पर्यटकांची मांदियाळी : अनेक पर्यटक माघारी
माथेरान : माथेरान करांचा महत्वाचा व्यावसायिक हंगाम असणाऱ्या दिवाळीत मोठया प्रमाणावर पर्यटकांनी गर्दी केली आहे. परंतु स्वतःच्या वाहनाने येणाऱ्या पर्यटकांना घाटातील ट्रॅफिक जाम झाल्याने त्याचप्रमाणे काहींना दस्तुरी नाक्यावर पार्किंगची सोय नसल्याने माघारी जाण्याची वेळ आली आहे. घाटात वाहनांची कोंडी झाल्याने लहान मुलांना घेऊन तासनतास ताटकळत राहावे लागले तर काही पर्यटक आपल्या सामानासह घाटातून चालत दस्तुरी नाक्यावर आल्याने त्यांची खूपच दमछाक झाली होती. प्रशासनाला इथल्या पार्किंग सुविधे बाबतीत पूर्ण कल्पना माहिती असताना सुध्दा दरवेळेस याबाबत काहीही ठोस उपाययोजना केली जात नाही.त्यामुळे इकडे येणाऱ्या नवख्या पर्यटकांना सुध्दा इथल्या एकंदरीत परिस्थितीचा अंदाज येत नाही. नेरळ माथेरान हाच एकमेव मार्ग असल्याने अजून किती त्रास सहन करावा लागणार आहे याबाबतीत शासनाला काहीच सोयरसुतक नाही का असा प्रश्न पर्यटकांमधून उपस्थित केला जात आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेक पर्यटकांनी कर्जत तालुक्यातील फार्म हाऊस मध्ये तसेच लोणावळा, खंडाळा इथे जाणे पसंत केले याचा इथल्या पर्यटनावर विपरीत परिणाम होत आहे.
आम्ही पहिल्यांदाच याठिकाणी आलो आहोत पण घाटातील वाहतूक कोंडीचे विदारक चित्र पाहून आम्ही इकडे आलो ती घोडचूक केली आहे असेच वाटते. जग फिरलो पण अशी भयानक परिस्थितीइथेच अनुभवायला मिळाली आहे. यासाठी सरकारने इथे काहीतरी पर्यायी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे.
अभिराज सोनटक्के –पर्यटक मुंबई