‘धर्मराज्य पक्षा’ची आरटीओ आणि वाहतूक विभागाकडे तक्रार
ठाणे : ज्या रिक्षाचालकांकडून अशाप्रकारे मीटरमध्ये बेकायदेशीरपणे फेरफार करुन, प्रवाशांची आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे, अशा समाजकंटकीप्रवृत्तीच्या रिक्षाचालकांचा शोध घेऊन, त्यांच्या रिक्षातील मीटर तपासण्यात यावेत आणि त्यात एखादा रिक्षाचालक दोषी आढळल्यास, त्याचा वाहन परवाना आणि रिक्षा-बॅच कायमस्वरुपी रद्द करुन, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नरेंद्र पंडित यांनी केली आहे.
ठाणे शहरातील काही रिक्षाचालक आपल्या मीटरमध्ये फेरफार करुन, प्रवाशांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आले असून, रिक्षाचालकांच्या विरोधात ‘धर्मराज्य पक्षा’कडे मोठ्याप्रमाणात तक्रारी आलेल्या आहेत. यासंदर्भात, प्रवाशांनी रिक्षाचालकांस विचारणा केल्यास, जाब विचारल्याचा राग येऊन, काही गुंडप्रवृत्तीचे रिक्षाचालक तर, थेट प्रवाशांशी अरेरावी करणे, असभ्य वर्तणूक करणे; तसेच, शिवीगाळ करणे यासारखे अशोभनीय प्रकार करीत असतात. रिक्षा-व्यवसाय हा, खासगी स्वरुपातील मात्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रकार असल्याने, समाजातील सर्व घटक, विशेषतः नोकरदारवर्ग रिक्षा वाहतुकीला प्राधान्य देतात. असे असतानाही, स्वतः कष्टकरीवर्गाचे प्रतिनिधित्व करीत असूनदेखील, सकाळ-संध्याकाळ अशा गर्दीच्या वेळी आणि ठिकाणी, खास करुन ठाणे स्टेशन परिसरात, काही रिक्षाचालकांकडून सरळ-सरळ भाडी नाकारली जातात. संतापजनक बाब म्हणजे, अशावेळी महिला, ज्येष्ठ नागरिकांना रिक्षा मिळविण्यासाठी अक्षरशः रिक्षाचालकांपुढे हात जोडावे लागतात. त्यातही अनेक विनवण्या केल्यानंतर किंवा वाहतूक पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर, एखादा रिक्षाचालक भाडे स्वीकारतो; मात्र, लांबचे भाडे असल्यास, हातचलाखीने आपल्या हँडलवर किंवा सीटखाली गुप्त पद्धतीने बसवलेली कळ दाबून, आधीच मीटरमध्ये फेरफार करण्यात आलेले असल्यामुळे, मीटर वाऱ्याच्या वेगाने पळते आणि नियमबाह्यपद्धतीने प्रवाशांकडून प्रवासी-भाडे उकळले जाते. काही दिवसांपूर्वी, समाजमाध्यमांद्वारे एका वाहतूक पोलिसामार्फत, एक व्हिडिओ-क्लिप प्रसारित करण्यात आली होती. त्यामध्ये मीटरच्या डाव्याबाजूला, (आणि प्रवाशाच्या उजव्या हाताला) जिथे आकडे बदलत असतात, त्याठिकाणी कोपऱ्यात एक छोटा लाल रंगाचा ठिपका, सतत बंद-चालू (Blink) होत असल्यास, मीटरमध्ये नक्कीच फेरफार झालेला असल्याचे समजावे, अशी माहिती संबंधित वाहतूक पोलिसाने आपल्या व्हीडिओ-क्लिपद्वारे दिलेली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपायुक्त आणि ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.
