मतदार माता भगिनी मलाच निवडून देणार; सुधाकर घारेंना विश्वास
राज भंडारी
पनवेल : कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघात एकूण ९ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी या मतदार संघात खरी लढत ही तिरंगी होणार असून यामध्ये महायुतीचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे, महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार नितीन सावंत आणि राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे सुधाकर घारे यांच्यात ही काटे की टक्कर होणार आहे. यावेळी अपक्ष लढत असतानाही आपण कसे निवडून येवू शकतो हा विश्वास व्यक्त करताना मतदार आणि कार्यकर्ते यांचे आपल्यावरील प्रेम काय आहे हे २३ तारखेला सर्वांनाच कळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी विकासाचे मुद्दे समोर आणत आपला मोठेपणा गाजविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. सुशोभीकरण म्हणजेच विकास असे समजनाऱ्यांना खरा विकास कळलाच नाही, असे खडे बोल त्यांनी सुनावले.
कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात सन २०१४ साली राष्ट्रवादीकडून सुरेश लाड हे आमदार होते. त्यानंतर सन २०१९ साली झालेल्या निवडणुकीत शिवसेना भाजप तत्कालीन युतीचे उमेदवार महेंद्र थोरवे हे पहिल्यांदाच आमदार म्हणून या मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी सुरेश लाड यांच्यावर मात करून विजयी झाले. मात्र गेल्या पाच वर्षातील कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्रात झालेला विकास आणि विकासकामे याच्या जोरावर आमदार महेंद्र थोरवे हे आपली दुसरी टर्म लढत आहेत. त्यांच्या या लढतीवर विरोधी पक्ष तसेच अपक्ष उमेदवार यांनी विकास म्हणजे काय हेच आमदारांना कळले नसल्याचा आरोप करीत कर्जत – खालापूर येथील नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे.
गेले अनेक वर्षे कर्जत आणि खालापूर तालुक्यातील नागरिकांना पुणे, पनवेल, वाशी, कल्याण, उल्हासनगर किंवा मग ठाणे गाठावे लागत आहे. मात्र इतके वर्षे याठिकाणी आमदारकी भोगणाऱ्यांनी एकही रुग्णालय या मतदार संघात दिले नाही, येथील जनतेचा रोजगाराचा प्रश्नही त्यांनी सोडविला नाही. असे अनेक मुद्दे समोर असल्यामुळे आपण निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी समोर आणत जनतेच्या विकासाचे वारे म्हणजेच सुधाकर घारे हे समीकरण डोळ्यासमोर ठेवले आहे. सुधाकर घारे यांनी पुढे बोलताना सांगितले की, कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्रातील जनता ही आपल्याला मानणारी जनता आहे. त्यांच्या प्रत्येक शंकेचे निराकरण करण्यासाठी आम्ही मंडळी कटिबद्ध असतो. रात्री अपरात्री कोणालाही काहीही मदत असुदे आम्ही सर्वच जण त्यावेळी वेळ काळ याचे भान न ठेवता त्यांच्या मदतीसाठी धावत असतो, त्यामुळे या मतदार संघातील जनता ही आताच्या प्रचार दौऱ्यामध्ये आमच्यासोबत मोठ्या संख्येने सामील होत आहे. मला खात्री आहे की, मला येथील जनता या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
