांचा वापर वाढला असल्यामुळे गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदा ध्वनी आणि वायु प्रदुषण कमी असल्याचा दावा पालिकेने केला आहे. असे असतानाच, दिवाळी काळात शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.

बुधवार, ३१ ऑक्टोंबरला नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी शहरात ११ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर १ नोव्हेंबरला लक्ष्मीपुजनाच्या दिवशी ९ ठिकाणी, २ नोव्हेंबरला दिपावली पाडव्याच्या दिवशी ७ आणि ३ नोव्हेंबरला भाऊबीजच्या दिवशी ६ अशा एकूण ३३ ठिकाणी आग लागल्या घटना घडल्या आहेत. गेल्यावर्षी दिवाळी काळात शहरात ४७ ठिकाणी आग लागल्याची घटना घडली होती. यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आगीच्या घटनेत घट झाल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या आगीच्या घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नसून काही ठिकाणी मात्र आगीत साहित्य जळून खाक झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *