भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा
दीपेश म्हात्रे यांचे नाव न घेता केला आरोप
ठाणे : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. तर या भेटीवेळी दीपेश म्हात्रे यांनी त्यांचे संभाषण रेकॉर्ड करण्यासाठी मोबाईल खिशात सुरु ठेवला होता, जेणेकरून मी काहीही चुकीचं बोललो असतो तर सर्वांना सांगितले असते, असा खळबळजनक दावा जगन्नाथ पाटील यांनी दीपेश म्हात्रे यांचे नाव न घेता केला आहे. डोंबिवली येथे नुकत्याच पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे दीपेश म्हात्रे यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी करून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात प्रवेश केला. निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने मात्र महायुतीच्या बंधनात अडकल्याने भाजपच्या पारंपरिक मतदारसंघ असलेला आणि भाजपचे रवींद्र चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवली त्यांना निवडणूक लढविणे शक्य नसल्याने दीपेश म्हात्रे यांनी निवडणुका घोषित होण्याच्या काही दिवस आधीच मशाल हाती घेतली होती. यानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून डोंबिवली विधानसभेसाठी अधिकृत उमेदवारी घोषित करण्यात आली. तर दीपेश म्हात्रे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात जोरदार प्रचार देखील सुरु केला आहे. तर काही दिवसांपूर्वी दीपेश म्हात्रे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. याभेटीबाबत जगन्नाथ पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात दीपेश म्हात्रे यांचे नाव न घेता अनेक विषयांवर भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी एका उमेदवाराने माझी भेट घेतली होती. तर या भेटी दरम्यान मला डोंबिवली विधानसभेची गणित समजावून सांगत होता. मात्र मी त्यांना सांगितले तुम्ही कितीही जोर लावला तरी या ठिकाणी तुला यश मिळणार नाही आणि येत्या २० तारखेच्या गणितात रवींद्र चव्हाण पास होतील, असे संभाषण झाल्याचे जगन्नाथ पाटील यांनी सांगितले. तर संबंधित उमेदवाराने भेटीवेळी संभाषण रेकॉर्ड करण्यासाठी मोबाईल खिशात सुरु ठेवला होता, जेणेकरून मी काहीही चुकीचं बोललो असतो तर सर्वांना सांगितले असते, असा खळबळजनक दावा जगन्नाथ पाटील यांनी दीपेश म्हात्रे यांचे नाव न घेता केला आहे.
महायुतीचे राजेश मोरे आणि रवींद्र चव्हाण विजयी होणार – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
डोंबिवली येथे पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात सर्व पदाधिकाऱ्यांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबोधित करून दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी जोमाने काम करण्याचे आवाहन केले. तर कल्याण लोकसभेतील सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असे मत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.