शोभायात्रेसाठी पाचशे रुपये देऊन कार्यकर्ते आणल्याचा आरोप
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि वरळीचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात तक्रार केली आहे. मिलिंद देवरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना काढण्यात आलेल्या शोभायात्रेत पाचशे रुपये देऊन लोकांना सहभागी करुन घेण्यात आल्याचा आरोप अनिल देसाई यांनी केली आहे. अनिल देसाई यांनी मिलिंद देवरा यांच्यावर आचारसंहिता भग केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी मिलिंद देवरा यांच्या विरोधात मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. मिलिंद देवरा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शोभायात्रा काढली होती. त्या शोभायात्रेचे व्हिडीओ जोडत तक्रार करण्यात आली आहे. अनिल देसाईंच्या पत्रामध्ये शोभायात्रेचे चित्रीकरण करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींनी त्या शोभायात्रेत सहभागी झालेल्या लोकांना विचारलं असता त्यांनी आपल्याला प्रत्येकी ५०० रुपये देऊन शोभायात्रेत सहभागी होण्यास सांगितल्याचं कॅमेऱ्यासमोर कबूल केल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणाचे असंख्य व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याचं देखील देसाईंच्या पत्रात म्हटलं आहे.
निवडणूक आदर्श आचारसंहितेसंदर्भातील भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार पैशाचे आमिष दाखविणे हा गंभीर गुन्हा असून या गोष्टीची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आचारसंहिता भंग प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी अनिल देसाई यांनी केली आहे.
याशिवाय बेकायदेशी खर्च वरळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मिलिंद देवरांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करावा, अशी मागणी देखील अनिल देसाई यांनी केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीनं दादरमधील शिवाजी पार्क मैदानावरील दीपोत्सव कार्यक्रमातील पक्षाच्या नावाच्या आणि चिन्हाच्या वापरासंदर्भात तक्रार केली होती. दीपोत्सवाचा खर्च अमित ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात दाखवण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं त्याची दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा आले आहेत. आता निवडणूक आयोग काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, अनिल देसाई यांच्या तक्रारीनंतर राज्य निवडणूक आयोगानं 24 तासात याची पडताळणी करावी आणि कार्यवाही अहवाल द्यावा असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.