नवी मुंबई : 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यभरात होणा या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 150 ऐरोली व 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेच्या निरीक्षणासाठी निवडणूक आयोगामार्फत नियुक्त निवडणूक निरीक्षक श्री.त्रिलोचन मांझी यांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला भेट देत विशेष बैठकीत सविस्तर आढावा घेतला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व डॉ. अमोल शिंदे तसेच निवडणूक कामकाजाशी संबंधित विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता याप्रसंगी उपस्थित होते. आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी यावेळी महानगरपालिकेच्या वतीने निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या स्वीप कार्यक्रमांतर्गत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची तसेच मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणा-या पिण्याचे पाणी, मोबाईल प्रसाधनगृहे, रॅम्प, व्हिलचेअर, मेडिकल कीट व इतर आवश्यक सुविधांची माहिती दिली.
निवडणूक निरीक्षक श्री.त्रिलोचन मांझी यांनी काही मतदान केंद्रांच्या जागांची पाहणी केली व आढावा बैठकीप्रसंगी मतदान प्रक्रिया सुलभतेने पार पडावी यादृष्टीने आधीपासूनच काळजी घेण्याच्या सूचना केल्या. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहचविण्यासाठी स्वीप कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवून त्यामध्ये विविध प्रसार माध्यमांचा वापर करण्याचे त्यांनी सूचित केले. मतदान केंद्रावरील रांगाचे नियोजन ही महत्वाची बाब असल्याचे सांगत याकरिता महानगरपालिकेने एनएसएस व एनसीसी विद्यार्थ्यांची मदत घेण्याचे केलेले नियोजन उत्तम असल्याचे सांगितले. मतदारांना मतदार चिठ्ठ्या वाटपाचे काम मतदानापूर्वी 100 टक्के पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष द्यावे असेही त्यांनी सूचित केले.
नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने निवडणूक कार्यालयांमार्फत नियुक्त स्वीप नोडल अधिका यांव्यतिरिक्त उपआयुक्त दर्जाचे अतिरिक्त नोडल अधिकारी महानगरपालिकेच्या वतीने आठ विभाग कार्यालय क्षेत्रांसाठी नियुक्त केल्याची माहिती देत यापुढील काळात अधिक प्रभावीपणे स्वीप अंतर्गत मतदार जागरूकता मोहीमा राबविण्यात येतील असे सांगितले.
