ग्रामीण भागासाठीही पदाधिकारी प्रयत्नशील
हरिभाऊ लाखे
नाशिक: विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर प्रचाराला जोर येत असून, राज्यातील निवडणूक प्रतिष्ठेची लोकसभेप्रमाणेच विधानसभेसाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे. सभा पंचवटीतील तपोवनात असलेल्या मोदी ग्राऊंडवर होणार आहे.
सदरची सभा ठक्कर डोम येथे घेण्यासंदर्भातही प्रस्ताव होता. मात्र ती जागा सुयोग्य नसल्याने हा प्रस्ताव मागे पडला. त्यामुळे पंचवटीतील तपोवन येथील नेहमीची जागा निवडण्यात आली आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जागेची पाहणी केली. आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ६ नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये येणार आहे.
सत्ताकारणात दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचे संबंध असल्याने राज्यातील जागावाटपासह इतर सर्व घटनांमध्ये गृहमंत्री अमित शाह यांचा हस्तक्षेप राहिला आहे. त्यामुळे राज्यातील जागा निवडून आणण्यासाठी तिन्ही पक्षांचे स्टार प्रचारक म्हणून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शाह यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठी महायुतीतर्फे या दोन्ही नेत्यांच्या सभा संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात येणार असून, जिल्ह्यातही त्यांच्या दोन सभा व्हाव्यात, यासाठी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
त्यापैकी नाशिकमध्ये मोदी मैदानावर ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांची सभा आयोजित करण्याचा प्रयत्न सुरू असून, तपोवनातील मोदी मैदानातच ही सभा होणार आहे. याशिवाय ग्रामीण भागातही एखादी मोठी सभा घेण्याचा पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली.