डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे बॉस बनले. भारत आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध खूप चांगले आहेत. दोघेही एकमेकांना चांगले मित्र म्हणतात. ट्रम्प अध्यक्ष बनल्याने भारत आणि अमेरिकेच्या व्यवसायावरही परिणाम होणार आहे. दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध अधिक दृढ होऊ शकतात. त्याचबरोबर अमेरिकेच्या नवीन प्रशासनाने ‘अमेरिका फर्स्ट अजेंडा’ राबवण्याचा निर्णय घेतल्यास, भारतीय निर्यातदारांना वाहने, कापड आणि औषधे यांसारख्या वस्तूंवर उच्च सीमा शुल्काला सामोरे जावे लागू शकते.
ट्रम्प एच-1बी व्हिसा नियम कडक करू शकतात. त्यामुळे भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या 80 टक्क्यांहून अधिक निर्यातीवर परिणाम होईल. अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारताचा अमेरिकेसोबतचा वार्षिक व्यापार 190 अब्ज डॉलर्सचा आहे, असे ‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’ (जीटीआरआय) चे संस्थापक अजय श्रीवास्तव यांनी सांगितले. चीननंतर आता ट्रम्प भारतावरही मोठे शुल्क लावू शकतात. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात कठीण व्यापार वाटाघाटी होऊ शकतात. त्यांचा अमेरिका फर्स्ट अजेंडा संभाव्यतः वाहन, मद्य यांचा समावेश असलेल्या भारतीय वस्तूंवरील आयात शुल्कासारख्या संरक्षणात्मक उपायांवर जोर देईल. कापड आणि औषधांची निर्यात महाग होईल. या वाढीमुळे भारतीय उत्पादने अमेरिकेत कमी स्पर्धात्मक बनू शकतात. या क्षेत्रातील महसुलावर परिणाम होऊ शकतो.
ट्रम्प विविध क्षेत्रांमध्ये शुल्क वाढवतील कारण त्यांना त्यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ च्या घोषणेचे पालन करावे लागेल. याचा परिणाम इलेक्ट्रॉनिक्स सारख्या क्षेत्रावर होऊ शकतो. ट्रम्प यांनी आधीच अमेरिकेला ट्रान्स-पॅसिफिक पार्टनरशिप (टीपीपी) मधून बाहेर काढले आहे. त्यामुळे आयपीईएफ (इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रोस्पॅरिटी) वर काळे ढग दाटले आहेत. 14 देशांचा हा गट अमेरिका आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील इतर देशांनी 23 मे 2022 रोजी टोकियोमध्ये लॉंच केला होता.
‘फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशचे महासंचालक अजय सहाय म्हणाले की आम्ही ट्रम्प यांच्याकडून अधिक संतुलित व्यापारासाठी दबाव आणण्याची अपेक्षा करू शकतो; पण वाढीव शुल्कावरून व्यापार विवाद उद्भवू शकतात. अमेरिकेच्या नवीन प्रशासनाने अमेरिका फर्स्ट अजेंडा राबवण्याचा निर्णय घेतला, तर भारतीय निर्यातदारांना वाहने, कापड आणि औषधांसारख्या वस्तूंवर जास्त सीमा शुल्क लावले जाऊ शकते. भारताचे 80 टक्क्यांहून अधिक आयटी निर्यात उत्पन्न अमेरिकेतून येते. व्हिसा धोरणांमध्ये बदल झाल्यास भारत त्याबाबत संवेदनशील होतो. ट्रम्प यांनी यापूर्वी भारताला मोठा टेरिफ गैरवर्तन करणारा म्हटले होते. त्यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये भारताला ‘टेरिफ किंग’ म्हटले होते. या टिप्पण्यांवरून दिसून येते की ट्रम्प यांची दुसरी टर्म कठीण व्यापार वाटाघाटी करु शकते; मात्र चीनबाबत अमेरिकेची कठोर भूमिका भारतीय निर्यातदारांसाठी नवीन संधी निर्माण करू शकते. 2023-24 मध्ये दोन्ही देशांमधील वस्तूंचा द्विपक्षीय व्यापार 120 अब्ज डॉलर होता. 2022-23 मध्ये तो 129.4 अब्ज डॉलर होता. आंतरराष्ट्रीय व्यापार तज्ज्ञ बिस्वजित धर यांच्या मते ट्रम्प विविध क्षेत्रांमध्ये शुल्क वाढवतील. इलेक्ट्रॉनिक्ससारख्या क्षेत्रावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
