डोंबिवली : उन्हाळा, पावसाळा असो सण उत्सव असो डोंबिवलीकर आवाज उठवून उठवून शांत झाले पण रस्त्यांवरील खड्डे काही बुजले नाही. मात्र विधानसभा निवडणूका लागताच अनेक रस्त्यांची कामे एमएमआरडीएने हाती घेत पूर्ण केली. उर्वरित रस्त्यांची अवस्था कधी सुधारणार यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष करू शकतात हे समजताच मुख्य रस्ते डांबर टाकून गुळगुळीत करत मतदारांचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र आज ही अनेक भागातील रस्त्यांची चाळण तशीच असून येथील मतदारांशी दुजाभाव का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
डोंबिवलीतील रस्ते म्हणजे खड्ड्यांचे साम्राज्य अशीच काहीशी ओळख गेल्या अनेक वर्षांपासून निर्माण झाली आहे. सत्ताधारी, विरोधक, कलाकार मंडळी असतील त्यांनी कायम डोंबिवली मधील रस्ते, खड्डे आणि वाहन कोंडी यावर बोल सुनावले आहेत. केडीएमसी प्रशासनाची अवस्था बिकट असल्याने रस्त्यांची कामे करणे प्रशासनाला शक्य नव्हते. मात्र निवडणूका लागताच येथील रस्त्यांचे रुपडेच पालटायला सुरुवात झाली.
खासदार, आमदार यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसी, एमएमआरडीए विभागाकडून निधी मंजूर करत अनेक रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण केले गेले. पालिका प्रशासनाने देखील काही रस्त्यांची कामे केली. मात्र त्यातही डोंबिवली मधील मुख्य रस्त्यांची दुरावस्था होती. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव काळात हे खड्डे बुजविण्यात यावे यासाठी नागरिक आवाज उठवत होते. दिवाळी सरली, पावसाने उघडीप दिली तरी ही रस्त्यांची कामे सुरू झाली नाहीत.
विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आणि डोंबिवली पूर्वेतील रस्त्यांची कामे पटापट हाती घेण्यात आली. कंत्राटदारास दिवाळी पूर्वीची डेडलाईन देत काम आटोपण्याचे आदेश देण्यात आले. ही कामे हाती घेताना शहरात वाहतूक व्यवस्थेचा देखील विचार करण्यात आला नाही. परिणामी ऐन दिवाळीत वाहतूक कोंडीचा त्रास डोंबिवलीकरांनी सहन केला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने ही कामे आता ठप्प आहेत.
शहरातील अनेक मुख्य जुने रस्ते हे डांबरचे असून त्यावर खड्डे पडून त्यांची दुरावस्था होती. याच खड्डयांवरून डोंबिवली मधील राजकारण पेटू लागले. प्रचारात विरोधकांचे तोंड बंद ठेवण्यासाठी गेल्या काही दिवसांत शहरातील रस्त्यांवर डांबर टाकून खड्डे बुजविण्यात आले आहेत.
हे डांबर ओबडधोबड टाकण्यात आले असले तरी मतदारांना गुळगुळीत रस्ते देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. खड्डे बुजले गेल्याने वाहनचालक सुखावले आहेत. मात्र निवडणूक लागल्यानंतर रस्त्यांची कामे केली गेल्याने तेही काही निवडक भागातील रस्त्यांची कामे केली गेल्याने नागरिक रोष व्यक्त करत आहेत.
मतदारांमध्ये दुजाभाव केला जात आहे का? ज्या भागात व्होट बँक आहे तेथील रस्ते नीट केले गेले आहेत. इतर रस्त्यांकडे पाहिले गेले नाही. एमएमआरडीए कंत्राटदाराला सांगून ही कामे करून घेत मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची देखील चर्चा आहे. हे रस्ते आता किती दिवस तग धरून राहतात. निवडणूक झाल्यानंतर देखील रस्ते असेच नीट राहत का? हे पहावे लागेल.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *