बुलढाणा : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी निष्ठावान मावळे तयार केले. शिवरायांनी त्यांच्या हाती निष्ठेचा भगवा झेंडा दिला, भगवा हा निष्ठेचा प्रतिक आहे,तो मावळ्यांच्या हातात शोभून दिसतो, दरोडेखोरांच्या हातात नाही. चाळीस जणांची टोळी आली अन् आपल्या पक्षावर दरोडा घालून पक्ष चोरुन नेला. आता म्हणतात हा पक्ष आमचा आहे. ते गद्दार, खोकेबाज आणि धोकेबाज आहेत,’ अशी घणाघाती टीका शिवसेना(उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ते बुलढाण्यात जयश्री शेळकेंच्या प्रचारसभेत बोलत होते.
मी निवडणुकीच्या प्रचारात फिरतोय, प्रत्येक ठिकाणी आपल्या विरोधात आपलाच गद्दार उभा राहिला आहे. साहजिकच आहे ही चूक माझी आहे कारण यांना तिकिट विश्वास ठेवून मी दिलं होतं. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्या गद्दारांना निवडणून दिलं. आता त्या चुकीची पुनरावृत्ती करणार नाही. आता म्हणत आहेत की हा पक्ष आमचा आहे. पन्नास खोके आता नॉट ओके. यांनी एवढं कमावलं आहे की त्यांना हरवलं तरी काही फरक पडत नाही”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला.
‘भाजपावाल्यांची कमाल वाटते की, तुम्ही दरोडेखोरांना घेऊन आमच्यावर कसे काय चालून येता? भाजपाला कुणी ओळखत नव्हतं तेव्हा आम्ही तुम्हाला साथ दिली. शिवसेना नसती तर मोदीही पंतप्रधान झाले नसते आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते. वर गेल्यानंतर आम्हाला लाथा घालू लागलात? तुमचं तंगडं धरुन तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर भिरकावून दिलं नाही, तर मी छत्रपती शिवाजी महाराज की जय हे बोलणार नाही,’ असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
