डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील चार विधानसभा क्षेत्रांमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांनी आणि सर्वेक्षण विभागाने वाहन तपासणी मोहीम तीव्र केली आहे. शहरात बाहेरून येणाऱ्या आणि शहराबाहेर जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन आणि निवडणूक आयोगाच्या तक्रारींवर उपाययोजना म्हणून ही मोहीम राबवली जात आहे.
निवडणूक काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी अतिरिक्त रक्कम, मद्याच्या बाटल्या किंवा अन्य वस्तूंचा वापर होऊ नये, याची खात्री करण्यासाठी वाहनांची तपासणी केली जात आहे. भरारी पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, वाहनांमध्ये अतिरिक्त रक्कम सापडल्यास चालकाकडे त्या रकमेचे पुरावे मागवले जातात. योग्य पुरावे असतील, तर पंचनामा करून वाहन सोडण्यात येते.
उल्हासनगर आणि भिवंडी परिसरातून मद्याच्या बाटल्यांची रात्रीच्या वेळी वाहतूक होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी आल्या होत्या. त्यामुळे ही तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवून हे प्रकार थांबवण्यास मदत झाली. नागरिकांनी जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांची तपासणीचीही मागणी केली असून, काही राजकीय मंडळी अशा वाहनांचा गैरवापर करू शकतात, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
शहराच्या चारही दिशांना तपासणी
तपासणीसाठी शिळफाटा रस्ता, पत्रीपूल, ९० फुटी रस्ता, माणकोली पूल, शहाड उड्डाणपूल, दुर्गाडी किल्ला चौक, आधारवाडी तुरुंग, गांधारे पूल, तिसगाव नाका, मानपाडा रस्ता, कोपर उड्डाणपूल, कस्तुरी प्लाझा या प्रमुख ठिकाणी तीन पाळ्यांमध्ये भरारी पथके तैनात आहेत. यामुळे शहराच्या चारही दिशांना वाहनांची तपासणी प्रभावीपणे होत आहे.
