बोरीवली येथे राबविली विजय वैद्य यांची संकल्पना
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक श्री विजय वैद्य यांच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन बोरीवली (पुर्व) येथील वायंगणकर साई स्पोर्ट्सच्या राकेश वायंगणकर यांनी दिवाळीचा पहिला दिवा भारतातील कोट्यावधी जनतेची अन्नाची भूक भागविणारा शेतकरी आणि सीमेवर डोळ्यात तेल घालून करोडो देशवासियांचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सैनिकांसाठी लावला. सालाबादप्रमाणे यंदाही बोरीवली येथील सुविद्या प्रसारक संघाच्या मंगुभाई दत्ताणी विद्यालयाच्या (योजना) पटांगणात संचलनातील मुलांसोबत शेणाने सारवलेल्या जमिनीवर ‘जय जवान जय किसान’ हे वाक्य रांगोळी स्वरूपात मांडण्यात आले.
या कार्यक्रमास पाचशे वेळा रायगड दर्शन करुन शिवभक्तांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा खराखुरा इतिहास पोहोचविणारे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजेश उर्फ राजू देसाई, कस्तुरबा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय पांचाळ यांनी मार्गदर्शन केले. शिवाय ज्येष्ठ कराटे प्रशिक्षक श्री शिवराम काटकर यांच्या १५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी संचलनाच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभाग घेतला. स्थानिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
