अनिल ठाणेकर
ठाणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अवमान करणाऱ्या काँग्रेस आणि राहुल गांधी यांना बाबासाहेबांच्या संविधानावर बोलण्याचा अधिकार नाही. असे वक्तव्य केंद्रीय अल्पसंख्यांक तथा संसदिय कामकाज मंत्री किरेन रिजिजु यांनी केले असुन त्यावेळी बाबासाहेबांना दिलेल्या हीन वागणुकीचे अनेक दाखले देत त्यांनी काँग्रेसचा पर्दाफाश  केला.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मविआ आघाडीची पोलखोल करण्यासाठी ठाण्यात भाजप मिडिया सेंटरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रिजिजु बोलत होते. याप्रसंगी, खासदार नरेश म्हस्के, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, भाजप प्रदेश प्रवक्ते सागर भदे,माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, रिपाईचे भास्कर वाघमारे आदीसह महायुतीचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रात महायुतीसाठी उत्तम वातावरण असल्याचे सांगुन केंद्रीय मंत्री रिजिजु यांनी, राहुल गांधींनी नागपुर येथील कार्यक्रमात संविधानाच्या नावाखाली कोऱ्या लाल रंगाच्या पुस्तिकेचे ढोंग रचल्याचे सांगितले. राहुल गांधी आणि काँग्रेसने नेहमीच बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित केले. त्यामुळेच १९५१ साली बाबासाहेबांनी कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संविधानात देखील काँग्रेसने बदल केले, हा संविधानावरील पहिला हल्ला होता. १९७५ मध्ये आणीबाणी लागु करून संविधानाचा पायाच काँग्रेसने उध्वस्त केला.१९९० मध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेतुन  पायउतार झाल्यावर आलेल्या सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्याचा निर्णय घेतला, त्यात भाजपचाही समावेश होता. तर दुसरीकडे २६ नोव्हे. रोजी संविधान दिन साजरा करून तसेच देशभरात संविधान मंदिरे उभारून भाजप संविधानाचा सन्मान करीत आहे. आणि, काँग्रेस केवळ संविधान बदलण्याचा बागुलबुवा उभा करून देशात फेक नॅरेटीव्ह पसरवत असल्याचे मंत्री रिजिजु यांनी सांगितले.नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर जगात देशाची प्रतिमा उंचावली. महाराष्ट्रात २०१४ नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनल्यानंतर बदल झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई ते नागपुर समृद्धी महामार्ग हा जागतीक दर्जाचा महामार्ग उभारला आहे. राज्यात लाडकी बहिण सारख्या योजना लोकप्रिय होत आहेत. देशाला पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र एक प्रकारे डबल इंजिनचे काम करीत आहे.तेव्हा,हा विकास अधिक वेगाने पुढे नेण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्ताने आली असुन जातीजातीत विभागले जाऊ नका असे आवाहन मंत्री रिजिजु यांनी केले. आजवर काँग्रेसने मुस्लिमांसह एससी, एसटी आणि दलित समाजाची मते घेतली. पण त्यांना न्याय दिला नाही. याउलट भाजपने सबका साथ सबका विकास या अनुसार सहा अल्पसंख्यांक समाजाना समान दर्जा दिला आहे. तर हिंदु समाजात फूट पाडून इतकी वर्षे काँग्रेसने मुस्लिमांना मुर्ख बनवले. मुस्लिम समाजाची व्होट बँक खिशात ठेवूनही काँग्रेसने मुस्लिमांना कोणताच लाभ दिला नसल्याचे सांगुन मंत्री रिजिजु यांनी, काँग्रेसची फोडा आणि राज्य करा …ही निती आता चालणार नसल्याचे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *