अनिल ठाणेकर

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विनधान करणारे आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि महिलाध्यक्ष सुजाता घाग यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात लेखी पत्र दिले आहे. आ. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर व्यंगात्मक टीका केली होती. या टीकेच्या अनुषंगाने ही तक्रार करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य, ओबीसी सेल अध्यक्ष गजानन चौधरी , प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस राजेश कदम, माधुरी सोनार ताई , कोपरी पाचपाखाडी विधान सभा अध्यक्ष विक्रांत घाग, भिषण सिंग जोहर, इक्बाल शेख, राहुल बर्वे, फुलबानो पटेल, ज्योती निम्बर्गी, रेश्मा भानुशाली, हाजी बेगम , मल्लिका पिल्ले, आशिष खाडे आणि अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शरद पवार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महिला धोरण, औद्योगिक धोरण, कृषी धोरण, युवा धोरण, क्रीडा धोरण निश्चित केले आहे. याबाबत शासन दरबारी नोंद आहे. असे असतानाही विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत यांनी जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याच्या उद्देशाने शरद पवार यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले, असे विधान केले. त्यांचे हे विधान म्हणजे जनतेला मूळ मुद्यापासून भरकटवून टाकण्याचा प्रकार आहे. जनतेची दिशाभूल करून जनतेच्या मनात  शरद पवार यांच्याबाबत रोष निर्माण करून माथेफिरूंकडून शरद पवार यांचे जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रकार हा गंभीर गुन्हा असून आदर्श आचारसंहितेचा भंग देखील आहे. तसेच, सदाभाऊ खोत यांनी  शरद पवार  यांच्यावर झालेल्या शस्रक्रियेबाबतही अनुचित वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या तोंडाबाबतही लाजीरवाणी विधाने करून आमच्या तसेच शरद पवार  यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. सदाभाऊ खोत यांनी लोकांना चिथावणी देऊन शरद पवार यांच्या जीविताला धोका निर्माण करणे, जनतेची दिशाभूल करून आदर्श आचारसंहितेचा भंग करणे, तसेच आमच्या भावना दुखावणे असे प्रकार केल्याने सदाभाऊ खोत यांच्यावर संबधित प्रकरणाचे योग्य त्या कलमान्वये गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *