भाजपचा पदाधिकाऱ्यांना सल्ला
डोंबिवली : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांची भेट घेतली आहे. तत्पूर्वी त्यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांची देखील भेट घेतली आहे.
ठाकरे गट उमेदवाराच्या या भेटीगाठीने भाजप शिंदे गटाच्या गोटात खळबळ माजली आहे. याच भीतीतून भाजपचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी महायुती पदाधिकाऱ्यांना ‘निवडणुका होईपर्यंत कुणीही प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा कार्यकर्त्यांना भेटू नका. शुभेच्छा काय त्या फोनवरून द्यायला सांगा. 20 तारखेनंतर आपली मैत्री जपा असा सल्ला दिला आहे.
अंबरनाथ मध्ये मनसेने ठाकरे गटाला दोस्तीचा वादा दिला असताना आता शिंदे गटातील पदाधिकारी देखील वानखेडे यांना भेटत असल्याने आमदार बालाजी किणीकर यांच्या विरोधात संदेश जात असल्याने या कानपिचक्या दिल्या जात आहेत का ? अशी चर्चा आता रंगली आहे.
दिवाळीची धामधूम संपताच आता राजकीय मंडळी उमेदवाराच्या प्रचारासाठी कामाला लागली आहेत. कल्याण ग्रामीण मतदारसंघात महायुती मधील शिवसेना शिंदे गटाने मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या विरोधात उमेदवार दिल्याने मनसैनिक नाराज आहेत. त्यातच अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील मनसैनिकांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांना पाठिंबा देण्याचे निश्चित केले आहे.
दिवाळी दीपोत्सवाला वानखेडे यांनी आमदार पाटलांची भेट घेतली. यावेळी आमदार पाटील यांनी देखील वानखेडे हे माझे मित्र आहेत. एक मित्र म्हणून मी त्यांना नक्कीच मदत करेल. पक्षाची भूमिका जी काही असेल ते नंतर पाहिले जाईल असे सांगितले. यामुळे महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात खळबळ माजली आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे उमेदवार वानखेडे यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांची त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अंबरनाथ येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना कानपिचक्या दिल्या आहेत. भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी आपल्या सांभाषणात म्हणाले, निवडणुकीच्या काळात आपला वाढदिवस असेल तर एखादा प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा कार्यकर्ता आपल्याला भेटायला येतो. त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकून संभ्रम निर्माण करतो. त्यामुळे 20 तारखेपर्यंत आपली मैत्री, आपले संबंध बाजूला ठेवा, आणि कुणालाही भेटू नका, फोनवरून शुभेच्छा स्वीकारा. त्यांना सांगा तुमच्या निवडणुका तुम्ही लढा आमच्या निवडणुका आम्ही लढतो. बाकी सगळं 20 तारखेनंतर असं भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी म्हणाले. 20 तारखेपर्यंत फक्त राजकारण, निवडणूक, महायुती आणि धनुष्यबाण इतकंच लक्षात ठेवा, असं सूर्यवंशी म्हणाले.