ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही अशीच आहे, गद्दारांना गाडणार म्हणजे गाडणारचं
राधानगरी : एकीकडे महायुतीने आज कोल्हापूरातून प्रचाराचा नारळ फोडला तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही आपल्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातूनच फोडला. ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेसाठी मविआसाठी रणशिंग फुंकतानाच ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही अशी असून या महाराष्ट्र दोहींना गाडणार म्हणजे गाडणारच अशी गर्जना केली.
सकाळी उद्धव ठाकरे यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. दरम्यान, राधानगरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून के.पी. पाटील निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राधानगरी येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
यावेळी सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभेच्यावेळी मी भाषणाची सुरुवात देशप्रेमी बांधवांनो आणि भगिनींनो अशी करत होतो. दसरा मेळाव्यात मी हिंदू बांधवांनो अशी करतो, पण, आताची ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही अशी आहे, अशी टीका ठाकरे यांनी महायुतीवर केली.
“कोल्हापुरातून प्रचाराची सुरुवात करत आहे. हा राधानगरी मतदारसंघत गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही. माझ्याकडून मागच्यावेळी चूक झाली होती. सगळ काही देऊनसुद्धा यांनी गद्दारी केली, सगळ देऊनही शिवसेना या नावाच्या आईवरती वार करणारा माणूस तुमचा होऊ शकतो का?, असा सवाल करत ठाकरे यांनी प्रकाश आबिटकर यांच्यावर निशाणा साधला.
ठाकरेंची पाच वचन
१. राज्यातील विद्यार्थीनींना मोफत शिक्षण दिले जाते, महाविकास आघाडीचे सरकार आले तर विद्यार्थ्यांनाही मोफत शिक्षण दिले जाईल.
२. महिला पोलिसांची भरती केली जाईल. पोलीस ते वरिष्ठ पदांवर महिला अधिकारी असलेले पोलीस ठाणे सुरु करण्यात येईल.
३. मुंबईतील अदानी प्रकल्प रद्द करुन त्याठिकाणी धारावीकरांना उद्योगधंद्यासकट घरे देऊ. ग्रामीण भागातील जनतेने मुंबईत यावे. मुंबई तुमची आहे, मराठी माणसाची आहे.
४.आमची सत्ता पुन्हा आल्यावर शेतीमालाला हमीभाव देऊ.
५.जीवनावश्यक वस्तूंच्या दरात कोणतेही बदल होणार नाही. डाळ, तांदूळ, साखर, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव आमचे सरकार स्थिर ठेवेल.
सुरतमध्ये शिवरायांचे स्मारक उभारणार
“महाराजांचा पुतळा उभा केला, त्या पुतळ्यातील पैसे खाणारी लोक महाराष्ट्र पुढं घेऊन जातील असं वाटत आहे का? महाराजांचा अपमान करणाऱ्या कोश्यारी यांचा साधा भाजपावाल्यांनी अपमानही केला नाही, तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने आम्ही महाविकास आघाडीचे सरकार आणणारच.
महाविकास आघाडीचे सरकार आणल्यानंतर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराज यांचे मंदीर उभारणार अशी मोठी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. मी सुरतमध्येही महाराजांचं मंदीर बांधून दाखवेन, असंही ठाकरे म्हणाले.
देवा भाऊ, दाढी भाऊ अन् जॅकेट भाऊ
आज तीन तीन भाऊ आले आहेत. एका बाजूला देवा भाऊ दुसरीकडे दाढी भाऊ, तिसरीकडे जॅकेट भाऊ. भाऊ भाऊ आणि मिळून खाऊ असे हे आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर केली आहे.