ठाणे : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने ठाणे जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले जाते. यंदाही हे सर्वेक्षण पार पडले असून जिल्ह्यातील ५७८ शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. हे सर्वेक्षण जुलै ते सप्टेंबर कालावधीत पार पडले असल्याची माहिती जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये माध्यमिक शाळांची सुविधा नसल्याने मुलांना दुसऱ्या गावात जावे लागते. परंतू, मुलांना इतर गावातील शाळेत जाण्यास अनेक पालक तयार नसतात. या मुलांमध्ये विशेषतः मुलींचा समावेश असल्याचे दिसून येते. त्यामुळे या भागातील मुले हे शिक्षणापासून वंचित राहतात. तर, अनेक मुलांचे पालक हे मजुर काम करणारे असतात, परिणामी, त्यांच्या कामानुसार ते वारंवार स्थळांतरित होत असतात. अशा वेळी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष होते. आणि ती मुले देखील कुटूंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी मजुरीचे काम करताना दिसतात. परंतू, कोणतेही मूलं हे शिक्षणापासून वंचित राहून नये त्याला उत्तमातील उत्तम शिक्षम मिळाले यासाठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत दरवर्षी शिक्षण विभागाकडून जिल्हास्तरावर शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले जाते. हे सर्वेक्षण काही वेळा वर्षातून एकदा किंवा दोनदा केले जाते. यंदाही ठाणे जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर च्या कालावधीत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण पार पडले. या सर्वेक्षणात एकूण ५७८ शाळाबाह्य मुले आढळून आली. यामध्ये सहा ते १६ वयोगटातील मुलांचा समावेश होता. यातील काही मुले हे कधीच शाळेत गेलेली नव्हती. तर, काहीजण अनियमित शाळेत जाणारी होती. विशेष म्हणजे ५७८ पैकी तब्बल ५०७ मुले ही शहरी भागात आढळून आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. तर, ग्रामीण भागात ७१ शाळाबाह्य मुले आढळून आली आहेत. या सर्व मुलांना त्यांच्या घरा जवळच्या शाळेत प्रवेश देण्यात आला असून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. शहरी भागातील ५०७ शाळाबाह्य मुलांमध्ये २४१ मुले ही ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत, अशी माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग
शाळाबाह्य विद्यार्थ्यांमध्ये अनेक मुले नव्याने शाळेत येत आहेत. तर, काही विद्यार्थी अनियमितपणे शाळेत जात नव्हती. त्यामुळे या विद्यार्थ्यांची आकलन क्षमत इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढविण्यासाठी प्रत्येक शाळा स्तरावर विशेष वर्ग घेतले जात आहेत, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली.
00000